हिनाकौसर खान
चित्रपटाद्वारे बेमालूम ‘प्रोपगंडा’ घडवण्याचा वापर मुस्लीम समाजच शत्रू म्हणून चितारण्यासाठी का केला जातोय?
रामचंद्र गुहा यांच्या ‘इंडिया आफ्टर गांधी’ या ८०० पानी पुस्तकातील हा शेवटचा परिच्छेद – ‘‘भारत हे एक राष्ट्र आहे, याचा विचार करताना आपण एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे-आजच्या भारताचे भवितव्य परमेश्वराच्या हातात नसून, सामान्य माणसाच्या हातात आहे. जोपर्यंत भारतीय संविधान ओळखू न येण्याइतपत बदलले जात नाही, जोपर्यंत निवडणुका नियमितपणे व योग्य पद्धतीने होत राहतील, जोपर्यंत व्यापक अर्थाने धर्मनिरपेक्षतेचे वातावरण टिकवले जाईल, जोपर्यंत देशातील लोक आपल्या पसंतीची भाषा बोलू व लिहू शकतात, जोपर्यंत सर्वसमावेशक बाजारपेठ अस्तित्वात आहेत, जोपर्यंत बऱ्यापैकी नागरी प्रशासन व सैन्यसेवा उपलब्ध आहे; आणि हो! हेही विसरून चालणार नाही की, जोपर्यंत हिंदी सिनेमे सर्वत्र पाहिले जातात व त्यातील गाणी ऐकली जातात, तोपर्यंत भारत या राष्ट्राचे अस्तित्व राहील.’’
गुहा म्हणतात, त्याप्रमाणे या देशाला एकसंध ठेवण्याचं काम भारतीय सिनेमांनी बऱ्याच प्रमाणात केलं. पण आता ती जवळीक काही ठरावीक सिनेमांमुळे गढूळली जात असल्याचं दिसतंय. सिनेमांचा जनमानसावरील प्रभाव आपल्याला नवा नाही. सिनेमे बघून त्यातल्या नायक-नायिकांच्या वेशभूषा-केशभूषा कॉपी करणारे, वैयक्तिक आयुष्यात आत्महत्या करणारे, पळून जाऊन लग्न करणारे किंवा अगदी पोटच्या मुलांना जीवे मारणारे अशीही उदाहरणं आढळतात. सिनेमाचा हा चांगला-वाईट परिणाम आतापर्यंत व्यक्तिगत पातळीपुरता मर्यादित होता. मात्र आता प्रोपगंडा घेऊन निर्माण झालेले काही ठरवीक सिनेमे त्यातील नकारात्मक परिणामाला सामूहिक बळ देण्याचं काम करू लागलेत.
‘केरळमधील ३२ हजार स्त्रियांना इस्लाममध्ये धर्मातरित करून, त्यांना सीरिया व इतर ठिकाणी आयसिसमध्ये अतिरेकी म्हणून भरती करण्यात आले’; अशा कथित घटनेवर आधारलेल्या सिनेमाच्या ट्रेलरमुळे सध्या खळबळ उडाली आहे. सिनेमाचे लेखक दिग्दर्शक सुदीप्तो सेन हा सिनेमा सत्य घटनेवर आधारला असल्याचा दावा करत आहेत. एखाद्या राज्यातील ‘३२ हजार स्त्रियांचं धर्मातर’ हा प्रचंड मोठा आकडा आहे. तो कुठून आला? हे घडत असताना त्यासंबंधी एकही तक्रार का नोंदवलेली नाही? माध्यमांतही बातमी का दिसत नाही? अशा कुठल्याच मुद्दय़ाची स्पष्टता किंवा पुरावा न देता सिनेकर्ते ही कथा खरी असल्याचा प्रचारी ढोल पिटत राहिले.
