‘तत्त्वज्ञानाचा अधिकार कुणाला आहे?’ हा राजकीय प्रश्न तत्त्वज्ञानातला प्राथमिक प्रश्न आहे, असं फ्रेंच विचारवंत जॅक रॉन्सिएर त्याच्या ‘फिलॉसफर अॅण्ड हिज पुअर’ या पुस्तकात नमूद करतो. तो लिहितो की, या राजकीय प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी प्लेटोनं ‘सुंदर लबाडी’ शोधून काढली आहे- ज्यानुसार ईश्वरानं फक्त काहींना तत्त्वज्ञानासाठी आवश्यक ‘सुवर्णात्मा’ तर बाकीच्यांना कष्ट उपसण्यासाठी ‘लोहात्मा’ दिला आहे! प्लेटोनुसार ही ‘सुंदर लबाडी’ नागरिकांनी स्वीकारली पाहिजे. लोहात्मा लाभलेल्यांनी फक्त आपापल्या कामांवर लक्ष दिलं तर राज्याची सुव्यवस्था आणि तत्त्वज्ञानाची शुद्धता टिकून राहील.

‘लोहात्म्यां’चं यांत्रिकीकरण

अर्थातच, ‘शुद्ध’ चिद्वादाचं ऐतिहासिक वर्चस्व पाहता चिद्वादी परंपरेनं प्लेटोची ‘सुंदर लबाडी’ स्वीकारून रॉन्सिएरच्या राजकीय प्रश्नाला बगल देण्यात यश मिळवलं, असं म्हणता येईल. चिद्वादात तत्त्ववेत्त्यांच्या भौतिक स्थानाची चर्चा तत्त्वज्ञानाला कमीपणा आणणारी समजली जाते. चिद्वादी तत्त्वज्ञ स्वत:चं शरीर, सामाजिक लोकेशन अदृश्य करून ईश्वरसदृश मार्गदर्शक म्हणून वावरतात. मात्र पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात भौतिकवाद नावाची चिकित्सक परंपरादेखील आहे जी चिद्वादी ‘सुवर्णात्म्यांना’ आकाशातून जमिनीवर आणून त्यांना त्याचं सामाजिक स्थान आणि त्याभोवतीचं अर्थकारण, राजकारण लपवण्याची परवानगी देत नाही. थोडक्यात, भौतिकवाद हा चिद्वादी सुवर्णात्मांच्या ‘सुंदर लबाडी’ ला आव्हान देत आला आहे. लुई अल्थुसर, जॅक रॉन्सिएर, एतिएन बालिबार सारख्या आधुनिक भौतिकवाद्यांच्या दृष्टीनं, ज्ञानव्यवहार हा दिक्-कालातीत शरीररहित आत्म्यांचा व्यवहार नसून भौतिक जगात स्थित लोकांच्या व्यवहारांपैकीच एक आहे. त्यामुळे ‘तत्त्वज्ञानाच्या व्यवहाराचा अधिकार कुणाला आहे? हा अधिकार इतिहासात कुणी आणि कुणाच्या वतीने उपभोगला?’ या राजकीय प्रश्नांच्या चिकित्सक चर्चेला भौतिकवादी परंपरा मध्यवर्ती स्थान देते. परिणामी भौतिकवादाचा संघर्ष चिद्वादी परंपरेशी होणं क्रमप्राप्त ठरतं. या लेखात आपण पाहणार आहोत की भौतिकवाद वि. चिद्वाद या ऐतिहासिक द्वंद्वात भौतिकवादाची भूमिका फक्त प्रतिक्रियावादी नसून रचनात्मक आणि नवीन जीवनदृष्टी प्रदान करणारी आहे.

दैनंदिन जीवनात मटेरियलिस्ट अर्थात भौतिकवादी म्हणजे भौतिक गोष्टींचा पाठलाग करणारी सुखवादी, भोगवादी, चंगळवादी व्यक्ती. मग प्रश्न पडतो की डिमॉक्रिटस, एपिक्यूरस, लुक्रेशिअस पासून चालत आलेल्या आणि विशेषकरून आधुनिक काळात वैज्ञानिक प्रगतीमुळे मान्यता पावलेल्या एका प्रतिष्ठित तत्त्वपरंपरेला सर्वसामान्यांच्या नजरेत अप्रतिष्ठा कशी प्राप्त झाली? या प्रश्नाचं उत्तर अल्थुसरनं अधोरेखित केलेल्या द्वंद्वात्मक सूत्रात आहे.

