अमृतांशु नेरुरकर, ‘चिप’-उद्योगात कार्यरत असलेले तज्ज्ञ.

मार्गनिर्देशित क्षेपणास्त्रांत (गायडेड मिसाइल्स) ‘चिप’चा वापर पहिल्यांदा व्हिएतनाम युद्धात झाला, तो का?

Bahujan samaj vidhan sabha election 2024
बहुजन समाजातील संधीसाधूपणावर उपाय काय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray over the project Print politics news
मोठ्या प्रकल्पातील गतिरोधक दूर केले; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Amit Shah Said This Thing About UCC
Amit Shah : UCC बाबत अमित शाह यांची मोठी घोषणा, आदिवासी बांधवांना काय दिलं आश्वासन?
maharashtra vidhan sabha election 2024 path of Mahayuti and Mahavikas Aghadi is difficult due to major rebel candidates in akola and vashim
प्रमुख बंडखोरांमुळे महायुती व मविआची वाट बिकट
nagpur pollution increased on diwali due to use of firecrackers
प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना हवेत ,कोट्यवधींच्या फटाक्यांचा आवाज व धूर
terror among the villagers after tiger kills man in melghat
मेळघाटात वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू ; गावकऱ्यांमध्‍ये दहशत
tamil nadu Politics
विश्लेषण: तमिळनाडूच्या राजकारणात आणखी एक सुपरस्टार! एमजीआर, जयललिता, कमलहासन यांची गादी विजय चालवणार का?

शीतयुद्धाच्या जवळपास चाळीस वर्षांच्या कालखंडात प्रदीर्घ कालावधीसाठी प्रत्यक्षात लढले गेलेले आणि लष्करी तसेच नागरी अशा दोन्ही आघाडय़ांवर अत्यंत विनाशकारी म्हणून व्हिएतनामचे युद्ध गणले जाईल. १९५५ ते १९७५ अशी दोन दशके तत्कालीन सोव्हिएत रशिया व चीन ही साम्यवादी शक्ती विरुद्ध अमेरिकादी पाश्चिमात्य देशांची भांडवलशाही शक्ती यांच्यात, अनुक्रमे उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम या प्रांतांत हे युद्ध लढले गेले. या युद्धात केवळ व्हिएतनामचेच नव्हेत तर आजूबाजूच्या लाओस, कंबोडिया इत्यादी देशांचे लाखो सैनिक आणि नागरिकांनी प्राण गमावले; शिवाय ‘अगदी थोडय़ा अवधीत युद्धाचा सोक्षमोक्ष लावण्याच्या इराद्या’ने युद्धात उतरलेल्या आणि भौगोलिक परिस्थितीचा अंदाज न आल्याने पार नियोजन फसलेल्या अमेरिकेचे देखील लाखो सैनिक हकनाक मारले गेले.

असो. या लेखाचा उद्देश व्हिएतनाम युद्धाची साधकबाधक चर्चा करण्याचा निश्चितच नाही. कोणत्याही कालखंडात दोन किंवा अधिक देशांमध्ये, प्रांतांमध्ये अथवा जमातींमध्ये लढले गेलेले युद्ध त्यात भरडल्या गेलेल्या लोकांसाठी वेदनादायी असते याबद्दल कोणाचेच दुमत असणार नाही. पण प्रत्येक वाईट घटनेला एखादी आशादायक बाजूही असते. युद्धाच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास आज सर्वसामान्य वापरात असलेल्या तंत्रज्ञानांचा आणि त्यावर बेतलेल्या अनेक उपकरणांचा शोध युद्धाची निकड म्हणून झाला आहे. एखादे बाल्यावस्थेत असलेले तंत्रज्ञान युद्धाची गरज म्हणून थोडय़ाच वेळात परिपक्वतेकडे पोहोचल्याची उदाहरणेही सापडतात. चिप तंत्रज्ञानही या नियमाला अपवाद ठरलेले नाही.

व्हिएतनामच्या युद्धात अमेरिका अधिकृतपणे १९६५च्या सुमारास सामील झाली जेव्हा अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी चालू केलेल्या ‘ऑपरेशन रोलिंग थंडर’च्या अंतर्गत अमेरिकी लष्करी फौजा पहिल्यांदा व्हिएतनाममध्ये दाखल झाल्या. १९६९ पर्यंत पहिल्या तीन चार वर्षांत अमेरिकेने कम्युनिस्ट धार्जिण्या उत्तर व्हिएतनामवर अक्षरश: लाखो टन बॉम्बगोळय़ांचा वर्षांव केला. अमेरिकेच्या अपेक्षेनुसार पिटुकल्या उत्तर व्हिएतनामला शरण येण्यासाठी इतका काळ आणि एवढा बॉम्बगोळा पुरेसा होता. पण अमेरिकेच्या दुर्दैवाने उत्तर व्हिएतनाम शरण येणे तर सोडाच पण अमेरिकी आक्रमणाने त्याच्या युद्धसज्जता व लष्करी ताकदीवर (जी अमेरिकेच्या तुलनेत नगण्य होती) पुसटसा ओरखडा देखील आला नाही.

