चीनच्या झिंजियांग प्रांतातील काश्गर हे मोठे शहर आहे. किरगिझस्तान, ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमा त्यापासून जवळ आहेत. काश्गर आणि इस्लामाबाद काराकोरम हायवेने जोडले आहेत. तोच रस्ता पुढे पाकिस्तानच्या ग्वादार बंदरापर्यंत जातो. चीनच्या बेल्ट अँड रोड या भव्य आणि वादग्रस्त उपक्रमाचा तो भाग आहे. भारताच्या सीमेपासूनही तो लांब नाही. काश्गर येथे आपला दूतावास होता. ५०च्या दशकात जेव्हा कम्युनिस्ट चीनने झिंजियांग व्यापले तेव्हा तेथील दूतावास गुंडाळण्याचा आदेश भारताला देण्यात आला. जो दूतावास ब्रिटिश परंपरा सांगतो त्याची येथे गरज नाही असे भारताला सांगण्यात आले. हा दूतावास म्हणजे त्या प्रांतात डोकावण्याची खिडकी होती. त्यानंतर चिनी सरकारने झिंजियांगमधून तिबेटपर्यंतचा रस्ता बांधण्यास सुरुवात केली. त्यातूनच पुढे संघर्ष उद्भवला. खरे तर भारतातून बौद्ध भिक्खू आणि व्यापारी तांडे अनेक शतके या मार्गावरून काश्गर आणि तिथून पुढे मध्य आशियात जात-येत होते. हा मार्ग बंद झाल्याने भारताचा या प्रदेशातील प्रभाव संपला. मूलत: काश्मिरी असलेला बौद्ध प्रकांड पंडित आणि भाषांतरकार कुमारजीव या प्रदेशात वाढला. परंपरा नाकारून आम्ही नवाच भारत घडवू असे धोरण ठेवल्याने काय नुकसान होते हे या प्रकरणावरून ध्यानात येते.
ख्रिास्तपूर्व काळापासून ते इसवी सनाच्या जवळपास दहाव्या शतकापर्यंत मध्य आशियापासून कोरियापर्यंत पसरलेल्या प्रदेशावर भारताचा प्रभाव कसा आणि किती होता याची कथा सांगणारे विल्यम डालरिम्पलचे ‘द गोल्डन रोड- हाऊ एन्शन्ट इंडिया ट्रान्स्फॉर्म्ड द वर्ल्ड’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. चीनचे क्षी जिनपिंग त्यांच्या देशाची प्रतिमा ठामपणे निर्माण करत असताना भारतीयांनीही स्वत:ची गोष्ट जगाला सांगितली पाहिजे, या विचाराचा परिपाक म्हणजे हे पुस्तक आहे. मध्ययुगाच्या उत्तर काळात आणि त्यानंतरच्या अर्वाचीन इतिहासात भारत मागे पडत गेला. नेमका त्याच इतिहासावर भर देत आपल्याला तो विषय शिकवण्यात येतो. वसाहतवादी मानसिकतेतून भारतीय अद्याप बाहेर पडलेले नाहीत असा आरोप लेखकाने पुस्तकाच्या पहिल्या काही पानांतच केला आहे.
हेही वाचा : संविधानभान : महाराष्ट्र आणि गुजरातसाठी विशेष तरतुदी
युरोपच्या इतिहासात ग्रीसचे जे स्थान आहे, तेच स्थान इजिप्तपासून कोरियापर्यंत पसरलेल्या भूप्रदेशाच्या इतिहासात भारताचे होते, याचे अनेक पुरावे या पुस्तकात देण्यात आले आहेत. हा प्रभाव राजकीय नव्हता तर धर्म, कला, गणित, साहित्य, भाषा, खगोलशास्त्र या माध्यमातून पडला होता. मोसमी वाऱ्यांचा उपयोग भारतीय व्यापाऱ्यांनी कसा करून घेतला याविषयी यात सविस्तर वाचता येते. भारतीय जहाजे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून उन्हाळ्याच्या सुरुवातीला निघून इराणच्या आखातातून मेसेपोटेमियापर्यंत जात. तर काही जहाजे एडनवरून लाल समुद्रातून इजिप्तपर्यंत जात. हा प्रवास ४० दिवसांचा असे. या ठिकाणी जमिनीवरून पोहोचण्यास तिप्पट वेळ लागे व लुटारूंमुळे हा मार्ग अधिकच धोकादायक ठरत असे. रोमनांनी इजिप्तवर ताबा मिळविल्यानंतर या व्यापारात अनेक पट वाढ झाली. मयोस हर्मोसपासून भारताला जाणारी १२० जहाजे ग्रीक शास्त्रज्ञ स्ट्राबो याने मोजली होती. रोमन सेनापती प्लिनी द एल्डर याने म्हटले की साऱ्या जगातून सोने भारतात गोळा होत आहे. लाल समुद्रातून येणाऱ्या भारतीय व्यापाऱ्यांकडून रोमन साम्राज्य एवढा कर वसूल करे की तो त्यांच्या एकंदर गोळा होणाऱ्या कराच्या एकतृतीयांश होता. केरळ आणि तमिळनाडूमध्ये अजूनही शेकड्यांनी मिळत असलेली सोन्याची रोमन नाणी हादेखील या व्यापाराचा पुरावा आहे.