अल्थुसर स्पष्ट करतो की इतर मानवी व्यवहारांप्रमाणे ज्ञानव्यवहार हेही शह-काटशहांचं क्षेत्र आहे. किंबहुना ज्ञानक्षेत्रातील कुरघोड्यांचा परिणाम दूरगामी असल्यानं कुठलीही विचारसरणी सत्ता काबीज करते तेव्हा सर्वप्रथम ज्ञानक्षेत्रावर हल्ला करत असते. ग्रंथालयं उद्ध्वस्त केली जातात. विचारांचं अपहरण किंवा विपर्यास करून बदनाम केले जातात. सत्तेला बाधा निर्माण करणारी शिक्षणव्यवस्था उद्ध्वस्त केली जाते. लोकांना शिक्षणापासून वंचित करता आलं तर त्यांना ‘लोहात्मा’ घोषित करणं अधिक सोपं जातं. १९व्या शतकातला फ्रेंच विचारवंत लुई ओग्युस्त ब्लाँकी म्हणतो – ‘शब्दांना व्याख्यांकित न करता त्यांचा वापर करणं, हे धूर्त लोकांचं आवडतं हत्यार आहे.’ विचारप्रणालीत्मक युद्धात तर हे हत्यार अतिशय प्रभावी ठरतं. पाश्चात्त्य परंपरेत भौतिकवादाविषयी ही गोष्ट प्रकर्षानं आढळते. उदा.- प्लेटोनं डिमॉक्रिटस सारख्या आद्या भौतिकवाद्याची दखलसुद्धा घेतली नाही; उलट, डिमॉक्रिटसचं लिखाण जाळण्याची इच्छा प्लेटोनं व्यक्त केल्याची एक तत्कालीन नोंद आहे. वस्तुस्थिती अशी आहे की डिमॉक्रिटसचं जवळपास सर्व लिखाण नष्ट झालं आहे. अॅरिस्टॉटलच्या लिखाणात डिमॉक्रिटसचा पूर्वपक्ष म्हणून उल्लेख होतो तेवढाच. तर मध्ययुगात ऑगस्टिन, जेरोम यांसारखे ख्रिास्ती चिद्वादी भौतिकवादाचं इतकं घृणास्पद चित्र रेखाटतात की एपिक्यूरसचा भौतिकवाद म्हणजे डुकरांचं तत्त्वज्ञान अशी प्रतिमा सर्वसामान्यांत निर्माण होते. प्लेटोच्या सुवर्णात्म्यांनी आखलेल्या विचारप्रणालीत्मक रणनीतीमुळे भौतिकवाद फक्त प्रतिक्रियावादी आहे, उथळ सुखवादी जीवनशैलीचं द्याोतक आहे, नकारात्मक आहे, असं विपर्यस्त चित्र कालौघात निर्माण झालं. ते इतकं खोलवर बिंबलं की सामान्यजन पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातल्या विधायक, चिकित्सक आणि निरर्थक भयापासून मुक्त करणाऱ्या भौतिकवादाविषयी अनभिज्ञ राहतात.

भौतिकवाद म्हणजे नेमकं काय?

पाश्चात्त्य परंपरेतल्या मटेरियलिझम या संकल्पनेसाठी मराठीत भौतिकवाद वा ‘जडवाद’ हे शब्द रूढ आहेत. भौतिकवाद म्हणजे भौतिक तत्त्वाला आधारभूत आणि सत्-तत्त्व मानणारा तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोन. त्यामुळे दृष्टीस पडणारं भौतिकविश्व, त्यातली मानवीसृष्टी ही भौतिक तत्त्वातूनच उत्क्रांत झालेली आहे असं भौतिकवाद मानतो. भौतिक जगापासून वेगळं, स्वतंत्र, स्वयंभू असं काहीही अस्तित्वात नसल्यानं भौतिक जगापलीकडल्या परलोक, ईश्वर, आत्मा इ. गोष्टी भौतिकवादात अनाठायी ठरतात. ओघानंच आधुनिक उत्क्रांतिवाद ( evolutionism) हा भौतिकवादाचं अपत्य ठरतो. त्यामुळे भौतिकवादाचा संघर्ष अनिवार्यपणे धर्मश्रद्धांमधील निर्मितीवादाशी ( creationism) होतो.

