‘शरीर ही एक निष्ठुर जागा (जग) आहे.’ – मिशेल फुको
युटोपिया म्हणजे अस्तित्वात नसलेलं वांच्छित जग. फ्रेंच विचारवंत मिशेल फुको म्हणतो की अतिप्राचीन काळापासून काही युटोपिया मानवी हृदयावर असे कोरले गेलेले आहेत की अभावग्रस्त, कष्टप्रद, क्षणभंगुर जगाला सहजप्रतिक्रिया देताना मानवी मन अबोधपणे त्यांचा सहारा घेत असतं. त्यामुळे आज देखील ‘स्वर्ग’, ‘सुवर्णयुग’, ‘सिटी ऑफ गॉड’, ‘अमेरिकन ड्रीम’, ‘ Gute Tage kommen’ यांसारखे युटोपिया सहजपणे भुरळ पाडतात. धर्मकारण, अर्थकारण, राजकारण सारख्या क्षेत्रात तर अस्तित्वात नसलेल्या अशा वांच्छित वस्तूंना मध्यवर्ती स्थान आहे. समाजमनावर कोरलेल्या या प्राथमिक स्वप्नांचं भांडवल कसं करता येईल यासाठी विविध क्प्त्या वापरल्या जातात. थोडक्यात बाजारीकरणात, राजकारणात, विशेषकरून धर्मकारणात अस्तित्वात असलेल्या गोष्टींपेक्षा अस्तित्वात नसलेल्या वांच्छित गोष्टींची किंमत जास्त असते.
खरंतर, प्राप्त जगाचं ( topia) आकलन आणि अस्तित्वात नसलेल्या वांच्छित जगाची कल्पना (utopia), हे दोन पैलू प्रत्येक तत्त्ववेत्त्याच्या ठायी आढळून येतात. किंबहुना या द्रष्ट्या पैलूंमुळेच ‘तत्त्वज्ञ’ हा ‘तज्ज्ञा’च्या पुढचं पाऊल ठरतो. कार्ल मार्क्सच्या बाबतीत म्हणायचं झालं तर समाजवैज्ञानिक मार्क्स आणि द्रष्टा-युटोपिक मार्क्स अशी विभागणी केली जाते. तत्कालीन युरोपियन समाजाविषयी मार्क्सनं केलेली वैज्ञानिक मांडणी त्याच्या वैचारिक विरोधकांनादेखील मान्य करावी लागते. ती वस्तुनिष्ठ असल्यानं पडताळून पाहता येते. मात्र युटोपिक मार्क्सनं दर्शविलेल्या पर्यायी जगाविषयी अर्थात युटोपियाविषयी तसं म्हणता येणार नाही. युटोपिक पैलू ‘सायंटिफिक’ नसतात. युटोपिक पैलू वैज्ञानिक पद्धतीनं पडताळून पाहता येत नाहीत; कारण ते अजून अस्तित्वात आलेले नसतात. त्यामुळे युटोपिक मार्क्सविषयी त्याच्या समर्थकांतदेखील एकवाक्यता आढळून येत नाही.