सिल्क रोडच्या व्यापाराचा गवगवा खूप करण्यात येतो, पण लेखकाच्या मते चीनच्या युरोपबरोबर असणाऱ्या व्यापाराचा ठळक पुरावा नाही. उलट चीनमधील रेशीमदेखील भारतामार्गेच युरोपपर्यंत पोहोचत असे. सिल्क रोडचा पहिला उल्लेख अगदी अलीकडील म्हणजे बरोन व्हॉन रिश्तोफेन या जर्मन नकाशातज्ज्ञाचा १८७६ सालचा आहे. तो प्रथम त्याच्या कल्पनेत जन्मला असे लेखक म्हणतो. त्यातून त्याने बर्लिन ते बीजिंग या रेल्वे मार्गाची कल्पना मांडली. इंग्रजीमध्ये त्याचा उल्लेख पहिल्यांदा १९३८ साली येतो. मुख्य म्हणजे रेशीम हा काही व्यापारातील मुख्य घटक नव्हता. जास्त मागणी मसाले, हस्तिदंत, साग, चंदन आणि आवळे यांना होती. रोमन व्यापाऱ्यांनी दैनंदिन्यांत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांचे उल्लेख आवर्जून केले आहेत. या व्यापारातून मिळणारे सोने हे आपला सांस्कृतिक प्रभाव वाढवण्याचे प्रमुख इंधन होते. रोमन साम्राज्य जसे उतरणीला लागले तसे भारतीय व्यापाऱ्यांनी आपला मोर्चा पूर्वेकडे वळवला. ते धातू, मिरे, रंगीत कापड आणि हिरे घेऊन चीन, मलाया, जावा-सुमात्रापर्यंत जात राहिले. त्यातून भारतीय साहित्य रामायण-महाभारतातील कथा दक्षिणपूर्व आशियापर्यंत पोहोचल्या. त्यांच्या पाऊलखुणा कंबोडिया, मलेशिया येथील संस्कृतीमधून सामान्य माणसालाही सहज ओळखता येतात.
हेही वाचा : अन्वयार्थ : कौशल्याला पदवीचे कोंदण
भारत आणि रोमच्या व्यापाराचा नव्याने सापडलेला पुरावा अगदी ताजा, म्हणजे मार्च २०२२ चा आहे. इसवी सनाची पहिली काही शतके लाल समुद्रावरील बेरेनिके हे महत्त्वाचे बंदर होते. तेथे भारतीय व्यापाऱ्यांच्या अनेक पिढ्या उतरल्या. येथील उद्ध्वस्त मंदिरांच्या उत्खननात आढळलेली बुद्धाची मूर्ती तुर्कीच्या किनाऱ्यावर मिळणाऱ्या संगमरवरात घडवलेली आहे. तज्ज्ञांच्या मते ती अलेक्झांड्रिया येथे घडवली गेली. अफगाणिस्तानच्याही पश्चिमेकडील प्रदेशात आढळलेली ती पहिली बुद्धमूर्ती आहे. याच मंदिरातील एक मूर्ती वसुदेवाची आहे, जी चक्रधारी कृष्णासारखी दिसते आणि बलरामाच्या मूर्तीच्या हातात नांगर आहे व त्याखाली संस्कृत व ग्रीक भाषेत ती मूर्ती केव्हा दान केली गेली याचा उल्लेख आहे. येथे आढळलेल्या भारतातील, विशेषत: केरळमधील वस्तूंचे वजन काही टन भरेल एवढे आहे.
