सिद्धार्थ खांडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सौदी अरेबियामध्ये गेल्या काही दिवसांत किंवा आठवडय़ांमध्ये युरोपातून गेलेल्या व्यावसायिक फुटबॉलपटूंचा एखादा प्रतीकात्मक संघ सहज बनू शकतो. आणि हा संघ युरोपातील कोणत्याही श्रेष्ठ क्लब संघाशी टक्कर घेऊ शकतो! या विषयावर मध्यंतरी या स्तंभातून थोडेफार लिहिले गेले होते. अरबस्तानातील काही श्रीमंत देश खेळांच्या स्पर्धा भरवून नवी सांस्कृतिक ओळख निर्माण करणे आणि त्याद्वारे प्रतिमासंवर्धन करणे या उद्योगात गुंतलेले आहेत. यातून मोठाल्या क्रीडा स्पर्धाचे यशस्वी आयोजन करून प्रगत राष्ट्रांना या क्षेत्रातील सक्षम पर्याय निर्माण करण्यात हे देश यशस्वी होऊ लागले आहेत. सौदी अरेबियाने युरोपातील फुटबॉलपटूंविषयी आरंभलेला सौदे प्रयोग यापेक्षा थोडा निराळा आणि सखोल आहे. त्या देशाचे युवराज आणि वास्तवातील सत्ताधीश मोहम्मद बिन सलमान यांनी तेलापलीकडच्या उत्पन्नस्रोतांवर लक्ष केंद्रित केले आहे. यातूनच सौदी अरेबियाला एकीकडे टुरिस्ट हब म्हणून विकसित करताना, दुसरीकडे युरोपबाहेरील प्रमुख व्यावसायिक फुटबॉल केंद्र म्हणून नावारूपाला आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
फुटबॉल प्रोजेक्टला निधी साह्य थेट सौदी सॉव्हरिन फंडाकडून (पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड – पीआयएफ), म्हणजे सरकारी खजिन्यातून होत आहे. सौदी प्रो लीग किंवा एसपीएलमध्ये खेळणाऱ्या १८ संघांपैकी चार प्रमुख संघांचे ७५ टक्के भागभांडवल पीआयएफने खरीदले आहे. हे चार क्लब म्हणजे अल हिलाल, अल नासर, अल अहली आणि अल इत्तिहाद. यांतील एक-दोन नावे हल्ली फुटबॉलरसिकांच्या वरचेवर कानावर पडत असतात. अल नासरने युरोपातील सरत्या हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात मँचेस्टर युनायटेडकडून ख्रिस्तियानो रोनाल्डोला एसपीएलमध्ये आणले. रेआल माद्रिदचा फ्रेंच स्ट्रायकर करीम बेन्झिमा याच्याकडे रेआलकडून खेळण्यासाठी आणखी एक हंगाम शिल्लक होता. त्याने सौदी क्लब अल इत्तिहादला पसंती दिली. चेल्सी आणि फ्रान्सचा प्रतिभावान मिडफिल्डर एन्गोलो कान्ते हाही याच क्लबकडून खेळेल. युएफा चँपियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत यंदा मँचेस्टर सिटीविरुद्ध इंटर मिलानचा संघ खेळला. या संघाचा कर्णधार मार्सेलो ब्रोझोविच हा क्रोएशियन फुटबॉलपटू ३० वर्षांचा आहे. म्हणजे त्याच्याकडे युरोपात खेळण्यासाठी अजून काही वर्षे शिल्लक होती. बार्सिलोना क्लबने त्याला करारबद्ध करण्याविषयी उत्सुकता दर्शवली. पण बार्सिलोनाची ऑफर धुडकावण्याइतपत बिदागी ब्रोझोविचला अल