चीनपासून युरोपपर्यंतच्या व्यापारी महामार्गावरल्या प्रदेश, संस्कृतींचा व्यापक पट हे पुस्तक मांडतं..

श्रीराम कुंटे

book review Navi Pidhi Navya Vata book by Prakash Amte
पुढच्या पिढीची कर्तबगारी!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?
Peshwa Maratha sacking of the Sringeri math
Tipu Sultan History: पेशव्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी लुटला होता ‘शृंगेरी मठ’; या ऐतिहासिक घटनेत किती तथ्य?
Shivajinagar Constituency BJP Vs Congress Rebellion in Congress Congress nominated Dutta Bahirat against BJP MLA Siddharth Shirole Pune
शिवाजीनगरमध्ये ‘सांगली पॅटर्न?’
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई

सध्याचा काळ इतिहासाची मोडतोड, आपल्या विचारसरणीनुसार त्याचं पुनर्लेखन वगैरेंसाठी भरभराटीचा असला तरीही हाच काळ खऱ्याखुऱ्या इतिहासाबद्दल कुतूहल असणाऱ्यांसाठीसुद्धा अतिशय आश्वासक आहे. कारण इतिहासावर नव्या दृष्टिकोनातून लिहिणारे, अनेक ऐतिहासिक घटनांचा जगाच्या जडणघडणीवर पडलेला प्रभाव उलगडून दाखवणारे ताज्या दमाचे लेखक पुढे येत आहेत. माणसाच्या उत्क्रांतीचा ४० लाख वर्षांचा इतिहास ‘सेपियन्स’ या पुस्तकातून लिहिणारे युवाल हरारी, दख्खनच्या चालुक्य आणि चोला राजघराण्यांचा अज्ञात इतिहास ‘लॉर्डस ऑफ द डेक्कन’ या पुस्तकात अतिशय रंजकपणे मांडणारे अनिरुद्ध कनिसेट्टी यांच्याबद्दल अनेकांना माहीत असतेच. या पार्श्वभूमीवर पीटर फ्रँकोपॅन या लेखकाच्या २०१६ साली प्रकाशित झालेल्या ‘द सिल्क रोड्स- अ न्यू हिस्टरी ऑफ द वर्ल्ड’ या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत.

मानवी संस्कृतींचा इतिहास हा खरंतर अतिशय औत्सुक्याचा विषय आहे. जगभरात माणसांच्या टोळय़ांपासून एकजिनसी सांस्कृतिक समूह तयार होण्याचा प्रवास हा नियोजितपणे वसवलेली गावं, मिश्रधातूंचं तंत्रज्ञान, लिपीचा विकास आणि सांस्कृतिक प्रतीकांचा उदय अशा पद्धतीने होत गेला. हा टप्पा पार पडल्यावर सामाजिक उतरंड निर्माण झाली. एवढं सगळं झाल्यावर ही सगळी व्यवस्था कायम ठेवण्यासाठी राजवटी प्रस्थापित झाल्या. फक्त इंका संस्कृतीमध्ये लिपीचा टप्पा नव्हता. पण हा अपवाद सोडला तर हे सगळं याच क्रमाने प्रत्येक संस्कृतीमध्ये होत गेलं. मग ती सिंधू संस्कृती असो किंवा माया संस्कृती. व्यापार मात्र माणसाच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी सांस्कृतिक समूह निर्माण होण्याच्या या प्रवासाला समांतरपणे सुरू झाला असावा. सुरुवातीला आपापसात असणारा व्यापार नंतर समूहांमध्ये आणि मग वेगवेगळय़ा संस्कृतींमध्ये सुरू झाला. वेगवेगळय़ा संस्कृतींमधला हा व्यापार एका सूत्रबद्धतेने जवळपास अडीच हजार वर्ष ज्या मार्गावर चालू होता तो मार्ग म्हणजे रेशमी महामार्ग. हा महामार्ग केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातल्या लोकांच्या कुतूहलाचा विषय आहे. आणि आता तर चीन रेशमी महामार्गाचं आपल्या आर्थिक, राजकीय आणि सामरिक महत्त्वाकांक्षेपायी, कच्च्या आणि पक्क्या मालाच्या खात्रीशीर पुरवठा साखळीसाठी पुनरुज्जीवन करतोय, त्यामुळे रेशमी महामार्ग हा आता अभ्यासाचा विषयही झाला आहे.