इसवी सनाच्या सातव्या शतकात ताक्ल्मकान वाळवंट पार करून, पामीर डोंगररंगांतून आणि नंतर लुटारूंना तोंड देत जलालाबादहून झुआनझांग भारतात आला. नालंदातील बौद्ध पंडित आचार्य शिलभद्र यांचे नाव त्याने ऐकले होते. तो नालंदात आला तेव्हा तिथे ३०० इमारती आणि १० हजार विद्यार्थी शिकत होते. ते देश-विदेशातील होते. अनेक विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी तेथे आले होते, पण द्वारपालाने घेतलेल्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले तरच त्यांना आत सोडण्यात येत होते. तिथे असलेले ग्रंथ पाहून त्याचे मत हा तर रत्नांचा समुद्र आहे असे झाले. वेद, तर्कशास्त्र, संस्कृत, व्याकरण, तत्त्वज्ञान, औषधे, गणित, साहित्य आणि खगोलशास्त्र असे अनेक विषय तिथे शिकवले जात. त्याच्याबरोबर आलेल्या हुईली नामक सहकाऱ्याने नालंदाचे विस्तृत वर्णन केले आहे. त्याचा काही भाग लेखकाने उद्धृत केला आहे.
नालंदाचे असे वर्णन तारन्था नावाच्या तिबेटी भिक्खूनेही केले आहे. झुआनझांग १६ वर्षे प्रवासात होता आणि पार दक्षिणेला कांचीपुरमपर्यंत जाऊन सारा भारत पाहून आला. त्याचे चरित्र त्याचा सहकारी हुईलीने लिहिले आहे. हे चरित्र आणि झुआनझांगने स्वत: लिहिलेले प्रवासवर्णन संपन्न संस्कृतीच्या कहाण्या सांगते. त्याचबरोबर काही चिनी सम्राटांनी बौद्ध धर्म आपलासा केला होता. त्यांच्याबद्दल बरीच माहिती या पुस्तकात मिळते. साम्राज्ञी वू झेतीन आणि तैझोन्ग ही त्यातील काही नावे. यातल्या तैझोन्गच्या शेवटच्या आजारपणात त्याच्यावर उपचार करण्यासाठी एक वैद्या कन्नोजहून गेला होता. यानंतर काही शतकांनी तुर्कांच्या स्वाऱ्या सुरू झाल्या आणि नालंदातील ग्रंथालय हळूहळू वेगवेगळ्या तिबेटी मठांमध्ये स्थलांतरित होऊन विखरू लागले.
हेही वाचा : लोकमानस : बांगलादेश हे आर्थिक, सामाजिक, सामरिक आव्हान
याच सुमारास दक्षिण भारतात पल्लवांच्या राज्यात काय सुरू होते याचा आढावा लेखक घेतो. साहित्यकार दंडीनबद्दल आपण पुसटसे कुठे ऐकलेले असते. त्याचे स्तिमित करून सोडणारे कर्तृत्व येथे सविस्तर वाचता येते. तो एकाच वेळी श्रेष्ठ रसिक, टीकाकार, विद्वान आणि नाटककार होता. त्यावेळच्या नवकादंबरीची सुरुवात त्याने केली, असे म्हणता येते. दशकुमारचरित या त्याच्या कादंबरीचा विषय दहा मुले धमाल करायला घराबाहेर पडतात आणि त्यांना काय अनुभव येतात असा आहे. अवंती सुंदरी आणि काव्यादर्श हे त्याचे इतर दोन महत्त्वाचे ग्रंथ. त्याच वेळी पल्ल्वांचा व्यापार पूर्वेकडे वाढू लागला होता. त्यामागून रामायण व महाभारत पूर्वेकडील प्रदेशात पसरू लागले. दंडीनच्या साहित्याचा अभ्यास काश्मीरपासून नालंदा, विक्रमशीला या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात होता. महाबलीपुरम येथील किनाऱ्यांवरील मंदिरांना त्याने भेट दिल्याचे वर्णन आहे. प्रसिद्ध शिल्पकार ललितालयाच्या आमंत्रणावरून तो तेथे गेला आणि शेषशायी विष्णूच्या मूर्तीकडे पाहत त्याने लालितालयाला विचारले, ‘‘या मूर्तीचा तुटलेला हात तू कुठे परत जोडला आहेस?’’ ललितालयाने त्याला दंडवत घातला आणि म्हणाला, ‘‘तुझ्या या प्रश्नाने माझे जीवन सार्थक झाले.’’