दिग्दर्शकाने ‘त्यांच्या स्तरावर’ संशोधन करून हा आकडा काढल्याचं काही मुलाखतींमध्ये म्हटलंय. पण वैयक्तिक संशोधन म्हणजे काय? त्याची विश्वासार्हता काय? संशोधनकर्ते त्या ‘३२ हजार’ स्त्रियांपैकी किती जणींना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटले? दिग्दर्शकाला त्यांच्यापर्यंतचा अॅक्सेस कसा मिळाला? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
या प्रकरणात केरळचे एक खासदार आणि एका सर्वसामान्य नागरिकाने आयसिसमध्ये भरती झालेली दहा नावं तरी सांगा म्हणून आव्हान दिलं, शशी थरूर यांनी तर एक कोटीचं बक्षीस जाहीर केलं मात्र अद्याप कुणीही पुढं आलं नाही.
केरळचे मुख्यमंत्री पिनरायि विजयन हा प्रोपगंडा सिनेमा असल्याचं म्हटलं आहे. ते जे म्हणतात ते संक्षिप्तपणे असं – ‘‘ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येतं, की हा चित्रपट संघ परिवाराच्या प्रोपगंडानं भरलेला आहे. धर्मनिरपेक्षतेची भूमी असलेल्या केरळमधील सहिष्णू वातावरण नष्ट करण्याचा आणि धार्मिक उग्रवादाचे केंद्र बनवण्याचा हा प्रयत्न आहे. ‘लव्ह जिहाद’ ही संकल्पना तपास यंत्रणा, न्यायालय आणि अगदी केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळलेली आहे. तरीही ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा पुढे रेटणं हा त्यांच्या नियोजित हालचालींचा भाग आहे. केरळमधील ३२ हजार महिलांचे धर्मातर करून इस्लामिक राज्य तयार करण्यात आल्याची चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसणारी मांडणी हा उघडउघड खोटारडेपणा आहे. ही खोटी कथा संघाच्या कारखान्याची निर्मिती आहे.’’ असं म्हणत विजयन यांनी खोटय़ा प्रचाराचा मुद्दा अधोरेखित केला आहे.
प्रचार आणि प्रोपगंडा हे शब्द चटकन समानार्थी वाटतात. मात्र त्या शब्दच्छटांचा नीट विचार केला तर त्यात बरंच अंतर जाणवतं. ‘प्रचार’ हा जाहीर किंवा माहीत असलेली गोष्ट वारंवार सांगून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रकार आहे. ‘प्रोपगंडा’ हा थेट विचारांवर परिणाम साधणारा प्रकार आहे. वरवर दोन्ही शब्दांचा वापर लोकांना एका विशिष्ट प्रकारे विचार करायला लावण्यासाठी होतो, मात्र प्रचाराच्या स्वरूपात काय चालू आहे हे प्रचार करणाऱ्यांना आणि त्याचे साक्षीदार असणाऱ्या दोघांनाही माहीत असतं. तर प्रोपगंडा ही गोष्टच मुळी बेमालूमपणे घडवली जाते. प्रचाराच्या तंत्रानं माणसावर येऊन आदळणारी माहिती लोक स्वत:ची चाळणी लावून, स्वीकारू वा नाकारू शकतात. प्रोपगंडाच्या बाबतीत पहिली गोष्ट म्हणजे लोकांना सहजासहजी ते लक्षातच येत नाही. तो थेट विश्लेषणशक्ती खुंटवण्याचं काम करतो. जर्मनीमध्ये ज्यू लोकांना, तर दक्षिण आफ्रिकेत आणि नागरी युद्धात अमेरिकेत कृष्णवर्णीयांना शत्रू मानलं गेलं. अशा प्रकारे राजकीय हेतूनं प्रेरित प्रोपगंडाने एखाद्या विशिष्ट समुदायाला शत्रू बनवल्याच्या घटना जगभर घडल्या आहेत.
आपल्याकडे असं काही घडत असल्याचं तुम्हाला जाणवतं का? या समाजाविरुद्ध सतत विखारी नॅरेटिव्ह का मांडावं लागत आहे? कशासाठी ही एवढी उठाठेव? बहुसंख्य हिंदू समाज असलेल्या या देशात अल्पसंख्य मुस्लीम समजाविषयीची भीती का? देशात इतके प्रश्न आ वासून उभे असताना सतत मुस्लीम समाजच शत्रू म्हणून का चितारला जातोय? नेमक्या प्रश्नांपासून लक्ष भरकटवण्याचा हा प्रकार नाही का? या सगळय़ाची उत्तरं तातडीने शोधण्याची वेळ आलीये.
