प्रफुल्ल शिलेदार
गेल्या वर्षीच्या लॉस एंजेलिसमधील मुक्कामातील शेवटचा दिवस जवळ आला होता. राहून गेलेल्या काही गोष्टींमध्ये ‘द लास्ट बुकस्टोअर’ला जाणे होते. डाऊनटाऊनकरता निघालो आणि उबरच्या आर्मेनियन ड्रायव्हरशी गप्पा मारत मारत पोहोचलो. एका मोठ्या इमारतीच्या तळमजल्यावर ‘द लास्ट बुकस्टोअर’ होते. प्रवेशापाशीच एका काउंटरवर पाठीवरची सॅक ठेवून कुठलेही ओझे हातात न घेता आत शिरलो. आत शिरताच थबकलो. समोरचे कॅश काउंटर संपूर्ण पुस्तके रचूनच तयार केले होते. आतही पुस्तकांनीच सगळी सजावट केलेली होती. नजर जिथे पडेल तिथे अत्यंत सुंदर प्रकारे रचलेली पुस्तके होती. खऱ्या पुस्तकप्रेमीला वेड लागावे असे वातावरण तयार करण्यात त्यांना यश मिळाले होते.
दुकानाची जागा प्रचंड मोठी म्हणजे सुमारे बावीस हजार चौरस फुटांहून अधिक होती. शंभर वर्षे जुन्या इमारतीतील या दोन मजली जागेत आधी एक बँक होती. एवढ्या मोठ्या जागेत मांडणी आणि प्रकाशयोजना यातून इतर पुस्तकांच्या दुकानाहून वेगळा असा ‘रस्टिक लुक’ तयार करण्यात आला होता. त्यामुळे त्या दुकानात शिरल्यावर प्रेमातच पडायला होत होते. दुकानात नेहमीच्या विभागांसोबतच कॉमिक्स, हॉरर, सिनेमाविषयक पुस्तके, नियतकालिके, अँटिक पुस्तके असे वेगवेगळे विभाग होते. काही छोटी कलादालने होती. रेकॉर्ड्सचा स्वतंत्र विभाग होता. आत एक कॉफी शॉप होते. पुस्तक बोगदा, पुस्तकांच्या कमानी आणि पुस्तक-शिल्पे सगळीकडेच होती. प्रशस्त जागा आणि उंच छत यामुळे पुस्तकांनी भरलेला अवकाश मोहून घेत होता. त्या जुन्या बँकेच्या जागेतील मजबूत लोखंडी दार असलेल्या व्हॉल्टचा वेगळाच उपयोग त्यांनी केला होता. व्हॉल्टच्या आतील भागात लाल प्रकाशाचे दिवे लावून आणि दारावर एक बाहुली उलटी टांगून तिथे हॉरर रूम तयार केली होती आणि हॉरर पुस्तके ठेवलेली होती.
हेही वाचा : लोक-लौकिक : लोचा आहे का मेंदूत?
आधी तर अर्धा तास मी दुकानात नुसताच फिरलो. नंतर एक एक शेल्फ बघू लागलो. बाहेर आलो तेव्हा संध्याकाळ झाली होती आणि हातात हवी असलेली पुस्तके होती. अॅलन गिन्सबर्गवरचे एक दुर्लभ फोटोबुक, लॉरेन्स फार्लिंघेटीचा संग्रह, पोएट्री मासिकाचे काही अंक, काही अगदी नव्या अंगाने केलेली अलीकडच्या कवितांची -जसे ‘़क्वीअर पोएट्री ऑफ कलर’- अशी काही संपादने असा जाडजूड ऐवज होता. ‘द लास्ट बुकसेलर’ हे गॅरी गुडमनचे पुस्तकही मिळाले. एखाद्या अद्भुतरम्य कादंबरीप्रमाणे असलेल्या या आत्मकथनात दुर्मीळ पुस्तकांच्या जगातली अनेक अकल्पनीय रहस्ये उलगडत जातात.