अमेरिकेच्या या अपयशाचे मुख्य कारण तिला व्हिएतनामच्या भौगोलिक रचनेचे न झालेले आकलन हे होते याबद्दल काही शंकाच नाही. पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमध्ये वापरले गेलेले बॉम्बगोळे किंवा डागली गेलेली क्षेपणास्त्रं आपल्या लक्ष्याचा अचूक भेद करण्यास असमर्थ ठरत होती. नव्वद टक्क्यांपेक्षाही अधिक वेळेला त्यांचा नेम चुकला होता. अमेरिकेसारख्या विशाल लष्करी सामथ्र्य असलेल्या देशासाठी ही खचितच लाजिरवाणी गोष्ट होती.

अमेरिकी संरक्षण खात्याच्या धुरीणांनी जेव्हा या अपयशाचा सखोल आढावा घेतला तेव्हा एक गोष्ट उघडपणे समोर आली. व्हिएतनाम युद्धात तोवर वापरली गेलेली मार्गनिर्देशित क्षेपणास्त्रे (गायडेड मिसाइल्स) ही मुख्यत्वेकरून निर्वात नलिका (व्हॅक्यूम टय़ूब) तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण केली गेली होती. अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांमध्ये लक्ष्याचा काटेकोरपणे माग घेण्यासाठी किंवा नियंत्रण केंद्रांकडून मिळालेल्या सूचनांप्रमाणे आयत्या वेळेला आपली दिशा, वेग किंवा अगदी अंतिम लक्ष्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी गणन तसेच विदासंचय क्षमता असणे अनिवार्य असते; इथे तीच गरज निर्वात मालिकांचा वापर करून पूर्ण केली जात होती.

व्हिएतनामचे अतिदमट हवामान, वेळी अवेळी पडणारा पाऊस आणि लढाऊ विमानांतून बॉम्बगोळय़ांचा मारा करताना वाऱ्याचा होणारा अवरोध या सर्वामुळे निर्वात नलिकांची एकमेकांबरोबर असलेली जोडणी ढिली होऊन त्या काम करणे थांबवत. बऱ्याचदा क्षेपणास्त्र सोडल्यानंतर ते लक्ष्यावर आदळण्यापूर्वीच निर्वात नलिकांचे काम बंद पडत असे व त्यामुळे त्याच्या वेगात किंवा दिशेत जर काही बदल घडवायचे असतील तर नियंत्रण कक्षाकडून अशा संदेशांचे आदानप्रदान करणे अशक्यप्राय होत असे.   

व्हिएतनामच्या भूमीत चार पाच वर्षे आपली लष्करी शक्ती व मनुष्यबळ प्रचंड खर्च करूनदेखील अमेरिका यशाच्या जवळपासही पोहोचली नव्हती. शहीद होणाऱ्या अमेरिकी सैनिकांचे आकडे वाढत चालले होते. अमेरिकी समाजमन सरकार, लष्कर आणि एकंदरच या युद्धाच्या विरोधात एकवटू लागले होते. जलदगतीने काही निर्णायक कृती करणे गरजेचे होते. अशा वेळेला अमेरिकी संरक्षण खात्याने टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स (टीआय) या तंत्रज्ञान क्षेत्रातील आपल्या विश्वासू साथीदारास पाचारण केले.

टीआयने अमेरिकी लष्कर तसेच हवाई दलासाठी पुष्कळ काम केले होते. अगदी दुसऱ्या खंडातील देशावर डागण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘इंटरकॉन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाइल्स’च्या (आयसीबीएम) निर्मितीतही टीआयचा सहभाग होता. पण आयसीबीएम आणि व्हिएतनाम युद्धात वापरण्यात येत असलेल्या क्षेपणास्त्रांमध्ये एक मूलभूत फरक होता. आयसीबीएम क्षेपणास्त्र जमिनीवरून एका स्थिर बिंदूपासून सोडली जायची तसेच त्यांचे लक्ष्यही स्थिरच असायचे. व्हिएतनाम युद्धातील क्षेपणास्त्र सतत गतिमान अशा लढाऊ विमानांतून सोडले जायचे आणि त्यांचे लक्ष्यही बऱ्याचदा फिरते असायचे. टीआयने संरक्षण खात्यासाठी याआधी केलेल्या कामांपेक्षा हे वेगळे आणि अधिक गुंतागुंतीचे होते.

