हर्ष दहेजिया हे भारतीय सौंदर्यविचाराचे गाढे अभ्यासक आहेत, म्हणजेच भारतीय कला आणि भारतीय अध्यात्म यांच्या परस्परसंबंधाची उत्तम जाण त्यांना आहे. कृष्णाविषयीच्या काव्यांचा विशेष अभ्यास त्यांनी केला आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, अध्यात्म आणि कला यांचा संबंध जर प्राचीन काळात होता, तर आताही तो असू शकतो, असायला हवा- असा दुर्दम्य आशावाद डॉ. दहेजिया बाळगतात. या आशावादातूनच त्यांनी सुमारे २४ वर्षांपूर्वी, अनेक अभ्यासकांना चक्रावणारे एक पुस्तक लिहिले होते. भारतीय रससिद्धान्तातल्या नऊ रसांखेरीज आधुनिक काळात ‘हताशा’ (डिस्पेअर) हा दहावा रस म्हणून मान्य व्हावा, असे ‘डिस्पेअर अॅण्ड मॉडर्निटी’ नावाच्या त्या पुस्तकातले त्यांचे प्रतिपादन होते. हताशा ही जगण्यातली स्थिती असेल, पण तो कलाकृतीतला रस कसा मानता येईल, हा अगदी साहजिक आक्षेप काही अभ्यासकांनीही घेतला तेव्हा डॉ. दहेजियांचे त्या वेळचे उत्तर असे होते की, रसनिष्पत्ती निव्वळ कलाकृतीतून होत नसून, रसिकाच्या जीवनानुभवातूनही ती होत असते! या प्रकारचा, नेहमीपेक्षा निराळा विचार करणारे विद्वान म्हणून डॉ. दहेजिया गेली दोन दशके ज्ञात आहेत. त्यांचे नवीन पुस्तकही या लौकिकाला साजेसे आहे.
‘द थर्ड आय ऑफ इंडियन आर्ट’ असे जरी या पुस्तकाचे नाव असले तरी हा तिसरा डोळा अनुभव घेणाऱ्यांचा असायला हवा, असे म्हणणे डॉ. दहेजिया या पुस्तकातून मांडतात. भरपूर उदाहरणे देण्याची आणि त्या त्या उदाहरणाबद्दल भरभरून सांगण्याची त्यांची पद्धत इथेही आहे. पण या पुस्तकातल्या प्रतिपादनाचा एकंदर बाज असा की, ते दुसऱ्याला पटवून देण्यासाठी फार युक्तिवाद करण्याची, आक्षेप काय येतील हे जोखून मग ते खोडून वगैरे काढण्याची काही गरजच नसावी. इतकी आत्मनिष्ठा डॉ. दहेजियांकडे आहे. पुस्तकाच्या अखेरीस आत्मनिष्ठा या गुणाचा गौरवोल्लेखही ते करतात : स्वत:चा आत्मा ओळखण्याची स्थिती, त्यातून आलेली आत्मरती आणि ती दृढ झाल्यानंतरची आत्मनिष्ठा या साऱ्याचे अधिष्ठान ‘स्मरणा’ला हवे. हे स्मरण जागृत असणे, कलाकृती कोणत्याही काळातली असली तरीही तिचा आनंद त्या आत्मनिष्ठा-प्रणीत स्मरणाने घेणे, हाच तर त्यांच्या मते ‘तिसरा डोळा’! भारतीयत्वाचे- वेदान्त, बौद्ध तत्त्वज्ञान आणि जैन तत्त्वज्ञानाचे – भान ठेवून अनुभव घेणे महत्त्वाचे, हे या पुस्तकाचे प्रतिपादन. काळ एकरेषीय नाही, तो आवर्ती आहे, हे रसिकाने ओळखल्यास असा ‘तिसरा डोळा’ उघडणे अवघड नाही, असा लेखकाचा विश्वास आहे.