नासरने देऊ केली. त्यामुळे ब्रोझोविच अल नासरशी करारबद्ध झाला. हा निदान तिशीत पदार्पण तरी करत होता. पण इंग्लिश क्लब वुल्वरहॅम्प्टन वाँडर्सकडील रुबेन नेवेस या पोर्तुगीज फुटबॉलपटूची कथा आणखी वेगळी. तो खरे तर २६ वर्षांचाच आहे. यंदा इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये वुल्वरहॅम्प्टनची कामगिरी जरा बरी झाली होती. हा बऱ्यापैकी श्रीमंत क्लब आहे. तरीही या क्लबसाठी किंवा इंग्लिश वा युरोपीयन लीगमध्ये खेळत राहण्याऐवजी नेवेसने सौदी अरेबियातील अल हिलाल क्लबसाठी खेळण्याचा निर्णय घेतला. या असल हिलाल क्लबकडून लिओनेल मेसीही खेळेल, अशी अफवा मध्ये जोरदार उठली होती. सौदी लीगमध्ये गेल्यानंतर नेवेससाठी युरोपियन लीगचे दरवाजे जवळपास बंद होते. बहुधा त्याला पोर्तुगालकडून खेळणेही अवघड जाईल. पण ही जोखीम पत्करण्याची नेवेसची तयारी आहे. नेवेसचे कंत्राट आणखी एक वर्षांसाठी शिल्लक होते. परंतु अल हिलालने त्याच्यासाठी देऊ केलेले ४.७ कोटी पौंड वुल्वरहॅम्प्टनला भविष्यातील गुंतवणुकीसाठी मोलाचे वाटले.
चेल्सी क्लबची कथा आणखी रंजक. कान्टेपाठोपाठ एडुआर्ड मेंडी, कालिडू कुलीबाली, हकीम झियेच हे आणखी तीन फुटबॉलपटू सौदी प्रो लीगच्या मार्गावर आहेत. त्यांचे व्यवहार अंतिम टप्प्यात आहेत. चेल्सी क्लबची कामगिरी यंदाच्या इंग्लिश हंगामात समाधानकारक अजिबातच नव्हती. जवळपास ६० कोटी पौंडांची खैरात करूनही अपेक्षित कामगिरी झाली नाही. तेव्हा भविष्यात योग्य गुंतवणुकीसाठी प्रथम त्यांच्याकडील काही खेळाडूंना विकणे क्रमप्राप्त होते. अशा परिस्थितीत सौदी प्रो लीग हे त्यांच्यासाठी एक प्रकारे वरदान ठरले. अजून तरी खेळाडूंच्या दर्जाविषयी, वयाविषयी आणि विद्यमान कामगिरीविषयी एसपीएलवाले फार चोखंदळ नाहीत. सध्या केवळ अधिकाधिक नावे लीगमध्ये आणणे इतकेच त्यांचे माफक उद्दिष्ट आहे. पुढील पाच वर्षांमध्ये जवळपास १०० सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू एसपीएलमध्ये खेळतील, अशी सौदी फुटबॉल व्यवस्थेची महत्त्वाकांक्षा आहे. २०३० मधील विश्वचषक स्पर्धेच्या संयुक्त यजमानपदासाठी सौदी अरेबिया, ग्रीस आणि इजिप्त स्पर्धेत आहेत. या तिघांना संयुक्त यजमानपद मिळालेच, तरी त्यांतील महत्त्वाचे सामने आपल्याकडे खेचून आणण्याचा सौदी अरेबियाचा प्रयत्न राहील. त्या दृष्टीने बहुतेक मोठय़ा शहरांमध्ये फुटबॉल सुविधा, यूथ अॅकॅडमींच्या उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. युरोपातून सौदी अरेबियात खेळण्यास आलेले फुटबॉलपटू या लीगचे आनंददूत (चिअरलीडर्स) ठरले पाहिजेत, या दर्जाच्या सुविधा पुरवण्याचा कटाक्ष तेथे पाळला जातो.