जेव्हा टीआय तंत्रज्ञांची भेट कर्नल डेव्हिस या अमेरिकी हवाई दलाच्या नव्या उपकरणांचा शोध घेणाऱ्या विभागप्रमुखाशी झाली तेव्हा त्यांना जाणीव झाली की,  सध्याच्या घडीला अमेरिकी लष्कराला आपल्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी तसेच अमेरिकी समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी एखादा प्रतीकात्मक विजय मिळवण्याची नितांत गरज आहे. कर्नल डेव्हिसच्या मताप्रमाणे उत्तर व्हिएतनाममधील ‘साँग मा’ नदीवर मोक्याच्या ठिकाणी बांधलेला आणि लष्करी तसेच नागरी सामान व उपकरणांची ने-आण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा ‘थॅन हो’ पुलाचा पाडाव करणे हा एक मोठा प्रतीकात्मक विजय मानला गेला असता.           

थॅन हो पुलाच्या बाबतीत अमेरिकेचे अपयश नजरेत भरण्यासारखे होते. केवळ ५४० फूट लांबीचा हा पूल पाडण्यासाठी अमेरिकेने जंग जंग पछाडले होते. गेल्या पाच एक वर्षांत जवळपास आठशेहून अधिक वेळेला बॉम्बगोळे पाडून देखील तो पूल ताठ मानेने तसाच उभा होता. अमेरिकेचे हे मार्गनिर्देशित बॉम्बगोळे जवळपास प्रत्येक वेळेला आपले मूळ लक्ष्य चुकवत पुलापासून पुष्कळ लांब किंवा काही वेळेला थेट नदीपात्रात पडले होते.

टीआयने लगेचच या पुलाला पाडण्याच्या कामी उपयोगात येणाऱ्या शास्त्रागाराचे विश्लेषण करायला सुरुवात केली. क्षेपणास्त्र किंवा बॉम्बगोळय़ांची अचूकता वृद्धिंगत करण्यासाठी त्यांचा वेग, दिशा, लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कार्यक्षमतेने नियंत्रित करणाऱ्या उपकरणाची गरज होती. हे उपकरण शस्त्रास्त्रावर चढवण्याची गरज असल्याने ते हलक्या वजनाचे, हाताळायला सुलभ आणि जोराचा पाऊस किंवा वारा असतानाही कार्यरत राहू शकेल अशा स्वरूपाचे असणे गरजेचे होते. नऊ महिने अथक परिश्रम करून टीआयच्या तंत्रज्ञांनी चिप तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करून बॉम्बगोळय़ांना आपल्या निर्दिष्ट स्थळी अचूकतेने पोचवू शकेल अशा सेन्सरवर आधारित उपकरणाची निर्मिती केली.

नियंत्रण कक्षाकडून प्रसृत झालेली माहिती अथवा आदेश सेन्सरच्या मदतीने स्वीकारणे, पुढे त्या संदेशाची त्वरित छाननी व अंमलबजावणी करणे आणि त्याबरहुकूम शस्त्रास्त्रांचा वेग, दिशा किंवा मार्ग बदलणे आणि आदेशाच्या योग्य अंमलबजावणीची पोचपावती पुन्हा नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचवणे, अशा प्रत्येक कामासाठी या उपकरणात चिप तंत्रज्ञानाचा वापर केला होता. चिप तंत्रज्ञानामुळे वाढलेल्या अचूकतेचा प्रत्यय यायला फार वेळ लागला नाही. १९७२ मध्ये अमेरिकेने अखेर टीआयनिर्मित उपकरणावर बेतलेल्या बॉम्बगोळय़ांनी थॅन हो पुलावर हवाई हमला केला. गेली पाचहून अधिक वर्षे अमेरिकी आक्रमणाला तोंड देऊनही उभा असलेला हा पूल या अचूक लक्ष्यभेदानंतर मात्र कोसळला. व्हिएतनाम युद्धात अमेरिका कधीच विजयी होऊ शकली नाही, पण लक्ष्याचा अचूक पाडाव करण्याच्या तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यात मात्र ती निश्चित यशस्वी झाली होती.

व्हिएतनाम युद्धाने भविष्यातील युद्धे ही लष्करी सामग्री, शस्त्रागार किंवा क्षेपणास्त्रांच्या निव्वळ संख्येवर नव्हे तर त्यांच्या अचूकतेवर जिंकली जातील या गृहीतकावर शिक्कामोर्तब तर केलेच पण क्षेपणास्त्रांना ही क्षमता बहाल करण्यामागे चिप तंत्रज्ञानाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्वदेखील अधोरेखित केले.