‘द लास्ट बुकस्टोअर’ हे काही फार जुने दुकान नाही. पुस्तके हे पहिले प्रेम असलेला जोश स्पेन्सर हा ‘द लास्ट बुकस्टोअर’चा मालक. २००२ साली तो लॉस एंजेलिसमध्ये आला. त्याने आपल्या अपार्टमेंटमधूनच ऑनलाइन पुस्तक विक्री सुरू केली. अत्यंत उत्साही आणि खिलाडूवृत्तीने आयुष्य जगत असताना एका भीषण मोटारसायकल अपघातात तो आपले दोन्ही पाय गमावून बसला. व्हीलचेअरवर जगणे ऐन तारुण्यात वाट्याला आले. मात्र न खचता, नैराश्यावर मात करून, अनेक वर्षांच्या प्रयत्नांती उभारी घेऊन त्याने डाऊनटाऊन लॉस एंजेलिसमध्ये एका छोट्याशा जागेत म्हणजे अक्षरश: एका पोटमाळ्यावर (लॉफ्टमध्ये) पहिले पुस्तकांचे दुकान सुरू केले. दुकानात नवी तसेच जुनी पुस्तकेही ठेवू लागला. नेटाने पुस्तके शोधून आणत विकू लागला. याच व्यवसायात पुढे जात अत्यंत कल्पकतेने एवढ्या मोठ्या जागेत दिमाखाने हे दुकान उघडले आणि पहिल्या दिवसापासून इथे येणाऱ्या लोकांचा ओघ वाढतोच आहे.
हेही वाचा : अन्वयार्थ : निर्दोषत्व सिद्ध व्हावे!
साधारणत: या शतकाच्या पहिल्या दशकात वाढत्या ईबुकच्या किंवा ई-माध्यमांच्या प्रसारामुळे तसेच सॉफ्ट कॉपी इंटरनेटवर सहजगत्या उपलब्ध होऊ लागल्यामुळे छापील पुस्तकांच्या दुकानातील विक्रीवर परिणाम झाला. लोकांचा घरबसल्या पुस्तके मागवण्याकडे कल वाढू लागला. खरे तर अमेरिका हा जगातला सगळ्यात मोठा पुस्तकबाजार आहे. पण अशा काही कारणांमुळे पुस्तकांच्या काही मोठ्या दुकानांचे अक्षरश: दिवाळे निघाले. अनेकांना व्यवसाय बंद करावा लागला. अमेरिकेतली सगळ्यात मोठ्या दुकानांच्या साखळीने म्हणजे ‘बॉर्डर्स’ने तर सप्टेंबर २०११ मध्ये कायदेशीररीत्या दिवाळे काढले आणि दहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना घरी बसवून आपल्या सुमारे चारशे दुकानांना टाळे ठोकले. यामुळे प्रत्यक्ष पुस्तके विकणाऱ्या दुकानांमध्ये काळजीचे आणि भीतीचे वातावरण पसरले. ‘वाल्डन बुक्स’, ‘क्राऊन बुक्स’ अशा पुस्तकदुकान-साखळ्याही बंद पडल्या होत्या.
यात धोरणीपणाने तग धरून राहिली ती ‘बार्न्स अॅण्ड नोबल’. या साखळीची स्थापना १८८६ साली न्यूयॉर्क येथे झाली. म्हणजे सव्वादोनशे वर्षांचा पुस्तक विक्रीचा इतिहास आणि अनुभव पाठीशी असलेली ही पुस्तके विकणारी कंपनी; पण नव्वदच्या दशकापासूनच पुस्तक विक्री झपाट्याने घसरत आहे असे लक्षात आल्याने त्यांनीही सावध पावले टाकणे सुरू केले होते. २००० च्या दशकात ‘गेमस्टॉप’ ही इलेक्ट्रॉनिक कंपनी विकत घेऊन आणि आपले ई-रीडर बाजारात आणून सफाईने यातून वाट काढली. अशा अनेक कारणांमुळे आणि इतर माध्यमांच्या मानवी वेळेवरील अतिक्रमणामुळे पुस्तकसंस्कृती लयास जाते की काय अशी भीती अनेक प्रकाशकांना आणि पुस्तक विक्रेत्यांना वाटू लागली होती तो हा काळ होता. मात्र यातही ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती’ या उक्तीप्रमाणे पुस्तकांची अनेक लहान-मोठी स्वतंत्र दुकाने चिवटपणे टिकून राहिली.