भारतीय शून्याचा युरोपकडे झालेला प्रवास हे अत्यंत रंजक प्रकरण आहे. अरब गणिती, व्यापारी, चर्चचे अधिकारी या सगळ्यांचा भारतीयांची शून्याची कल्पना युरोपमध्ये पसरवण्यास हातभार लागला आहे. शून्यतेची संकल्पना भारतीय उपनिषदात आणि बौद्ध तत्त्वज्ञानात ठळकपणे आलेली होती. पण तिचा सांख्यिक आविष्कार ही संख्याशास्त्राच्या इतिहासातील हनुमान उडी होती. शून्य आणि संख्या लिहिण्याच्या दशांश पद्धतीशिवाय युरोपात औद्याोगिक क्रांती घडणे शक्य नव्हते. अकराव्या शतकात मुस्लीम राज्ये स्पेनपासून मागे हटू लागली. तेथील विद्यापीठांत शिकलेले काही लोक युरोपात पसरू लागले. त्यांनी संख्या लिहिण्याची नवीन पद्धती अरबांकडून शिकून घेतली होती आणि अरबांनी व्यापाराच्या उलाढाली भारतीयांकडून शिकून घेतल्या होत्या. ऑस्ट्रियन अल्बेल्डा मॉनेस्ट्रीमधील व्हिजिला नामक मॉन्कने लिहिलेल्या कोडॅक्स व्हिजिलन्स या ग्रंथामध्ये म्हटले, ‘‘या भारतीयांची बुद्धिमत्ता अतिशय तल्लख आहे. अंकगणित आणि भूमिती याचबरोबर इतर कलांमध्ये त्यांचा हात धरणारी दुसरी जमात नाही. ज्या पद्धतीने ते एक ते नऊ क्रमांक लिहितात आणि त्यांच्या स्थानावरून त्याची किंमत निश्चित करतात ते अतुलनीय आहे.’’
हेही वाचा : उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
जवळपास हजार वर्षे पश्चिमेला रोमपासून ते पूर्वेला कोरियापर्यंतच्या प्रदेशावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव होता. त्याला डालरिम्पलने इन्डोस्पिअर, म्हणजे भारतीय प्रभाव क्षेत्र म्हटले आहे. ज्या मार्गांनी भारतीय व्यापारी, बौद्ध भिक्खू आणि वैदिक संस्कृती आपला प्रसार ज्ञान आणि संपत्तीच्या माध्यमातून सहज करत राहिली त्याला त्याने ‘गोल्डन रूट’ म्हटले आहे. आजही आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये इतिहासकालीन संदर्भ द्यायचे असतील तर बौद्धांचे दाखले देत जावे लागते. आजकाल देशप्रेमाचे ढोल सतत वाजत असतात. आम्हाला आमच्या महान संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे असे म्हणणे ठीक आहे. पण तो अभिमान नेमका कशाचा असला पाहिजे, हे या पुस्तकातून समजते.
या काळात भारत शेजाऱ्यांशी जोडला गेला होता. विविध कल्पनांची देवाणघेवाण सहजतेने होत होती. कुठलाही समाज एकत्र राहणे शिकतो तेव्हाच तो निर्मितीक्षम असतो. त्या काळातील भारत तसा होता हे पुस्तकातून उलगडत जाते. तसे होणे भारताला परत जमेल का, असा प्रश्न लेखकाने शेवटी विचारला आहे?
‘द गोल्डन रोड – हाऊ एन्शन्ट इंडिया ट्रान्स्फॉर्म्ड द वर्ल्ड’
लेखक : विल्यम डालरिम्पल
प्रकाशक : ब्लूम्सबरी प्रकाशन
पृष्ठे : ४९६; किंमत : रु. ९९९
kravindrar@gmail. com