कोविडच्या साथीने जगाला साधारण अडीच-तीन वर्षे वेठीस धरले. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने, आता कोविड ही जागतिक आणीबाणी राहिलेली नसल्याचे जाहीर केले. पण तरीही ही साथ नेमकी कशामुळे सुरू झाली, त्यामागचे कारण नैसर्गिक होते की मानवनिर्मित याविषयीच्या तर्कवितर्काना पूर्णविराम मिळालेला नाही. संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली ही एकमेव साथ नव्हती, याआधीही अनेक साथींभोवती जैवरासायनिक युद्धाच्या संशयाचे धुके दाटले. इसवीसनपूर्व काळापासून आजवर शत्रूविरोधात विविध प्रकारे वापरले गेलेले हे अस्त्र, त्यात काळाच्या ओघात होत गेलेले बदल, त्याभोवती गुंफण्यात आलेले राजकारण आणि अर्थकारण यांचा अभ्यासपूर्ण लेखाजोखा दाखल्यांसहित मांडणारे ‘द इन्व्हिजिबल एनिमी’ हे पुस्तक येत्या २३ मे रोजी प्रकाशित होणार आहे. गिरीश कुबेर लिखित ‘युद्ध जिवांचे’ या मूळ मराठी पुस्तकाचा हा इंग्रजी अनुवाद शुभा पांडे यांनी केला आहे.
इसवीसनपूर्व काळात जैवरासायनिक हल्ल्यांत अनेकदा जलस्रोत लक्ष्य केले जात. विविध नैसर्गिक घटकांचा वापर करून गुंगी आणणारे वायू आणि विषारी धुरापर्यंतची विविध अस्त्रे कालौघात विकसित करण्यात आली. शत्रुराष्ट्रांवर त्यांचे प्रयोग केले गेले. तेव्हापासून आजवर ही अस्त्रे टप्प्याटप्प्याने कशी विकसित होत गेली. अमेरिका, रशिया, इंग्लंडसारख्या शक्तिशाली देशांबरोबरच, चीन, जपानसारख्या आशियाई देशांनीही या क्षेत्रात कोणते प्रयोग केले, त्याचे बळी कोण ठरले, याची मीमांसा हे पुस्तक करते. या प्रयोगांतून निर्माण झालेल्या उत्पादनांच्या चाचण्यांसाठी गरीब देश नेहमीच गिनिपिग ठरले. आपणच जगाचा त्राता असल्याच्या आविर्भावात असणाऱ्या अमेरिकेने व्हिएतनाम युद्धात जैवरासायनिक अस्त्रांचा वापर केल्याने झालेले दूरगामी परिणाम हे या प्रयोगाचे ठळक उदाहरण. अशा अनेक प्रयोगांचे दाखले या पुस्तकात देण्यात आले आहेत.
सुरुवातीला केवळ सामरिक कारणांसाठी वापरली गेलेली ही अस्त्रे पुढे याच प्रगत देशांतील बडय़ा आणि राजकीय वरदहस्त असलेल्या कंपन्यांनी स्वत:च्या तुंबडय़ा भरण्यासाठी वापरली. ज्यांच्या शिरावर लोकांचे जीव वाचविण्याची जबाबदारी, त्या औषध कंपन्यांनीच मानवी आरोग्याला घातक असणारी औषधे तयार केली आणि ती खपविण्यासाठी पुन्हा तिसऱ्या जगात बाजारपेठा ‘निर्माण’ करण्यात आल्या. आधी ‘सार्स’ आणि नंतर ‘कोविड-१९’च्या काळात काही विशिष्ट औषधे आणि इंजेक्शन्सच्या मात्रा मिळविण्यासाठी लागलेल्या रांगा, त्यांचा काळाबाजार आणि पुढे याच उपचारांमुळे झालेले गंभीर दुष्परिणाम, अनेकांना गमावावे लागलेले जीव, यानिमित्ताने आजच्या पिढीने या ‘बाजारपेठ निर्मिती’चा अनुभव घेतला आहेच. पुस्तकात मांडलेला घटनाक्रम हादरवणारा आणि त्याच वेळी सावध करणाराही आहे. आता पूर्वीसारखे गंभीर रोग होऊन मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह शत्रुराष्ट्राच्या हद्दीत टाकण्याची वा विषारी वायू सोडण्याची गरज राहिलेली नाही. औषधांच्या आवरणातून, साथींतून ही अस्त्रे जगभर पेरण्याची सोय उपलब्ध आहे. ही ‘अस्त्रे’ खरेदी करायची की नाहीत, त्यांच्यापासून दूर कसे राहायचे, हे आपल्या सुज्ञपणावर अवलंबून आहे. या सुज्ञपणापर्यंत पोहोचण्यासाठी हे पुस्तक नक्कीच साहाय्यभूत ठरेल. २५६ पानांच्या या पुस्तकाची किंमत ४९९ रुपये असून ते ‘हार्पर कॉलिन्स इंडिया’ने प्रकाशित केले आहे.