पाश्चात्त्य परंपरेत अनेक तत्त्वज्ञांनी युटोपियांची मांडणी केलेली आहे. धर्मशास्त्र, मिथकशास्त्राधिष्ठित आणि इहवादी तत्त्वज्ञानांवर आधारित युटोपियांना वास्तवात उतरवण्यासाठी इतिहासात अनेक प्रयोग झालेले आहेत. पंधराव्या शतकापासून तर पाश्चात्य तत्त्वज्ञानात जणूकाही युटोपियांची स्पर्धा लागलेली दिसते. काही तत्त्वज्ञ युटोपिक पैलूंच्या बाबतीत अंतिमतेचा, परिपूर्णतेचा आणि अचूकतेचा दावा करताना दिसतात. त्यामुळे तत्त्वज्ञान आणि धर्मश्रद्धा यांतला ‘सॉक्रेटिक’ भेद उरत नाही. काही तत्त्ववेत्त्यांचे अनुयायी तर तत्त्ववेत्त्याला पुरून दैवी प्रेषितच जन्माला घालतात. प्राप्त जगाशी निर्णायकपणे फारकत घेणारे आणि परिपूर्णतेचा, अंतिमतेचा, अचूकतेचा दावा करणारे ‘तत्त्वज्ञ- प्रेषित’ हे टोपिया आणि युटोपिया यांतील तत्त्वज्ञानात्मक अवकाशाला स्थान देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञानातल्या युटोपियांवर आधारलेले राजकीय प्रयोग मानवी स्वातंत्र्याला मारक, विध्वंसक आणि टोटॅलिटेरियन ठरतात. त्यामुळे प्राथमिक अबोध युटोपिया आणि तत्त्वज्ञानातील अंतिमतेचा, परिपूर्णतेचा आणि अचूकतेचा दावा करणारे युटोपिया यांच्यात तसा गुणात्मक भेद राहत नाही. प्रस्तुत लेखाचं उद्दिष्ट अबोध युटोपिया आणि तत्त्वज्ञानातील युटोपिया यांमधला मूलभूत फरक अधोरेखित करणं हा आहे.
(अ) शरीर : युटोपियाचं जन्मस्थान/ शत्रुस्थान :
टोपिया या ग्रीक शब्दाचा अर्थ अस्तित्वात असलेली जागा किंवा जग असा होतो. युटोपियाचा मूळार्थ अस्तित्वात नसलेली जागा इतकाच होतो. मात्र रूढार्थाने युटोपियाचा अर्थ ‘अस्तित्वात नसलेलं वांच्छित, परिपूर्ण, शाश्वत, पर्यायी जग’. तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत सांगायचं झालं तर टोपिया अर्थात प्राप्त जग हा द्वंद्वात्मक, अंतर्विरोधात्मक आणि गतिशील घटितांचा ऐतिहासिक अवकाश समजला जातो. मात्र युटोपिया म्हणजे असा अवकाश जिथं सगळे कलह, द्वंद्व, संघर्ष आणि अंतर्विरोध संपुष्टात येतात. द्वंद्वात्मक तत्त्वांचं ऐक्य होऊन चिरशांती नांदते. एका बाजूला, टोपिया हा गतिशील ‘बनण्याचा’ (dialectical becoming) अवकाश समजला जातो. तर दुसऱ्या बाजूला, युटोपिया म्हणजे गतिशील बनण्याच्या प्रक्रियेचा शेवट होऊन स्थितिशील ‘असण्याचा’ ( non- dialectical being) अवकाश. युटोपियात इतिहासाचा शेवट झालेला असतो. थोडक्यात, टोपिया आणि युटोपिया हे विरुद्धार्थी शब्द एकमेकांपासून फारकत घेतलेल्या दोन परस्परविरोधी जगांचा निर्देश करतात.
पाश्चात्त्य परंपरेतील युटोपियांच्या उत्पत्तीविषयी मिशेल फुको विशद करतो की मनुष्याचं शरीर किंवा शरीराची भौतिकता हाच युटोपिया या संकल्पनेचा प्रारंभबिंदू आहे. त्यादृष्टीनं मनुष्याचं शरीर आद्या टोपिया ठरतं. शरीर या प्रथम टोपियापासून आणि नंतर त्याच्या विरोधात सगळे युटोपिया उत्पन्न झालेले आहेत. फुको नमूद करतो की शरीर ही ‘एक निष्ठुर जागा किंवा जग’ ठरतं. कारण शरीराकडे एखाद्या ओझ्यासारखं किंवा तुरुंगासारखं बघितलं गेलं आहे. शरीराला सोडून ‘इतरत्र’ जाता येत नाही. जणूकाही शरीरात अडकून राहाणं ही माणसाला मिळालेली शिक्षा असावी.