खरंतर, भौतिकवाद हा एकजिनसी सिद्धान्त नसून एक परंपरा असल्यात त्यात अनेक छटा आढळतात. उदाहरणार्थ ‘एकसत्तावादी भौतिकवाद’ या प्रवाहातले तत्त्वज्ञ एकाच भौतिक तत्त्वाला सत्-तत्त्व मानून दृष्टीस पडणारी विविधता भ्रामक किंवा दुय्यम ठरवतात. सॉक्रेटिसपूर्व काळात वायू, अग्नी, पाणी यांसारख्या एखाद्या(च) भौतिक तत्त्वाला अंतिम सत्-तत्त्व मानणारे एकसत्तावादी होऊन गेले आहेत. इ.स.पू. सहाव्या शतकातला ग्रीक तत्त्वज्ञ अॅनेक्झामँडर ‘अनामिक भौतिक तत्त्वा’ला सत्-तत्त्व मानतो. म्हणून तो एकसत्तावादी ठरतो. दुसऱ्या टोकाला ‘बहुसत्तावादी भौतिकवाद’ मांडणारेही आहेत, जे अनेक भौतिक तत्त्वांना सत्-तत्त्व मानतात. उदा.- एपिक्यूरसचा भौतिकवाद हा बहुसत्तावादी आहे असं म्हणता येईल.

एपिक्यूरससारखे भौतिकवादी आत्मा, ईश्वर, सारख्या गोष्टींचं अस्तित्व भौतिकवादांतर्गतच मान्य करतात. मात्र एपिक्यूरसनं मान्य केलेला ईश्वर मानवी जीवनात ढवळाढवळ किंवा न्यायनिवाडा करत नाही. १९व्या शतकातल्या भौतिकवादाचं प्रसिद्ध उदाहरण म्हणजे कार्ल मार्क्स. फॉयरबाखच्या भौतिकवादात हेगेलची चिद्वादी गतिशीलता मिसळून मार्क्सनं ऐतिहासिक भौतिकवाद मांडला. मार्क्ससाठी भौतिकता सगळ्या गोष्टींचं पायाभूत तत्त्व आहे आणि नजरेस पडणाऱ्या चिद्वादी गोष्टी भौतिक संबंधांचं प्रतिबिंब.

थोडक्यात भौतिकवाद चैतन्य, भावना, विचार, कला, संस्कृती, तत्त्वज्ञान, विज्ञान, धर्म सारख्या गोष्टींचं अस्तित्व स्वीकारतो; पण त्यांचं स्वयंभू अस्तित्व आणि पारलौकिक आधार नाकारतो. खरंतर, आधुनिक भौतिकवाद्यांचा आशावाद असा की धर्म, परतत्त्व, ईश्वर सारख्या गोष्टींची जागा कालौघात भौतिकतेला आधारभूत मानणारे कला, साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान आणि आध्यात्मिकता घेतील. इतिहासात भौतिक स्थित्यंतरांनुसार सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक, धार्मिक स्थित्यंतरं झालेली आहेत असं आधुनिक भौतिकवादी सप्रमाण निदर्शनास आणून देतात.