हेही वाचा : उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
‘तमसो मा सद्गमय…’ या बृहदारण्यक उपिनषदातल्या अपेक्षेपासून ते गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोरांच्या कवितांपर्यंत आणि वेदांमधील उद्धृतांपासून ते आनंद कुमारस्वामींच्या विवेचनापर्यंत अनेक आधार जरी या पुस्तकात पानोपानी असले, तरी त्या अवतरणांना जोडणारा आवाज खुद्द लेखकाचाच आहे. शिव-पार्वती आणि कृष्णलीला यांचे हिंदू संस्कृतीत रुजलेले तपशील, ‘हवेली’ची वास्तुरचना यांसारख्या गोष्टींचे दाखलेही ते देत राहतात. ‘कला आणि जगणे’ यांच्या संबंधावर १९५०-६० च्या दशकांत जोरदार वाद झडले होते; त्यांपासून दहेजिया दूरच असले तरी जगणे- आत्मभान- कलानुभव असा संबंध ते निश्चितपणे जोडतात. मात्र हे आत्मभान भारतीय संदर्भांतलेच असावे, असा त्यांचा कटाक्ष आहे. ‘कला ही काही निव्वळ दिवाणखान्यांतल्या भिंती सजवण्याची वस्तू नव्हे’ असे ते म्हणतात; पण (उदाहरणार्थ मांडणशिल्प, परफॉर्मन्स आर्ट यांसारख्या नवप्रकारांकडे पूर्ण दुर्लक्ष करून) कलावस्तू, कौशल्यवस्तू, काव्य, नृत्य/ संगीत अशा प्रकारांकडेच ते पाहात आहेत, हे वाचकाला जाणवते. पुस्तकाचा भर कलाकृतीच्या नव्हे तर ‘सौंदर्याच्या’ अनुभवावर आहे. हा सौंदर्यानुभव येण्यासाठी समोर कलाकृतीच हवी असे नाही. वास्तूचा परिपूर्ण अनुभव हाही सौंदर्यानुभवच. या ‘परिपूर्णते’चे श्रेय अगदी द्वारपाल-शिल्पांच्या कल्पनेपासून वास्तूविषयीच्या अनेक भारतीय संकल्पनांना डॉ. दहेजिया देतात.
या पुस्तकातून तातडीने काही मिळवण्यास जाऊ नये, लेखकाचा एक विचार या पुस्तकाकडे पाहावे आणि या विचाराची सांगड बी. एन. गोस्वामी, विद्या दहेजिया यांच्याही पुस्तकांतील प्रतिपादनांशी घालावी, तेव्हा कुठे ‘तिसरा डोळा’ उघडेल. गतकाळाची आस्थापूर्वक जाण आणि जाणीव असणे हे चांगलेच, पण निव्वळ एखादे पुस्तक सांगते म्हणून – आणि सध्याचा राजकीय विचारही ‘भारतीयत्वा’चा उद्घोष करणारा आहे म्हणून- तिसरा डोळा उघडला जाईलच असे नाही. किंबहुना, आजचे राजकारण आपल्याला आपल्याच गतकाळाकडे इतक्या कोत्या, सनातनी दृष्टीने पाहायला लावणारे आहे की, सौंदर्यानुभव घेण्यासाठी- चांगले जगण्या आणि जगू देण्यासाठी तिसरा डोळा उघडलेला समाज या देशात असेल असे म्हणणे हे आजघडीला स्वप्नवत ठरावे.
हेही वाचा : अन्वयार्थ : कौशल्याला पदवीचे कोंदण
द थर्ड आय ऑफ इंडियन आर्ट
लेखक : डॉ. हर्ष व्ही. दहेजिया
प्रकाशक : अलेफ बुक कंपनी,
पृष्ठे : २२८; किंमत : रु. ४९९
हेही वाचा
अमेरिकी आणि ब्रिटिश वृत्तपत्रांनी गेल्या आठवड्याच्या विकांती पुरवण्यांमधून वर्षातील सर्वोत्तम पुस्तकांची यादी झळकवली आहे. गार्डियनने अनेक लेखकांना एकत्र करून त्यांनी वाचलेल्या वर्षातील उत्तम निवड दिली आहे. एकूणातच ‘वाचू आनंदे’ स्थिती अनुभवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारांतील फक्त वर्षातील सर्वोत्तमाची यादीदेखील भोवळ आणू शकेल.
https:// shorturl. at/9 ZtlD
दरवर्षी ‘बेस्ट अमेरिकन शॉर्टस्टोरीज’च्या खंडांच्या शेवटी अंकात न जाऊ शकलेल्या पण संपादकाला आवडलेल्या कथांची नावांसह यादी दिली जाते. त्यातील एक कथा ‘क्लोई अल्बटा’ या नवख्या लेखिकेने लिहिलेली पहिली-वहिली कथा. ती प्रसिद्ध झाल्यानंतर काही पारितोषिकांची धनीदेखील झाली. वाचायला येथे पूर्ण उपलब्ध.
https:// shorturl. at/ yErRF
अॅमस्टरडॅम (हॉलंड) देशातलं एक छोटं शहर. तेथील पालिकेने सर्व रहिवाशांवर आपापल्या अंगण आणि परसाचा किमान अर्धा भाग भाजीपाला-फळे आदी स्वयंपाकोपयोगी लागवड करण्याची सक्तीच करणारा नियम लागू केला. रहिवाशांनीही तो पाळला आणि गाव बदललं, माणसंही बदलली… त्याची कहाणी सांगणारा, म्हटलं तर ‘साहित्यबाह्य’ पण एखाद्या कथेसारखा लेख.
https:// shorturl. at/ cqLJ1
abhijit.tamhane@expressindia.com