आनंद, उत्साहाचे क्षण म्हणजे खरे तर सण. पण अलीकडे सण, उत्सव साजरे करत असताना दिसतो तो बेभान, बेदरकार अतिउत्साह. अशाने कोणत्याही सणाचा आनंद काळवंडणारच. नुकत्याच साजऱ्या झालेल्या धुळवडीच्या दुसऱ्या दिवशी आलेला, राज्यातील प्रत्येक शहरात बेशिस्तांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाईचा तपशील हेच सांगतो आहे. केवळ वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचा विचार करायचा, तरी मद्यापान करून वाहन चालवणारे, एका दुचाकीवर तिघे, एकेरी वाहतूक असूनही विरुद्ध दिशेने येणारे, अशांवर केलेल्या कारवायांची संख्या प्रत्येक शहरात काही हजारांच्या घरात आहे. वानगीदाखल, एकट्या पुण्यात ६११८ वाहनचालकांवर कारवाई झाली आणि सुमारे ५१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय दाखल केलेले गुन्हे वेगळेच. ही कारवाई झाली, त्याचे स्वागतच; पण अशा हजारो बेशिस्तांमुळे या सणांचा शांतपणे आनंद साजरा करू इच्छिणाऱ्या अनेकांचा बेरंग होत असतो. पोलिसांचा बंदोबस्त कुठे-कुठे ठेवणार? याच धुळवडीच्या दिवशी राज्यात विविध दुर्घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. यात बुडून प्राण गमावलेल्यांची संख्या अधिक होती. धुळवडीनिमित्त पाण्यात पोहायला गेलेल्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने यातील बऱ्याचशा दुर्घटना घडल्या. ऐन तारुण्यात असलेल्यांच्या अशा अचानक जाण्याने, तेही सणाच्या दिवशी, कुटुंबीयांवर दु:खाचा काय डोंगर कोसळत असेल, याची कल्पनाही करवत नाही. खोल पाण्याच्या ठिकाणी, नद्यांच्या किनारी, तलावांच्या, धरणांच्या काठी विशेषत: सण-उत्सवांच्या दिवशी अधिक कडक बंदोबस्त ठेवण्याची गरज यातून पुन्हा एकदा अधोरेखित झालीच. पण, त्याचबरोबर अतिउत्साहाच्या भरात भलते धाडस न करण्याचे भान तरुणाईनेही बाळगणे गरजेचे असल्याचेही तितकेच महत्त्वाचे.
अलीकडे प्रत्येक सण वा उत्सवा वेळी काही ना काही दुर्घटना घडणे किंवा सर्वसामान्यांना त्रास होईल, असे वर्तन सार्वजनिक ठिकाणी घडणे नित्याचे झाले आहे. धुळवडीचेच उदाहरण थोडे खोलात जाऊन पाहिले, तर गेल्या दोन दशकांत इतर अनेक सण, उत्सवांप्रमाणे धुळवडीला रंग खेळण्याचाही ‘इव्हेंट’ झाला. अशा ‘इव्हेंट’ना जाणे हे काही जणांना ‘स्टेटस’चे वाटत असल्याने, असे वाटणाऱ्यांच्या समूहाची बाजारपेठ लक्षात घेऊन ‘इव्हेंट’ना प्रायोजकत्वही सहज मिळते आणि त्यात सहभागींना जे एरवी खुले आम करता आले नसते, ते करण्याची संधीही. अशा इव्हेंटमध्ये कशा प्रकारचा धुडगूस चालतो हेही आता गुपित नाही. पण तेथून बाहेर पडणारे इतरांसाठी उपद्रव होत चालले आहेत.
बाकी प्रत्येक सण, उत्सवाला डीजे आणि ध्वनिवर्धकांच्या भिंती, हा तर जणू शिरस्ता असल्याचेच गल्लोगल्ली दिसून येते. त्यांना जोड असते कायमचे अंधत्व आणण्याची क्षमता असणाऱ्या प्रकाशझोतांची. संगीताच्या तालावर नाचणारे हे रंगीबेरंगी तीव्र प्रकाशझोत अनेकांच्या दृष्टीला अपायकारक ठरूनही त्यांचा वापर काही कमी होत नाही. ध्वनिवर्धकांच्या भिंतींवरून लावली जाणारी गाणी आणि त्यांचा ‘आव्वाज’ यावरून तर अनेकदा न्यायालयांनीही खडसावून झाले. तरी, त्यांचीही कर्कशता काही कमी होत नाही.
या ‘आव्वाजां’चीही अलीकडे स्पर्धा असते. अमुक एका गल्लीचा दादा विरुद्ध तमुक बोळाचा भाई अशा चढाओढीला त्या-त्या भागातील राजकीय पुढाऱ्यांचे वरदहस्त असतात. त्यातून, ‘यांनी’ असे केले, म्हणून ‘त्यांनी’ तसे करायचे, हे प्रकार तर आता उत्सवांच्या बाबतीतही सर्रास सुरू आहेत. अशात एखादा नारळ पुढाऱ्यांच्या हस्ते वाढवायचा, की हे गल्ली-बोळातले दादा, भाई ‘आव्वाज’ वाढवायला मोकळे. ही ‘फौज’ पदरी बाळगल्यानेच आपले राजकीय वजन वाढते राहील, याची स्थानिक नेत्यांना आणि पर्यायाने त्यांच्या वरच्या नेत्यांनाही खात्री पटू लागली आहे. यामुळेच तर अलीकडे सारखे उन्मादी जल्लोष होत राहतात. दर दोन-तीन आठवड्यांतून एकदा शहर-गावांमधल्या ठरावीक भागांपुरत्या निघणाऱ्या मिरवणुका पाहिल्या, तरी याची वाढती व्याप्ती लक्षात येईल. यातून वाढत चाललेला उन्माद वेळीच रोखला नाही, तर तो सामाजिक शांतता बिघडवणारा असेल, हे अशा उत्सवीपणाला प्रोत्साहन देणाऱ्यांनी लक्षात ठेवलेले बरे.
या सगळ्यात ज्यांनी कारवाई करायची, त्या प्रशासनाची, त्यांनीच करून घेतलेली हात बांधल्यासारखी अवस्था आणि ‘पब्लिक’ला हेच हवे आहे, असे दामटून सांगणाऱ्या पुढाऱ्यांची मनमानी, यांमुळे डीजेचा ‘आव्वाज’ वाढतोच आहे. आणि, या गोंगाटामुळे आधीच बहिरेपण आलेले, हे सगळे नको असलेले, असे जे काही आहेत, ते या सगळ्यापुढे मुके झाले आहेत. त्यांचे गप्प बसणे हे रंगाचा बेरंग होत असल्याचे लक्षण. पण, आजार गंभीर होण्यापूर्वी या लक्षणावर उपचार करणार कोण, हाच खरे तर आता प्रश्न आहे.