यापूर्वी अमेरिका, चीन, काही प्रमाणात जपान नि ऑस्ट्रेलियाने युरोपीय क्लबमधील फुटबॉलपटूंना आपल्याकडे खेचण्याचा प्रयोग करून पाहिला. अमेरिकेत मुळात बेसबॉल, बास्केटबॉल, आइस हॉकी आणि अमेरिकन फुटबॉल किंवा अमेरिकन रग्बीच्या लीग सुस्थापित असल्यामुळे फुटबॉलच्या व्यावसायीकरणाला फारसा पैसा राहात नाही. पेले, म्युलर, बेस्ट, क्रायुफ, बेकहॅम, रूनी ते आता मेसी असे वलयांकित फुटबॉलपटू मेजर लीग सॉकरमध्ये खेळले किंवा खेळतात. पण यातील बहुतेक सगळेच पेन्शनीत निघालेले असतात. चीनमध्ये नवीन सहस्रकाच्या सुरुवातीला समांतर व्यावसायिक लीग उभी करण्याचा जोरदार प्रयत्न झाला. ऑस्कर, द्रोग्बा यांसारखे फुटबॉलपटू तेथे खेळूनही आले. पण धोरणसातत्याअभावी चायनीज सुपर लीग स्थिरावू शकली नाही. शिवाय लीग आपल्याकडे खेळवायची, तर त्यासाठी युरोपातील क्लबांना भरमसाट युरो किती काळ देत राहायचे, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे चीनने फुटबॉलचा नाद सोडून दिला. जपान किंवा ऑस्ट्रेलियातील व्यावसायिक फुटबॉलचा जीवच लहान आहे. शिवाय यांपैकी कुणीही युरोपातील क्लब फुटबॉल संरचनेला धक्का पोहोचवण्याची हिंमत दाखवली नव्हती.
ती हिंमत सौदी अरेबिया दाखवू लागला आहे. मुळात युरोपात चारच लीग या खऱ्या अर्थाने श्रीमंत मानता येतात. इंग्लिश, स्पॅनिश इटालियन आणि जर्मन. इतक्या बंदिस्त दुनियेत जर्मन क्लब वगळता बाकीच्या लीगमधील क्लबना आर्थिक शिस्त आणि तारतम्य फारसे नाही. प्रचंड पैसा ओतून स्टार खेळाडू खेचून आणायचे आणि त्यांच्या लोकप्रियतेवर फ्रँचायझी उद्योगाचा जोडधंदा सुरू करायचा, असा प्रकार. या बहुतेक सर्वच लीगमध्ये मोजकेच क्लब पहिल्या पाचात-सहात असतात. बाकीचे निव्वळ पालख्या उचलणारे भोई ठरतात. चार लीगपलीकडच्या दुनियेत फ्रेंच, डच, बेल्जियन, पोर्तुगीज लीग संस्कृती फार वाढली नाही. त्यामुळे सगळय़ांचीच मोजक्या लीगमधील मोजक्या क्लबमध्ये खेळण्याची जीवघेणी धडपड. इतक्या छोटय़ा आणि विस्कळीत विश्वात घुसखोरी करून खेळाडू पळवणे हे सौदी सत्ताधीशांसाठी अजिबात अवघड नव्हते. युरोपीय क्लब फुटबॉलप्रमाणे जुलै ते मे असा प्रदीर्घ हंगाम तेथे नसेल. पण भविष्यात युरोपातील मैदान भाडेतत्त्वावर किंवा विकत घेऊनही सौदी लीग खेळवली जाऊ शकतेच. सौदी अरेबियासारख्या बंदिस्त संस्कृतीत युरोपीय किंवा लॅटिन अमेरिकन फुटबॉलपटू आणि त्यांच्या सहचारिणी वा मैत्रिणी मोकळेपणाने वावरतील का, सौदीमधील भीषण उन्हाळा या फुटबॉलपटूंसाठी तापदायक ठरेल का, सांस्कृतिक उदारमतवादाची आणि मानवी हक्कांची गळचेपी थांबणार का वगैरे मर्त्य मानवी प्रश्न तुम्हा-आम्हाला पडतीलही. पण त्यांची उत्तरेही सौदी सरकार आणि फुटबॉल व्यवस्थेने शोधून ठेवलेली असतीलच.