भाषिक अभिजातता दोन गोष्टींवर अवलंबून असते- (१) प्राचीन वारसा, (२) आधुनिक स्वरूप. मराठी भाषा आधुनिक काळात तिचे अभिजात रूप पेलण्यास सक्षम होत राहावी म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत वैश्विक अभिजात साहित्य ग्रंथांची मराठी भाषांतरे करवून घेऊन प्रसिद्ध केली, तर दुसरीकडे मराठीस भाषिक समृद्धी व अभिजातता लाभावी म्हणून विविध भाषांतील शब्दसंपदा मराठीत आणण्यासाठी विविध ज्ञान-विज्ञान कोशांच्या निर्मितीस हेतुत: प्रोत्साहन दिले. अशा कोशांपैकी एक म्हणजे, ‘इंग्रजी-मराठी स्थापत्य-शिल्प-कोश’ होय. रामचंद्र विनायक मराठे यांनी १९६५ मध्ये त्याचे संपादन केले होते. सर्व शाखांतील अभियंते, चित्र/शिल्पकार, जाहिरातदार यांना आजही अनिवार्य ठरणाऱ्या या कोशास असलेली तर्कतीर्थांची प्रस्तावना अभिजातपण अधोरेखित करते. त्यात तर्कतीर्थ म्हणतात : ‘‘मराठे यांनी मोठ्या परिश्रमाने हा कोश तयार केला आहे. भारतीय कारागिरीची परंपरा भारतीय संस्कृतीइतकी पुरातन आहे. या कारागिरांच्या भाषेतील शब्दसमृद्धी आकर्षक आहे. त्या भाषेत अर्थ व्यक्त करण्याचे सुरेख सामर्थ्य आहे. औद्याोगिक क्रांतीनंतरच्या काळातील हा कारागीर स्थापत्य व शिल्पक्षेत्रातील इंग्रजी शब्द कधी आहे तसे, तर कधी बदलून वापरू लागला, त्यामुळे जुने शब्द मागे पडून नवे शब्द वापरात आले आहेत. जुने शब्द नष्ट होण्यापूर्वी ते अशा कोशांतून ग्रंथनिविष्ट झाल्यास देशी भाषांच्या जिवंत व सतेज वाढीस मदत होईल, या हेतूने सदर कोशाची निर्मिती करण्यात आली. या कोशात कारागिरांचे शेकडो शब्द वापरून तो आधुनिक स्थापत्य व शिल्पसंबंधी इंग्रजी परिभाषांचे विवरण व संज्ञा देशी भाषेत आणून, त्यांना नवीन संस्कृत पर्याय देऊन ते आधुनिक केले आहेत. विद्यापीठीय परिभाषांचा वापर यात करण्यात आलेला नाही.’’
‘‘तांत्रिक क्षेत्रात देशी परिभाषा रूढ होण्याच्या काळात विविध प्रकारचे पर्यायी शब्द लेखक व तंत्रज्ञ यांच्यापुढे आले, तर त्यातील सामर्थ्य, अर्थपूर्णता व देशी भाषांच्या स्वभावास अनुरूप अशी शब्दांची निवड करता यावी, या हेतूने पर्यायी शब्द निवडले गेले. अशी निवड झाल्यास ते शब्द कालौघात टिकाव धरू शकतील. असा संपादकाचा आशावाद होता. शिवाय ते आपापल्या क्षेत्रात स्थानापन्न होऊन रूढ होतील, अशी अटकळ यामागे होती. या कोशामुळे स्थापत्य व शिल्पविषयक इंग्रजी शब्दांचे अर्थ आणि विवरण मराठीत उपलब्ध झाल्याने त्यांचा वापर सुकर व सुगम होईल, अशी अपेक्षा होती. देशी परिभाषा प्रचलित करण्याचे प्रयोजन या कोशामागे आहे. यात व्याकरणिक शहानिशा नाही, भाषाशास्त्रीय आधार नाही, तरी तंत्रज्ञानप्रमाण शब्द हे या कोशाचे खरे सामर्थ्य आहे.’’
तर्कतीर्थांच्या प्रस्तावनेतील वरील विचारांशिवाय या कोशाची अतिरिक्त उपयुक्तता मला वापराने लक्षात आलेली आहे. ती अशी की, एकतर हा कोश सचित्र असल्याने संकल्पना स्पष्ट करणारा आहे. ‘कमान’ (आर्क) शब्दासाठी यात वापरलेली रेखाचित्रे सर्वसामान्य जिज्ञासूस कमानींची रचना, विविधता लक्षात आणून देतात. अनेक इंग्रजी शब्दांना सार्थक मराठी शब्द हा कोश देतो. ‘प्लास्टिक आर्ट्स’ या शब्दप्रयोगाला ‘आकार्य कला’सारखा समर्पक शब्द पुरवून हा कोश इंग्रजीची अपरिहार्यता संपवितो. इंग्रजी ‘लेथ’ला ‘चरक’ या शब्दाचा पर्याय देतो. विज्ञान (स्थापत्य) आणि कला (शिल्प) यांचा सुरेख संगम या कोशाचे आगळे वैशिष्ट्य होय. ‘सिमेंट’ला ‘सुमेध’ पर्याय देऊन इंग्रजीला मराठी पर्याय देणे शक्य असल्याचा विश्वास देण्यातून हा कोश जर वापरात आला, तर मराठीतून अभियांत्रिकी शिक्षण देण्याचा नव्या शैक्षणिक धोरणातील मानस प्रत्यक्षात येण्यास वेळ लागणार नाही असे वाटते. रा. वि. मराठे यांनी या कोशात वृक्षसंवर्धन, पुराणवास्तुशास्त्र, वास्तुसौंदर्यशास्त्र, भूस्तरशास्त्र, धातुशास्त्र, जहाजबांधणी, यंत्रशास्त्र यांचा केलेला समन्वय नि समायोजन हे या कोशाचे खरे बलस्थान आहे. अशा कोशास प्रोत्साहन व दिलेली प्रसिद्धी ही तर्कतीर्थांची दूरदृष्टी आहे.
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com