मानवापेक्षा मुक्या प्राण्यांचे स्थलांतर केव्हाही जोखमीचे. त्यामुळे ते करताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणे कधीही योग्यच. त्याकडे दुर्लक्ष करून केलेले प्रयोग कसे अंगलट येतात याचे उदाहरण म्हणून देशात मोठा गाजावाजा करून राबवल्या गेलेल्या चित्ता प्रकल्पाकडे पाहावे लागेल. सलग महिनाभरात झालेले दोन चित्त्यांचे मृत्यू या प्रयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे. आजच्या युगात असे स्थलांतराचे प्रयोग राबवण्यात गैर काही नाही, पण ते करताना वातावरणातील बदल, प्राण्यांचा अधिवास व त्याला आवश्यक असलेली शिकार या तीन गोष्टींची काळजी घ्यावी लागते. चित्ता प्रकल्प तडीस नेताना नेमके याकडेच दुर्लक्ष झाले. या प्रकल्पावर गेली अनेक वर्षे काम करणारे वन्यजीवशास्त्रज्ञ यजुवेंद्र झाला यांनी यासंदर्भात केलेल्या बहुतेक सूचना अव्हेरण्यात आल्या. खास सिंहांसाठी म्हणून कुनो प्रकल्पात विकसित केलेला गवताळ प्रदेश चित्त्यांसाठी योग्य नाही, त्याऐवजी चित्त्यांना राजस्थानमधील मुकुंद्रात ठेवा, कारण तिथे त्यांना शिकारीसाठी लागणारे चिंकारा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत हे त्यांचे म्हणणे केंद्र सरकारने मोडीत काढले. हे चित्ते राजस्थानात नेले तर तिथे सत्तेत असलेला विरोधी पक्ष कदाचित त्याचे श्रेय घेईल हीच भीती राज्यकर्त्यांना असावी. कुनोमध्ये चिंकारा कमी व चितळ जास्त. योग्य खाद्य मिळाले नाही तर त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होईल ही तज्ज्ञांनी व्यक्त केलेली भीती या मृत्यूंनी आता खरी ठरवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्ता, वाघ, बिबटे हे सारे मार्जार जमातीचे. पण प्रत्येकाच्या शिकार पद्धती वेगळय़ा. चित्ते वाघांप्रमाणे शिकार पुरवून खात नाहीत. सतत लांबचा प्रवास करत शिकार करणे व पोट भरले की पुढे जाणे ही त्यांची पद्धत. ती लक्षात घेतली तर कुनोचे जंगल १२ ते १५ चित्त्यांसाठीच पुरेसे. तरीही तिथे त्यांची संख्या २० वर नेण्यात आली. केवळ एकाच पक्षाच्या सरकारला श्रेय मिळावे हा राजकीय हेतू यामागे असण्याची शक्यता अधिक. स्थलांतर करताना प्राण्यांना दीर्घकाळ विलगीकरणात म्हणजे बंदिस्त ठेवणे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक. यामुळे किडनीत संसर्ग बळावतो हे संशोधनातून सिद्ध झालेले. हा प्रकल्प राबवताना याकडेही दुर्लक्ष झाले. यातल्या पहिल्या मृत्यूचे कारण हाच संसर्ग ठरला. महिनाभरापूर्वी मृत्यू पावलेल्या साशाच्या शरीरात ही लक्षणे दिसूनही तिला जंगलात सोडण्याची घाई करण्यात आली. हे प्राणी ज्या नामिबिया व दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आले, तेथील व भारतीय वातावरण पूर्णपणे वेगळे. तापमानात सात ते आठ अंश सेल्सियसचा फरक. शिवाय तेथील हवेची वैशिष्टय़ेही येथे नाहीत. येथील तापमान शुष्क व कोरडे. त्याचा मोठा परिणाम या चित्त्यांवर होईल अशी तेव्हा व्यक्त केलेली भीती आता सार्थ ठरू लागली आहे. काँग्रेस राजवटीच्या काळापासून चर्चेत असलेला हा प्रकल्प राबवताना घाई करू नये. परिस्थिती अनुकूल झाल्यावरच हे स्थलांतर करावे अशी सूचना झाला व इतर अनेक शास्त्रज्ञांनी केली; पण सरकारी पातळीवर नेतृत्वाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधण्याची घाई नडली. आता त्याचे परिणाम या मृत्यूंमुळे दिसू लागले. या चित्त्यांना प्रचंड आवाज करणाऱ्या हेलिकॉप्टरमधून नेऊ नये ही सूचनासुद्धा याच घाईमुळे अव्हेरण्यात आली असावी. बाहेरून आणलेल्या या चित्त्यांना केवळ कुनोत ठेवण्याऐवजी गवताळ कुरण असलेल्या इतर दोन-तीन प्रकल्पांत विभागणी करून ठेवले असते तर निश्चित फरक जाणवला असता. शिवाय निरीक्षण व अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ते योग्य ठरले असते. दाटीवाटीने एकाच जागी ठेवायला काही ती माणसे नाहीत याचा विसर सरकारला पडला. आणलेल्या या चित्त्यांपैकी एका मादीने चार पिल्लांना जन्म दिला ही चांगली घटना असली तरी उर्वरित प्राण्यांचा जीव जाऊ नये म्हणून जी काळजी आरंभापासून घेतली जायला हवी होती, ती न घेतल्याने हे मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. असे प्रयोग राबवताना त्यावर काम करणारे तज्ज्ञ काय म्हणतात, त्यांच्या हरकती व आक्षेप नेमके काय आहेत याला प्राधान्य देण्याची भूमिका राज्यकर्त्यांची असायला हवी. प्रत्येक गोष्टीत राजकारण बघण्याची सवय अशा संवेदनशील प्रयोगात कामाची नाही याचेही भान ठेवायला हवे होते. त्याकडे दुर्लक्ष करून केवळ उदोउदो कसा होईल याच मानसिकतेने अशा प्रकल्पांकडे बघणे किती धोकादायक याची जाणीव या लागोपाठच्या मृत्यूंनी करून दिली आहे. त्यामुळे आता तरी राज्यकर्त्यांनी केवळ शोक व्यक्त करून थांबण्यापेक्षा घडलेल्या चुकीपासून बोध घेतला तरच हा प्रकल्प यशाकडे वाटचाल करेल, अन्यथा चिंता अटळच.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The death of two cheetahs in consecutive months is a question mark on this experiment amy
Show comments