उलटपक्षी, युटोपिया हा असा अवकाश जिथं आपल्याला ‘शरीररहित शरीर’ (le corps incorporel) अनुभवता येतं. असं शरीर जे पूर्णत: सुंदर, पारदर्शक, अक्षर, शाश्वत, विराट, प्रकाशापेक्षा गतिमान आणि इच्छेप्रमाणे दृश्य-अदृश्य होणारं असतं. मानवी मनाच्या तळाशी असलेल्या अबोध युटोपियांमुळे शरीराविषयी या प्राथमिक कल्पना किंवा सहजप्रतिक्रिया निर्माण होतात. इथं सहजप्रतिक्रिया म्हणजे तत्त्वज्ञानात्मक दुव्याला वळसा घालून दिलेली ‘नैसर्गिक’ प्रतिक्रिया.
फुकोनं मांडलेल्या प्राथमिक युटोपियांनुसार मनुष्याला शरीर हवं आहे पण शरीराचं शरीरपण, जडत्व, क्षणभंगुरता आणि सापेक्षता नको आहे. एका प्रकारे, मनुष्याला ‘शरीररहित शरीर’ हवं आहे. पुढे जाऊन फुको स्पष्ट करतो की आदिम काळापासूनचा चालत आलेला हा ‘शरीररहित शरीर’चा युटोपिया दुसरं तिसरं काही नसून आत्म्याचं वैश्विक मिथक आहे जे मनुष्याच्या हृदयात खोलवर कोरलं गेलं आहे. जे मनुष्याला शरीराविरोधी विचार करायला प्रवृत्त करतं. आत्मा हा अक्षर, सुंदर, शुद्ध, पवित्र आहे ज्याला मनुष्याचं ‘मातीचं’ नश्वर शरीर अशुद्ध करत असतं. थोडक्यात, आत्मा म्हणजेच उपरोक्त ‘शरीररहीत शरीर’च.
प्राथमिक युटोपियांचं विरोधाभासी चरित्र रेखाटताना फुको म्हणतो की वास्तवात सगळे युटोपिया- ज्यांच्या मदतीनं मनुष्य शरीराला चकवा देण्याचा प्रयत्न करतो- त्यांचं जन्मस्थान शरीर आहे. सगळे युटोपिया शरीरातूनच जन्मतात आणि कालौघात शरीरद्रोही बनतात. त्यादृष्टीनं शरीर सगळ्या युटोपियांचा खरा नायक आणि खलनायकदेखील आहे. ‘शरीरपण नसलेलं शरीर’ हा प्राचीनतम युटोपिया वैश्विक दंतकथा आणि मिथकांमध्ये आढळतो. धार्मिक सूक्ष्म तत्त्वचर्चेत ‘शरीरेतर तत्त्व’ गृहीत धरलं जात असलं तरी सर्वसामान्यांच्या पातळीवर जवळपास सर्व धार्मिक युटोपियांमध्ये ‘सदेह’ वास्तव्याची कल्पना आढळते.