अशा काळातच ‘द लास्ट बुकस्टोअर’ २००५ मध्ये सुरू झाले. सगळीकडे पुस्तकांची दुकाने बंद पडण्याचे वातावरण असल्याने आणि कदाचित हे शेवटचेच पुस्तकांचे दुकान असू शकेल अशी भीती वाटल्यामुळे जोशने आपल्या दुकानाला ‘द लास्ट बुकस्टोअर’ हे नाव दिले.
‘द लास्ट बुकस्टोअर’मध्ये नवी-जुनी अशी दोन्ही पुस्तके विकली जातात. पुस्तकांची पहिली आवृत्ती, लेखकाच्या स्वाक्षरीची प्रत, दुर्मीळ पुस्तके तिथे हमखास मिळतात. आपल्याकडील पुस्तक विक्रेते नव्यासोबत वापरलेली पुस्तके विकत नाहीत. त्यांना खरे तर वापरलेल्या पुस्तकांचे वावडे असायला नको. मुंबईत अशी काही दुकाने होती पण ती कधीचीच बंद पडली (काळबादेवी भागातले ‘न्यू अॅण्ड सेकण्डहँड बुकस्टोअर’ तर आता कुणाला आठवतही नसेल… आता फाउंटनवरच्या फुटपाथवरील विक्रेत्यांजवळ मात्र नवी-जुनी दोन्ही पुस्तके मिळतात).
हेही वाचा : लोकमानस : ही नेहरूंचे धोरण पुढे नेण्याची वेळ
‘द लास्ट बुकस्टोअर’मध्ये एका वेळेस साधारणत: पाच लाख नवी-जुनी पुस्तके शेल्फवर असतात आणि अक्षरश: हजारो जुन्या पुस्तकांचा ओघ रोज येत असतो. ही वैयक्तिक संग्रहातील किंवा संस्थांच्या संग्रहातील पुस्तकेदेखील असतात. कधी कधी लोकांना पुस्तके नको झाली की इथे आणून देतात. अशाच प्रकारे काही गावातल्या आठवडी बाजारातही लोक एका जागी पुस्तके आणून ठेवत असताना दिसली होती. शहरातील रस्त्याकाठी कुठे कुठे ‘बुक नेस्ट’-पुस्तकांची घरटी-दिसतात. ज्यांना हवे असेल ते ती पुस्तके घेऊन जातात.
‘द लास्ट बुकस्टोअर’च्या गोदामामध्येच पुस्तकांचे वर्गीकरण करून विक्रीयोग्य मौलिक पुस्तके वेगळी करणे हे महत्त्वाचे काम असते. बिनमहत्त्वाची पुस्तके बाहेर काढून सरळ रद्दीत दिली जातात. वाटेल ते पुस्तक दुकानात ठेवून चालणार नाही, याची त्यांना कल्पना आहे. जोश स्पेन्सरकरता हा निव्वळ व्यवसाय नसून पुस्तकांसोबतचे प्रेमप्रकरण असल्याने तो हे सगळे आनंदाने करत असतो.
आज ‘द लास्ट बुकस्टोअर’ हा अनेकांचा हक्काचा विसावा झाले आहे. कधीही येऊन पुस्तक चाळत-वाचत बसा, विकत घ्या किंवा घेऊही नका, कॉफी प्या, निवांत बसा. घाईघाईने हवे ते पुस्तक घेऊन निघून जा किंवा तास-दोन तास तिथेच घालवा. पुस्तक संग्रहकांकरता, पुस्तकांवर प्रेम करणाऱ्यांकरता तसेच ‘पुस्तकांचा जमाना संपला’ असे रडगाणे गाणाऱ्यांकरताही ‘द लास्ट बुकस्टोअर’ ही अपरिहार्य जागा आहे. जोश म्हणतो, पुस्तकांबद्दल फारशी आवड नसणारे लोकही कुतूहलापोटी इथे येतात आणि पुस्तकांच्या प्रेमात पडतात तेव्हा माझे मन भरून येते.
मला वाटते, आपण जिथे राहतो तिथेही अशा खूप जागा असाव्यात आणि त्यांना भेटी देणाऱ्या लोकांनी आपापल्या गावी परतल्यावर त्याबाबत भरभरून लिहावे.
shiledarprafull@gmail. com