करोनाकाळाने अमेरिकेसह जगभरातील सजग वाचकांसाठी उत्तमोत्तम लेखनाचे दरवर्षी येणारे दोन खंड बाद केले. २०२०च्या टाळेबंदीत पर्यटन ही बाबच रद्दबातल झाल्याने देशाटनावर ताव-ताव सचित्र लेख देणाऱ्या मासिकांची पंचाईत झाली. २०२१ ला ‘बेस्ट अमेरिकन ट्रॅव्हल रायटिंग’चा शेवटला खंड निघाला. पॉल थेरॉ यांच्यापासून पिको अय्यर यांच्या संपादनाखाली निघालेल्या या खंडांत प्रवास वर्णनांची अद्भुत-संपदा तयार झाली. (२००५ च्या खंडातील ‘ट्राइंग रिअली हार्ड टू लाईक इंडिया’ हा ‘भणंग भारत’ चितारणारा ‘स्लेट’मधील सेथ स्टिव्हन्सन यांचा लेख खूप गाजला. पुढे ‘जयपूर लिट फेस्ट’सारख्या आंतरराष्ट्रीय लेखक-पत्रकारांना मौज-बिदागी देणाऱ्या काळानंतर या लेखाचे ऑनलाइन शीर्षक ‘लर्निग टू लाईक इंडिया : फाईव्ह स्टेप अ‍ॅप्रोच’ असे झालेले दिसते आहे, तीही गंमतच आहे.) दुसरा खंड ‘बेस्ट अमेरिकन नॉनरिक्वायर्ड रीडिंग’. हायस्कूलमधल्या विद्यार्थ्यांनी वाचून निवडलेल्या साहित्याच्या एकत्रीकरणातून होणारा हा ग्रंथप्रकल्प २०२० साली आलाच नाही.. अन त्यानंतर त्याचे काम पूर्णपणे थांबले.

या वातावरणातही विल्यम सिडने पोर्टर ऊर्फ ओ हेन्री (१८६२-१९१०) यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी निघणाऱ्या ‘ओ हेन्री प्राइझ स्टोरीज’च्या वार्षिक खंडाचे काम सुरू झाले असून २०२३ च्या खंडासाठी निवडलेल्या २० कथांच्या नावांची घोषणा नुकतीच करण्यात आली. ‘लॉरेन ग्रॉफ’ यांच्या संपादनाखाली निवडण्यात आलेल्या या कथांच्या लेखकांचे देशवैविध्य पुष्कळ आहे. गेल्या वर्षी ज्येष्ठ लेखक अमर मित्र यांची ‘द ओल्ड मॅन ऑफ कुसुमपूर’ ही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अनिश गुप्ता यांनी इंग्रजीत अनुवादित केलेली कथा या खंडात समाविष्ट होती. यंदा एकाही भारतीय लेखकाची अनुवादित कथा यात नाही. पण अफगाणिस्तानमध्ये जन्मलेल्या, पाकिस्तानात वाढलेल्या आणि अमेरिकेत शिकलेल्या जमील जान कोचाई या लेखकाची ‘द हॉण्टिंग ऑफ हाजी होटक’ ही कथा या पुस्तकातील खास आकर्षण आहे. पाकिस्तान-युद्धग्रस्त अफगाणिस्तान आणि अमेरिकेतील स्थलांतरत्व लादला गेलेला व्यक्तिसमूह कोचाई यांच्या कथापरिघात डोकावतो. गेल्या वर्षी स्वीकृतीनियम बदलल्यामुळे अनुवादित कथांना या संग्रहात स्थान मिळत आहे.  योनास ऐका या तरुण डॅनिश लेखकाची ‘मी, रोरी अ‍ॅण्ड अरोरा’ ही कथा या खंडात आहे. याशिवाय रॉड्रिगो ब्लान्को काल्डेरॉन यांची ‘द मॅड पीपल ऑफ पॅरिस’ आणि ख्रिस्टीना रिव्हिएरा गार्झा यांची ‘ड्रीम मॅन’ या दोन स्पॅनिश अनुवादित कथा खंडात आहेत. गेल्या वर्षी निम्म्या म्हणजे दहा कथा अनुवादित स्वरूपात या खंडात समाविष्ट करण्यात आल्या होत्या. यंदा अनुवादित कथांची संख्या केवळ तीन आहे. के- मिंग चँग आणि लिंग मा या दोन आशियाई अमेरिकी लेखिकांच्या सर्वोत्तम कथांचा यात समावेश आहे. पेमी अगुडा या नायजेरियातील लेखिकेची ओ हेन्री खंडात सलग दुसऱ्या वर्षी कथा स्वीकारण्यात आली आहे. ग्रॅण्टा (स्थापना १८८९) त्रमासिकापासून ते दशकभरापूर्वी निघालेल्या जॉन फ्रीमनच्या ‘फ्रीमन्स’ षण्मासिकापर्यंत आणि ‘थ्री पेनी रिव्ह्यू’पासून ते ‘इलेक्ट्रिक लिटरेचर’पर्यंत, अशा बडय़ा आणि अगदीच लहान यंत्रणा असलेल्या नियतकालिकांतल्या या गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या सर्वोत्तम इंग्रजी कथा आहेत. आपल्याकडे, दक्षिणेतील अनेक भाषांत अशा प्रकारचे वार्षिक खंड कथा या साहित्य प्रकाराच्या प्रेमापोटी अजूनही निघत असतात. कुण्या एकेकाळी आपल्या मराठीतही कथा जपणुकीचा हा व्यवहार चालत असे. ती आठवणही आपली भाषा अभिजात होण्याची वाट पाहणाऱ्या वाचकांत पुसट झाली असेल. तूर्तास सोबतच्या दुव्यांवर जाऊन काही वाचन करता येईल

* ओ हेन्री संग्रहाच्या संपादिकेची प्रस्तावना आणि तपशील..

Announcing the Winners of the 2023 O. Henry Prize for Short Fiction

* जमील जान कोचाई यांची द हॉण्टिंग ऑफ हाजी होटक ही पूर्ण कथा..

https://www.newyorker.com/magazine/2021/11/08/the-haunting-of-hajji-hotak

* योनास ऐका या डॅनिश लेखकाची अनुवादित संपूर्ण कथा.

Me, Rory and Aurora

* द मॅड पीपल ऑफ पॅरिम्स ही स्पॅनिशमधून अनुवादित झालेली संपूर्ण कथा.

The Mad People of Paris

सेथ स्टिव्हन्सन यांचा स्लेट मासिकातील  गाजलेला भारतावर टीका करणारा लेख..

https://slate.com/human-interest/2004/09/learning-to-like-india-a-five-step-approach. html

Story img Loader