बहुतांश भारतीयांच्या मुस्लिमांविरुद्धच्या भावना गढूळलेल्या असताना अशा प्रकारचा प्रचारकी सिनेमा त्यांच्या भावना आणि प्रतिक्रिया उद्दीपित करण्याचं काम करतो, हे चित्र चिंताजनक आहे. भारतीय प्रेक्षक सिनेमा पाहताना कॅमेऱ्याची नजर विसरतो आणि पडद्यावरील कथा हेच त्याचं वास्तव असल्याचा विश्वास ठेवू लागतो. पण हा विश्वास खोटय़ा कथानकांबद्दल निर्माण झाल्यास काय करायचं? घरातलं लहान मूल खोटं बोललं तरी आपण त्याला दटावतो, कधी शिक्षा करतो. पण खोटी नॅरेटिव्हज् राजरोसपणे मांडणाऱ्या सिनेकर्त्यांना कुणीच जाब विचारत नाही. मग त्या खोटय़ा माहितीला सत्य मानून त्याला प्रक्षोभक प्रतिसाद देणाऱ्या लोकांच्या कृतीची जबाबदारी कुणाची? हे सगळंच बेलगाम आहे का?
माध्यमांमधून खोटी कथानकं पसरवली जात असताना त्याच माध्यमातून फॅक्टचेक करणारी काही मंडळी सत्य मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘द देशभक्त’, ‘आल्ट न्यूज’ यांनी केलेले रिपोर्ट पाहिल्यावर हे सिनेकर्ते करत असलेला दावा किती खोटा आहे हे उघड होतं. मात्र तिथंही बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्य असा उभा दावा आहे. त्यामुळे फॅक्ट्स मांडणाऱ्यांची शक्तीदेखील अपुरी ठरते.
अशा वेळी रामचंद्र गुहा यांच्या परिच्छेदाकडे पुन्हा वळावंसं वाटत. त्यातले सर्वच मुद्दे अलीकडे कमी-अधिक प्रमाणात प्रभावित होत असलेले दिसतात, मात्र गुहा जेव्हा सिनेमा आणि गाण्यांवर राष्ट्रीय एकसंधतेच्या दृष्टीने विश्वास टाकतात तेव्हा ते केवळ त्या माध्यमावर विश्वास ठेवत नाहीत, तर त्यासमोर असलेल्या प्रेक्षकांच्या, म्हणजेच सामान्य माणसांच्या शहाणपणावरदेखील विश्वास दाखवत आहेत, असं जाणवतं. सिनेमा हे माध्यम निश्चितच प्रभावी आहे. कधी कधी ते प्रचारी होतं, किंवा प्रोपगंडा घेऊन सामोरं येतं. पण, त्यातून पुढं केला जाणारा विशिष्ट विचार किंवा विशिष्ट नॅरेटिव्ह ऐकल्या-पाहिल्यानंतर किंवा त्याच्या प्रभावाखाली आल्यानंतर त्यावर कृती काय करावी हे माणसाची तरी सदसद्विवेकबुद्धीच ठरवू शकते. त्यामुळं आपल्याकडे तशी बुद्धी, विवेक शाबूत असेल तर या देशाचं भवितव्य आणि एकात्मकता नक्कीच राहील.
ताजा कलम
‘३२ हजार स्त्रियांची खरी कहाणी’ सांगण्याचा दावा करणाऱ्या सिनेमानं त्यांचा ट्रेलर आता ‘एडिट’केलाय. आता सुरुवात ‘मेनी ट्र स्टोरीज’ अशा मोघम उल्लेखाने होते आणि ३२ हजार हा आकडा गायब होऊन तिथं केवळ ‘तीन तरुणींच्या सत्यघटने(!)वर’ आधारित असं म्हटलं आहे. समझनेवाले को इशारा काफी है!
लेखिका मुक्त पत्रकार असून आरोग्य संज्ञापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
greenheena@gmail.com