इथवरच्या विवेचनात भौतिकवादाची केवळ सत्ताशास्त्रीय चर्चा झाली आहे. सत्ताशास्त्रीय म्हणजे ज्या वस्तूला तत्त्वज्ञानात ‘सत्’ मानलं जातं अशा बाबींचा विचार. ही सत्ताशास्त्रीय चर्चा साहजिकच तत्त्वज्ञानातील ज्ञानशास्त्र, नीतिशास्त्र, सौंदर्यशास्त्र यांसारख्या शाखांची दिशा निश्चित करते. उदा.- भौतिकवादाचे नीतिशास्त्रातील परिणाम काय आहेत? आत्मा, ईश्वर, परलोक इत्यादी गोष्टी वजा केल्या तर योग्य व सुखी जीवन जगता येईल का? तसं जगता येत नाही म्हणून तुम्ही या गोष्टी जन्माला घालता का? असा तार्किक प्रतिप्रश्न भौतिकवादी करतील. चांगलं जीवन जगण्यासाठी भीती निर्माण करणाऱ्या वा प्रलोभन देणाऱ्या ईश्वराची गरज भौतिकवादात नसते. भयमुक्त, प्रलोभनमुक्त ऐहिक नीतिशास्त्राला भौतिकवाद सर्वोच्च स्थान देतो.

इथं नमूद करणं आवश्यक आहे की चिद्वाद असो वा भौतिकवाद- तो टोटॅलिटेरियन होतो तेव्हा विनाशवादी ठरत असतो. त्यामुळे चिद्वादाप्रमाणे भौतिकवादांतर्गतही विनाशवादी (nihilistic) टोटॅलिटेरियन छटा आहे. उदा.- तांत्रिक भौतिकवाद मनुष्याचं अंगभूत मूल्य नाकारून मनुष्याला केवळ एक श्रम करणारं यंत्र किंवा राज्यसंस्थेचं साधन समजतो. भांडवलवादी व्यवस्थेच्या मुळाशी यांत्रिक भौतिकवाद काम करतो. पण माणसाला फक्त यंत्र समजणारा यांत्रिक हेही भौतिकवाद प्लेटोच्या ‘सुंदर लबाडी’चं अपत्य नाही का? या सुंदर लबाडीमुळे बहुसंख्य लोकांना ‘लोहात्मा’ ठरवणं आणि मनुष्याच्या यांत्रिकीकरणाची पायाभरणी करून त्याचं माणूसपण एका झटक्यात काढून घेणं शक्य झालं.

पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातली एक प्रतिष्ठित परंपरा असलेल्या भौतिकवादातला मुक्तिदायी विचार आणि चिकित्सक पद्धतीशास्त्र बाजूला सारून भौतिकवादी म्हणजे प्रतिक्रियावादी, अनैतिक, विचारशून्य, सौंदर्यरहित, ध्येयशून्य, वासनांचा गुलाम… अशी नकारात्मक प्रतिमा कशी काय निर्माण झाली? वरच्या विवेचनात नमूद केल्याप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर प्लेटोच्या ‘सुंदर लबाडी’त आणि ‘सुवर्णात्म्यां’च्या सामाजिक स्थानात आहे. आधुनिक काळात ही लबाडी उघड करण्यासाठी रॉन्सिएरनं उपस्थित केलेल्या राजकीय प्रश्नाला भौतिकवादी मध्यवर्ती स्थान देतात : ‘तत्त्वज्ञानाचा अधिकार कुणाला आहे?’

सामाजिकदृष्ट्या विचार केल्यास, बहुतेक चिद्वादी सुवर्णात्मे उच्चभ्रू वर्गातले. त्यामुळे प्लेटोचा असो वा ऑगस्टिनचा, लायबनित्झचा असो वा हेगेलचा, चिद्वादी विचार सत्तारूढ वर्गाला पूरक ठरला आहे. मार्क्सवादानुसार सत्तारूढ वर्ग नेहमीच आपली सत्ता, वर्चस्व आणि हितसंबंध अबाधित ठेवणाऱ्या तात्त्विक चौकटीला वैश्विकतेचं पांघरूण घालून अंतिम आणि एकमेव जीवनदृष्टी म्हणून समाजावर बिंबवत असतो. त्यातही जर शोषित ‘लोहात्मा’ त्यांचं अवमूल्यन करणाऱ्या विचारव्यूहाला स्वत:हून कवटाळत असतील तर सत्तारूढ विचारसरणी हेजिमोनिक झाली आहे हे सिद्ध होतं.
(लेखक फ्रेंच साहित्य-तत्वज्ञानाचे अभ्यासक आहेत.)
sharadcrosshuma@gmail.com

Story img Loader