युद्धजर्जर युक्रेनला ५० अब्ज युरो किंवा ५५ अब्ज डॉलरच्या तातडीच्या मदतीला युरोपीय समुदायाने मंजुरी दिली. ही मदत पुरेशी आहे किंवा नाही याची चर्चा करण्याआधी, ऐन मोक्याच्या वेळी ती युक्रेनचे धैर्य वाढवणारी आहे हे मान्य करावे लागेल. येत्या २४ तारखेस युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यास दोन वर्षे पूर्ण होतील. हे युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे नाहीत आणि त्याची व्याप्ती किती वाढेल याची शाश्वती नाही. वास्तविक रशियाने २०१४मध्येच क्रीमियावर अवैध ताबा मिळवत तो प्रांत रशियाशी संलग्न केला. याच प्रकारे युक्रेनचे आणखी दोन प्रांत गिळंकृत करत युरोपात पुढे सरकण्याचा व्लादिमीर पुतिन यांचा डाव युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि युक्रेनच्या जनतेने हाणून पाडला. अनेक महत्त्वाच्या शहरांमधून रशियन फौजांना मागे रेटण्यात युक्रेनच्या लष्कराला यश आले आहे. काळय़ा समुद्रात रशियन आरमारालाही तुटपुंज्या सामग्रीनिशी बेजार करून युक्रेनने काही संस्मरणीय विजय संपादले आहेत. पण हा प्रतिकार फार काळ टिकू शकणार नाही, याची जाणीव युक्रेनला आणि युरोपीय समुदाय तसेच अमेरिकेला आहे. युक्रेन हा युरोपीय महासंघाचा सदस्य नाही आणि उत्तर अटलांटिक करार संघटनेचाही (नेटो) सदस्य नाही. त्यामुळे चौकटीबाहेर आणि तात्पुरत्या स्वरूपात मदत पुरवत राहणे हा युक्रेनला साह्य करण्याचा एक मार्ग. दुसरा मार्ग अर्थातच कायदेमंडळामध्ये प्रस्ताव संमत करून मदतनिधी पाठवण्याचा. यात अमेरिकेवर युरोपने आघाडी घेतलेली दिसते. कारण ६० अब्ज डॉलरच्या अमेरिकी मदतीचा प्रस्ताव अमेरिकी काँग्रेसमध्ये डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन यांच्यातील तीव्र मतभेदांमुळे अडकून पडला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा