डॉ. उज्ज्वला दळवी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हृदयातल्या विजेरी वाटांतला छोटासा बिघाडही घातक ठरू शकतो. तो जीवघेणा ठरू नये, यासाठी वैद्यकशास्त्र तयार आहेच..
२००३च्या जून महिन्यात फ्रान्समध्ये सॉकरचा आंतरराष्ट्रीय सामना सुरू होता. अटीतटीची लढत.. एक अत्यंत महत्त्वाची खेळी आणि मार्क फो हा कॅमेरूनचा खेळाडू एकाएकी कोसळला. त्याचं हृदय अकस्मात थांबलं. वैद्यकीय पथकानं तोंडानं कृत्रिम श्वासोच्छवास, हृदयाला मसाज हे हृदयसंजीवनी देणारे उपचार तातडीने केले पण अवघा २३ वर्षांचा मार्क वाचू शकला नाही.
त्याला हृदयविकाराचा झटका आला नव्हता. नेहमीच्या हृदयविकारात हृदयाच्या प्लिम्बगमध्ये बिघाड होतो. स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या आकसतात किंवा त्यांच्यात गुठळी अडकून त्या बंद होतात. त्यांच्यातला अडथळा लवकर दूर झाला नाही तर त्यांच्यावर अवलंबून असलेला स्नायूंचा भाग मरून जातो. हृदय कायमचं अधू होतं; उरलेल्या स्नायूच्या मदतीने रडतखडत काम करत राहतं.
मार्कच्या हृदयातल्या विजेच्या तारांचं कामकाज बिघडलं होतं. हृदयाची सगळी हालचाल विजेच्या संदेशांमुळे चालते. हृदयाच्या उजव्या, वरच्या भागातून विजेरी संदेश निघतो आणि खास विजेरी तारांतून हृदयभर, वरून खाली पसरतो. हृदयात रक्त भरणं, ते पंपाने शरीराकडे पाठवणं हे काम त्या विजेरी नियंत्रणामुळे अव्याहतपणे सुरळीत चालतं.
अगस्त्यच्या बाबांचे दोन भाऊ १५-१६ वर्षांचे असताना एकाएकी गेले होते. १५ वर्षांच्या अगस्त्यला बास्केटबॉल खेळताना भोवळ आली. त्याच्या हृदयातली एक बारीकशी विजेरी वाट वरून खाली न जाता वळून मागे येत होती (डब्ल्यूपीडब्ल्यू सिंड्रोम). बास्केटबॉल खेळताना वीजप्रवाह तिच्यातून घाण्याच्या बैलासारखा गोलगोल फिरत राहिला. हृदयपंपाच्या स्नायूंचं क्रमवार काम बिघडलं. रक्त पंपातून शरीराकडे जाईना. भोवळ आली. नशिबाने त्या वेळी ते दुष्टचक्र आपल्याआपण थांबलं. ते जीवघेणंही ठरलं असतं. त्या खोडकर वाटेच्या खाणाखुणा ईसीजीत दिसल्या. तज्ज्ञ डॉक्टरांनी कापाकापी न करता, पायाच्या रक्तवाहिनीतून हृदयापर्यंत कॅथेटर घालून ती चुकलेली वाट बंद करून टाकली. अगस्त्यला कायमचं बरं वाटलं.
काही तरुण माणसांच्या हृदयात, त्या विजेरी वाटांत छोटासाच पण घातक बिघाड असतो. तो जन्मजात असतो आणि कित्येकदा आनुवंशिकही असतो. एरवी सगळं सुरळीत चालतं. पण रक्तातल्या पोटॅशियम-मॅग्नेशियमचं प्रमाण घटलं; अॅड्रिनालीनचं प्रमाण अतिश्रमांनी, ताणतणावामुळे, मानसिक धक्क्यामुळे वाढलं; छातीला जोरात मार बसला तर किंवा कधी कधी कुठल्याही कारणाशिवाय वीजप्रवाह वेडावाकडा धावू लागतो; जागच्या जागी थुईथुई नाचत राहतो (व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन) किंवा बंदच पडतो. तसं शॉर्ट सर्किट झालं, स्विच बंद झाला की हृदय बंद पडतं. वर्षांकाठी लाखांत ४० ते १०० जणांना तसा त्रास होतो.
एका प्रकारात वीजप्रवाह वरून खाली जाताना फार सावकाश जातो (लाँग क्यू-टी). नंतरच्या संदेशाचा आधीच्या संदेशाच्या शेपटीवर पाय पडला की जागच्या जागी थयथयाट होतो. अझिथ्रोमायसिनसारखी अँटिबायोटिक्स, उलटीवरची बहुतेक औषधं, नैराश्यावरची काही औषधं अगदी पूर्णपणे निर्दोष हृदयांतही तसा जीवघेणा थयथयाट व्हायची शक्यता वाढवतात. वीजप्रवाहाच्या तशा वेडय़ा नाचांची इतरही तीनचार जन्मजात, पिढीजात कारणं आहेत. त्यांचा मागोवा ईसीजीने घेता येतो. काही जणांत विजेरी दोषाशिवाय हृदयाचे स्नायूही माजतात (हायपरट्रॉफिक कार्डियोमायोपथी) आणि रक्ताची हृदयातून बाहेर जायची वाटच गळा आवळल्यासारखी बंद करतात. ते जाडजूड स्नायू एकोकार्डिओग्राममध्ये दिसतात.
२०१२मध्ये लंडनला फुटबॉलची मॅच चालली होती. मुव्वाम्बा नावाचा खेळाडू मार्क फोसारखाच कोसळला. पण दोन्ही संघांसोबत सुसज्ज वैद्यकीय पथकं होती. प्रेक्षकांत एक निष्णात हृदयरोगतज्ज्ञ होते. क्षणाचाही विलंब न लावता हृदयसंजीवन-उपचार सुरू झाले. रुग्णालयात तातडीने पोहोचेपर्यंत मुव्वाम्बाला विजेरी थयथयाट थांबवणारे १५ शॉक (डीफिब्रिलेशन) द्यावे लागले. तो पूर्णपणे बरा झाला.
पस्तिशीच्या खालच्या लोकांचं तसं विजेरी गोंधळामुळे बंद पडलेलं हृदय एरवी उत्तम स्थितीत असतं. हृदयसंजीवनाने ते पुन्हा सुरू झालं तर ते सुरळीत काम करतं. रक्ताभिसरण बंद पडण्याचा मेंदूवर परिणाम होण्यापूर्वी विजेरी गोंधळ निस्तरला तर जीवन चालू राहतं. म्हणून तसे विजेरी गोंधळ ताबडतोबच निस्तरणं महत्त्वाचं असतं.
हल्ली ऑलिम्पिक्स, एशियाड वगैरे मोठय़ा क्रीडोत्सवांत भाग घेणाऱ्यांच्या हृदयाचे तपास आधीपासून होतात. आंतरविद्यालयीन सामन्यांसाठीही मैदानावर तज्ज्ञ वैद्यकीय पथकं हजर असतात. त्यांच्याकडे विजेरी गोंधळ थांबवणारं स्वयंनियंत्रित यंत्र (ऑटोमॅटिक एक्स्टर्नल डीफिब्रिलेटर) असतं. हृदयात विजेरी गोंधळ नसला तर ते शहाणं यंत्र शॉक देत नाही. पण गोंधळ असला तर शॉक दिला जातो; त्याने हृदयातली सगळी विजेरी कामं क्षणभर पूर्णपणे थांबतात आणि नंतर हृदयाचा वरून खाली वाहणारा, नेहमीचा, शहाणा प्रवाह निमूटपणे सुरू होतो. त्या यंत्राची किंमत भारतात ५० हजार ते दीड लाख रुपयांच्या दरम्यान आहे. सैन्यात आणि अग्निशमन दलांत हृदयसंजीवन शिकलेले जवानही असतात आणि गरजेला डीफिब्रिलेटर्सही असतात. तिथे अचानक हृदय थांबून होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी आहे.
खिशात घेऊन फिरण्याजोगे किंवा कातडीखाली बसवता येणारे, बॅटरीवर चालणारे, स्वयंनियंत्रित डीफिब्रिलेटर आता मिळतात. त्यांची किंमत साडेतीन ते साडेपाच लाख रुपये असते. हृदयविजेच्या थयथयाटाची शक्यता मोठी असली तर ते बसवून घेतल्यामुळे जीव वाचतो. पण डीफिब्रिलेटर बसवूनही खेळाडूंना क्रीडा स्पर्धात भाग घ्यायची परवानगी मिळत नसे. एका तरुण खेळाडूने येल विद्यापीठाच्या डॉक्टर लॅम्पर्टना कळवळून विचारलं, ‘‘मी जोखीम पत्करून खेळायला तयार आहे. तरी मला परवानगी मिळणार नाही का?’’ त्यानंतर डॉ. लॅम्पर्टनी डीफिब्रिलेटरवाल्या ४४० खेळाडूंचा अभ्यास केला. खेळादरम्यान त्यांच्या हृदयात बारा-बारा वेळा विजेरी गोंधळ झाले पण डीफिब्रिलेटरने ते बिनबोभाट निस्तरले. खेळ सुरळीत चालू राहिला. म्हणून २०१५पासून वाकडय़ा चालीची हृदयं असलेल्यांना डीफिब्रिलेटर बसवून मोठय़ा स्पर्धातही भाग घेता येतो. २०२२मध्ये, मार्क फोच्या मृत्यूनंतर एकोणीस वर्षांनी, मुव्वाम्बाच्या निवृत्तीनंतर नऊ वर्षांनी, डेन्मार्कचा एकतीस वर्षांचा एरिक्सन नावाचा फुटबॉलपटू डीफिब्रिलेटर बसवून वल्र्ड-कपसाठी खेळला.
तसले विजेरी गोंधळ तरुण माणसांतच होतात असं नाही. पण जन्मजात दोषांमुळे होणारा विजेरी गोंधळ साधारण पस्तिशीनंतर कमी होतो. नेहमीच्या हृदयविकाराचा हातभार वाढतो. रक्तवाहिन्यांत अडथळे आल्यामुळे स्नायूंना प्राणवायू मिळत नाही. त्या कासाविशीमुळे वीजप्रवाह हृदयात थयथयाट (व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन) करतो.
पासष्टीच्या पुढे व्यायाम करताना, धावताना-चालताना हृदय एकाएकी थांबणं फार क्वचित, वर्षांकाठी लाखांत दोघांतिघांतच होतं. पण नियमित व्यायाम करणाऱ्यांचं हृदय एरवी निर्दोष असतं. वेळीच डीफिब्रिलेटर वापरला तर पुन्हा सुरळीत कामाला लागतं. म्हणून नियमित व्यायाम करणं केव्हाही चांगलंच.
जर कुटुंबात अगस्त्यच्या काकांसारखे अपमृत्यू झालेले असले; कारणाशिवाय धडधडलं, धाप लागली; अंधारी-भोवळ आली; प्रचंड थकवा जाणवला तर लहान वयातही ईसीजी करून घ्यावा. दोष दिसला तर काही पथ्यं सदोदित पाळावी. अतिश्रम टाळावे. व्यायाम करावा पण अटीतटीच्या स्पर्धा नकोत. उलटय़ाजुलाब होत असले तर रक्तातलं पोटॅशियम-मॅग्नेशियमचं संतुलन सांभाळायला डॉक्टरांची, रुग्णालयाची मदत घ्यावी.
शाळकरी मुलांत, कॉलेजकुमारांत ईसीजी-एको सर्रास काढला जात नाही. पण आपत्ती केव्हा, कुणावर, कुठे येईल त्याची खात्री नसते. कुणाचं हृदय घरीच किंवा रस्त्यावर थांबलं तर काय करायचं? तशावेळी तिथे हजर असलेल्या, प्रत्येक हृदयसंजीवन-जाणत्याने क्षणाचाही विलंब न लावता मदतीला धावून जावं. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत संजीवन-उपचार सुरू ठेवावे. अमेरिकेच्या काही शहरांत तशा मदतीचा अभ्यास झाला. ज्या भागांत संजीवन-जाणते अधिक होते आणि उत्स्फूर्तपणे मदत मिळाली तिथे अधिक जीव वाचले. म्हणून पोलिसांनी; सुरक्षारक्षकांनी; शिक्षकांनी हृदयसंजीवनाचा (कार्डिअॅक रीससिटेशन) कोर्स केलेला असावा. मोठय़ा शहरांत, रेल्वे-स्टेशन, मॉल्स वगैरेमध्ये डीफिब्रिलेटर यंत्रं जय्यत ठेवली तर अधिक जीव वाचतील.
हृदयाचा, अत्यंत महत्त्वाचा कारभार अव्याहत चालवायचं काम निसर्गाने चंचल विजेवर सोपवलं. अब्जावधी हृदयांत विजेने ती जबाबदारी व्यवस्थित पेलली. जिथे ती वेडीवाकडी वागली तिथे तिला शिस्त लावण्यासाठी माणसाने पुन्हा वीजच वापरली. विज्ञानाच्या वाटा अद्भुतातून जातात.