‘भारतमित्र’ ज्यांना म्हटले जाते, अशा कुणाहीबद्दल भारतीयांना कौतुक असतेच. पण टिमथी हायमन हे मूलत: दृश्यकलेतल्या नवेपणाचे मित्र. चित्रकार आपल्या भोवतालाला कसा प्रतिसाद देतात, नवे काही शोधण्याचा प्रयत्न स्वत:तून कसा करतात, हा त्यांच्या कुतूहलाचा विषय. त्यातून त्यांची मैत्री भारतातल्या काही चित्रकारांशी झाली, त्यांपैकी भूपेन खक्कर हे सर्वांत वरचे नाव. भूपेन खक्कर यांच्यावरील टिमथी हायमन यांचे पुस्तक (प्रथमावृत्ती – १९९४) हे एखाद्या चित्रकाराला मुळापासून कसे समजून घ्यायचे असते, त्याची दृश्यभाषा कशी वाचायची असते याचा वस्तुपाठ! त्यामुळे अनेक कलाप्रेमी भारतीयांचे दुरून प्रेमही टिमथी यांना लाभले. रविवारी- ७ सप्टेंबर रोजी झालेल्या त्यांच्या निधनाची बातमी भारतात सोमवारी पोहोचली, तेव्हा त्यांची एक स्मृतिसभा किमान बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातील कला विभागात तरी व्हावी, असेही अनेकांना वाटले असेल!

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : जेम्स अर्ल जोन्स

याच बडोद्याच्या कला विभागात शिकणारे गुलाममोहम्मद शेख लंडनच्या रॉयल अकॅडमी ऑफ आर्टमध्ये १९६६ साली गेले, तिथे टिमथी हायमन यांच्याशी परिचय वाढून, शेख यांच्यामार्फत टिमथी यांना भूपेन खक्कर यांची माहिती कळली. १९४६ मध्ये ससेक्स येथे जन्मलेल्या पण लंडनमध्येच वाढलेल्या टिमथी हायमन यांनी १९७० पासून भूपेन यांना ओळखत असल्याचा उल्लेख केला आहे. भूपेन हे ‘गे’ आणि टिमथी १९८१ पर्यंत अविवाहित; परंतु ‘आम्हा दोघांत काही तसे आकर्षण नव्हते- भूपेन यांना वयस्कर मंडळी अधिक आवडत’ असा सरळसाधा खुलासा टिमथी यांनी एका मुलाखतीत केला आहे. अर्थात, केवळ भूपेन नव्हे तर सुधीर पटवर्धन, विवान सुंदरम आणि गीता कपूर, मृणालिनी मुखर्जी, नीलिमा शेख, अमित अंबालाल, अतुल दोडिया यांच्यापर्यंतही टिमथी हायमन पोहोचले. समकालीन कलांची जाण आणि आजच्या जगण्याबद्दल सहवेदना, तसेच विनोदबुद्धी वा हसण्यावारी नेणे हाही सहवेदनेचाच प्रकार असल्याची जाणीव हा या साऱ्यांना जोडणारा धागा होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘साल्ट बीफ अॅट हॅचेट्स’ हे १९९२ मधले टिमथी हायमन यांचे चित्र, पटवर्धनांनी त्याआधी केलेल्या ‘इराणी रेस्तराँ’ची आठवण करून देणारे आहे. पण टिमथी हायमन यांची दृश्यभाषा त्यांच्या भारतीय मित्रांपेक्षा निराळी. त्यातल्या त्यात, सुरुवातीच्या काळातले विवान सुंदरम यांच्याशीच तिचे काहीसे साधर्म्य; कारण दोघांवरही संस्कार आर. बी. किटाय, डेव्हिड हॉकनी आदी ‘पोस्टमॉडर्न’ ठरवल्या गेलेल्या चित्रकारांचा होता. हायमन हे स्वानुभवावर आधारलेली, त्या अनुभवाचे दृश्यवर्णन करू पाहणारी चित्रे करत. त्याआधीची त्यांची रेखाचित्रेदेखील दृश्य-टिपणवजा न राहता आकारांचा अनुभव टिपणारी असत. मानवी डोळ्यांना साधारण २०० अंशांपर्यंतचा आडवा परिसर दिसतो, त्याहीपेक्षा थोडा जास्तच परिसर आपल्या सपाट चित्रांमध्ये यावा, असा प्रयत्न हायमन करत. गंमत म्हणजे, याहीपेक्षा अधिक परिसर दाखवणाऱ्या ‘लंडन आय’मध्ये बसल्यावर मात्र त्यांनी स्वत:च्या समीपदृश्यावर भर दिलेला दिसतो! पण जवळ- दूर प्रतिमांचा हा खेळ ते वर्षानुवर्षे आवडीने खेळले. चमत्कृती हा त्यांच्या चित्रांतला आणखी एक विशेष. याची पराकोटी ‘अराउंड भूपेन’ (२००८) या चित्रात दिसते. ‘एलिफंटा बोट’मध्ये ३०० अंशांतल्या परिसर दर्शनात ‘ताजमहाल हॉटेल’ दिसतेच! ही आणि आणखीही अनेक चित्रे ‘टिमथीहायमन.नेट’ या संकेतस्थळावर पाहिल्यास, त्यांच्या मैत्रीची महत्ता उमगेल.