‘द सिल्क रोड्स- अ न्यू हिस्टरी ऑफ द वर्ल्ड’ या पुस्तकात मात्र ‘ऑक्सफर्ड सेंटर ऑफ बायझंटाईन रिसर्च’चे संचालक असणारे पीटर फ्रँकोपॅन हे नव्या रेशमी महामार्गाचा केवळ इतिहास न सांगता इ.स.पूर्व सहाव्या शतकातल्या पर्शियन साम्राज्यापासून विसाव्या शतकापर्यंतच्या अडीच हजार वर्षांचा विस्तृत पट आपल्यासमोर मांडतात. रेशमी महामार्ग हा एकच एक रस्ता नसून अनेक खंड आणि समुद्र जोडणारं जाळं आहे. हा मार्ग जरी अडीच हजार वर्ष जुना असला तरीही त्याला हे आज सुपरिचित असणारं नाव १८७७ साली जर्मन भूगोलशास्त्रज्ञ फर्डिनांड फॉन रिचथोपेन याने दिलं. खरंतर चीनच्या सहभागाच्या कितीतरी आधीपासून रेशमी महामार्गावर व्यापार सुरू होता. चीन रेशमी महामार्गावरच्या व्यापारात सामील झाला तो टंग राजवटीच्या काळात म्हणजे इ.स. ६२६ च्या सुमारास आणि त्याला कारण होता भारत. नंतर साँग राजवटीच्या काळात पुन्हा एकदा चीनचा दक्षिण चिनी समुद्रातून जगाशी संपर्क सुरू झाला. त्यालाही भारतच कारण होता. पण रेशमी महामार्ग आम्हीच सुरू केला, आमच्यामुळेच या मार्गावर व्यापार वाढला, सांस्कृतिक देवाणघेवाण झाली आणि जगात समृद्धी आली असं कथन चीनला जगाच्या गळी उतरवायचं असल्याने हे नाव चीनला सोयीचं होतं. 

तर या पुस्तकात फ्रँकोपॅन अनेक चमकदार कल्पना सविस्तरपणे मांडतात. मंगोलियामध्ये चेंगीझ खानाचं साम्राज्य आल्यामुळे युरोपमध्ये पुनरुज्जीवनाची लाट आली आणि युरोप जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडला गेला किंवा आज मेडिटेरेनिअन आणि युरोपमधला केंद्रबिंदू असणारा ख्रिश्चन धर्म सुरुवातीच्या काळात संपूर्णपणे आशियाई होता किंवा युरोपमध्ये प्लेगने केलेल्या प्रचंड नरसंहारानंतर अर्थव्यवस्थेतले कामगार कमी झाले त्यामुळे मजुरीचे दर वाढले आणि संपत्तीचं विकेंद्रीकरण होऊन सुबत्ता वाढली, त्यातून रेनेसाँची सुरुवात झाली अशा अनेक घटनांचा त्यात उल्लेख आढळतो. त्यांच्या मते आपण युरोपकेंद्री दृष्टिकोनातूनच जगाच्या इतिहासाचा विचार करतो. पण खरंतर पश्चिम आणि मध्य आशिया मानवी संस्कृतीसाठी जास्त महत्त्वाचे आहेत. कारण शतकानुशतकं याच भागातल्या रेशमी महामार्गाने फक्त चिनी रेशीम, भारतीय मसाले आणि इतर अनेक वस्तूच नव्हे तर वैज्ञानिक शोध, विविध संस्कृतींमधलं तत्त्वज्ञान, प्लेगसारखे जीवघेणे आजार जगभरात पोहोचवले. धर्म आणि व्यापार हे हातात हात घालून चालत असतात हे चिरंतन सत्य आहे. त्यामुळे रेशमी महामार्गावर व्यापाराच्या निमित्ताने इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध यांसारख्या धर्माचा मोठय़ा प्रमाणात प्रसार झाला.