(ब) युटोपियात घेतलेली आंधळी उडी :
मनाच्या तळाशी असलेल्या अबोध युटोपियांच्या मदतीनं अभावग्रस्त जीवनाला प्रतिक्रिया देताना मनुष्याला विसर पडतो की त्याच्या युटोपियाचं जन्मस्थान शरीर अर्थात भौतिक जग आहे. त्यामुळे असे अबोध युटोपिया सरळसरळ शरीराचे आणि एकूणच भौतिकतेचे शत्रू ठरतात. उदाहरणार्थ, धार्मिक प्रवचनांमध्ये सतत बिंबवलं जातं की शरीर हे नाशिवंत आहे, भाड्याचं घर आहे. हा वेगळा मुद्दा आहे की परलोकवादी युटोपिया बिंबवणारे लाखोंनी मानधन घेऊन खासगी विमानानं प्रवास करतात आणि लौकिक जीवनातच अलौकिक सुविधा उपभोगतात! सर्वसामान्य लोक अबोध युटोपियांच्या आहारी सहजपणे जातात कारण टोपिया आणि युटोपिया मधील संक्रमणावस्थेचा तत्त्वज्ञानात्मक अवकाश सर्वसामान्यांना उपलब्ध नसतो. त्या अवकाशाची मक्तेदारी धार्मिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक शक्ती स्वत:कडे ठेवतात आणि युटोपिया जन्माला घालतात. आणि मानवी मनाच्या सहजप्रवृत्तीसाठी आयते युटोपिया उपलब्ध करून देतात. त्यामुळे तत्त्वज्ञानात्मक अवकाश न लाभलेले तत्त्वज्ञेतर ‘टोपिया’तून सरळ युटोपियात आंधळी झेप घेताना दिसतात. उदाहरणार्थ, विचारशीलतेचा, चिकित्सेचा आणि समग्र आकलनाचा तत्त्वज्ञानात्मक अवकाश – अर्थात ‘एटोपिया’ (atopia)चा अवकाश- उपलब्ध नसलेल्या दारिर्द्यात खितपत पडलेल्यांना युटोपिक आश्वासन दिली की उद्या सगळे श्रीमंत होणार आहेत, तर अशा युटोपिक आश्वासनांवर सहजप्रवृत्तीतून ते विश्वास ठेवतात. त्यामुळे टोपिया आणि युटोपिया यातील ‘एटोपिक’ दुवा तत्त्वज्ञ आणि तत्त्वज्ञेतरांमधील भेद निर्माण करतो. या तत्त्वज्ञानात्मक दुवाच्या अभावी प्राप्त अभावग्रस्त जगातून अस्तित्वात नसलेल्या परिपूर्ण आणि शाश्वत जगाकडे घेतलेली आंधळी उडी पराधीनत्वाचं द्याोतक ठरते. कारण मानवी मनानं अभावग्रस्त जगाला अशा प्रकारे दिलेल्या सहजप्रतिक्रियेत ‘एटोपिया’चा अवकाश दिसत नाही. त्यामुळे या सहजप्रतिक्रियेला पलायनवादी, परलोकवादी आणि विनाशवादी ( nihilistic) म्हणता येईल. प्राप्त टोपिया आणि कल्पित युटोपियामधील ज्ञानात्मक अवकाशाचा दुवा – ज्याला एटोपिया म्हणून संबोधले आहे- तो तत्त्वज्ञांच्या युटोपियांना तत्त्वज्ञेतरांच्या अबोध युटोपियांपासून वेगळा करतो.
थोडक्यात, प्रत्येकाच्या ठायी प्राप्त जगाविषयीची विशिष्ट आकलन आणि अस्तित्वात नसलेल्या वांच्छित जगाची कल्पना असते. फरक एवढाच की तत्त्वज्ञ प्राप्त जगाच्या वैज्ञानिक आकलनाचं आणि युटोपियाचं पद्धतीशास्त्र नमूद करतात. प्राप्त जगापासून अस्तित्वात नसलेल्या वांच्छित जगाकडे जाताना वाटेत तत्त्वज्ञानात्मक अवकाश लागतो, ज्यामुळे तत्त्वज्ञानातील युटोपियांचा बोध होतो. कुठल्याही तत्त्वज्ञानाची व्याप्ती आणि प्रस्तुतता जगाविषयीच्या वैज्ञानिक आणि वस्तुनिष्ठ आकलनावर आणि युटोपियाच्या वैश्विकतेवर अवलंबून असते. त्यासाठी तत्त्ववेत्त्यांनी टोपिया आणि युटोपिया यात असणारा दुवा एटोपियाचा अवकाश मान्य करणं आवश्यक असतं. सॉक्रटिसच्या बाबतीत युटोपिकऐवजी एटोपिक विशेषणाचा प्रयोग केला जातो. पुढील लेखांकात ‘एटोपिक सॉक्रेटिसविषयी चर्चा केली जाईल.