याच महामार्गावर साम्राज्यं उदयाला आली आणि त्यांचा अस्तही झाला. याच महामार्गावर जागतिक अर्थव्यवस्था उदयाला आली. त्यामुळे या रेशमी महामार्गामुळे पश्चिम आणि मध्य आशियातल्या संस्कृतींमध्ये झालेली घुसळण ही युरोपीय साम्राज्यं, रेनेसाँ किंवा अगदी औद्योगिक क्रांतीपेक्षाही आजच्या जगावर जास्त प्रभाव टाकणारी आहे. रेशमी महामार्ग ही संकल्पना फक्त जमिनीवरच्याच नव्हे तर समुद्रातल्या मार्गाचीही आहे. त्यामुळे फ्रँकोपॅन अतिशय सहजपणे पर्शियन, रोमन, ग्रीक साम्राज्यांच्या जमिनीवरून वाढवलेल्या साम्राज्यांपासून युरोपमधल्या स्पेन, पोर्तुगाल, नेदरलँड्स आणि इंग्लंडच्या समुद्रमार्गे वाढवलेल्या साम्राज्यांचा इतिहास सहजपणे सांगतात. मंगोल साम्राज्याचा प्रवास, प्लेगची साथ, धर्मप्रसार यांसारखी काही प्रकरणं अप्रतिम आहेत. पुस्तकाच्या उत्तरार्धात फ्रँकोपॅन १९व्या शतकानंतर उदयाला आलेल्या महासत्तांचा रेशमी महामार्गावरचा ऊर्जा, खनिजं आणि राजकीय कुरघोडींचा ‘ग्रेट गेम’ समजावून सांगतात. अर्थात ‘ग्रेट गेम’ हा या पुस्तकातील एक उपविषय आहे. आणखी एक गोष्ट हे पुस्तक वाचताना जाणवत राहते ती म्हणजे या पुस्तकातला क्रुसेड्स, पश्चिम आशियातल्या तेलाचा इतिहास किंवा १५व्या आणि १६व्या शतकातल्या युरोपच्या इतिहासासारखा बराचसा भाग हा अज्ञात इतिहास वगैरे नसून आपल्या चांगल्या परिचयाचा आहे. पुस्तकात २५ प्रकरणं असून रेशमी महामार्गाला जोडणाऱ्या एकेका मार्गावर किंवा खरंतर रेशमी मार्गावरच्या एकेका प्रभावक्षेत्रावर एकेक प्रकरण आहे. पण असं असलं तरीही आश्चर्य म्हणजे प्रत्यक्ष रेशमी महामार्गावर होणाऱ्या व्यापाराबद्दल फारच कमी माहिती आहे.

पुस्तकाचा उत्तरार्ध वाचताना लेखक पश्चिम आणि मध्य आशियाच्या इतिहासाच्या जास्तच प्रेमात पडून वर्तमानाचं भान विसरतोय आणि या भागाच्या भविष्यातल्या स्थानाबद्दल स्वप्नाळू कल्पना बाळगतोय असं वाटत राहतं. तरीही हे पुस्तक आपला इतिहासाबद्दलचा युरोपकेंद्रित दृष्टिकोन बदलतं आणि इतिहासातल्या अनेक वेगवेगळय़ा वाटणाऱ्या घटनांचा एकमेकांशी कसा संबंध असतो हे उलगडून दाखवतं. पर्शियन साम्राज्यापासून दहाव्या शतकापर्यंतची मोलाची माहिती आपल्याला मिळते. रेशमी महामार्गाचा आणि त्या अनुषंगाने जगाचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलेच पाहिजे असे आहे.

जाता जाता- काळाचा महिमा बघा. रेशमी महामार्गावर असणाऱ्या अनेक देशांचं भाग्य आज पूर्णपणे पालटलं आहे. आजच्या मंगोलियाची स्थिती पाहून कदाचित खरंही वाटणार नाही की याच मंगोलियातल्या चेंगीझ खान नावाच्या एका टोळीवाल्याचं तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात पॅसिफिक समुद्रापासून काळय़ा समुद्रापर्यंत आणि मंगोलियाच्या गवताळ प्रदेशापासून उत्तर भारत आणि पर्शियन खाडीपर्यंत अर्ध्या जगावर राज्य होतं. प्लेगच्या साथीनंतर आलेल्या रेनेसाँमुळे संपूर्ण बदल घडेपर्यंत बकाल आणि कंगाल युरोप कोणत्याही आशियाई महासत्तेच्या खिजगणतीतही नव्हता. एकेकाळी जगात खूप मोठय़ा असणाऱ्या पर्शियन साम्राज्याची आजची ओळख खोमेनी, धर्माधता आणि पश्चिम आशियातल्या राजकारणातलं प्यादं अशी झाली आहे. आज आपण ज्या अरब जगताला तेलाच्या आयत्या कमाईवर जगणारा, अमेरिकेच्या कच्छपी लागलेला प्रदेश समजतो ते अरब खगोलशास्त्रात अत्यंत पुढारलेले होते आणि भारतीय आणि पर्शियन व्यापाऱ्यांबरोबर जगाचा व्यापार चालवत होते. आज अत्यंत गरीब असणाऱ्या मध्य आशियातल्या कझाकस्तान, किर्गिस्तान, उज्बेकिस्तानसारख्या देशांमधून जगातल्या एकूण आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी अर्धा व्यापार व्हायचा. सतराव्या शतकात जगाच्या ठोक उत्पन्नापैकी ३४ टक्के वाटा असणारा भारत आज कुठे आहे हे आपल्याला माहीतच आहे आणि रोमन, ग्रीक, पर्शियन, भारतीय आणि चिनी साम्राज्यकाळात जन्मालासुद्धा न आलेली अमेरिका आज जगावर राज्य करत आहे!