काल, आज आणि उद्या अशा त्रिकालदर्शी महाराष्ट्राचे चित्र, चरित्र आणि चारित्र्य समजून घ्यायचे तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख, दिलेल्या मुलाखती आणि विविध परिसंवादांतून महाराष्ट्रासंबंधी व्यक्त केलेली मते समजून घेणे अनिवार्य ठरते. ‘महाराष्ट्रदर्शन’ (१९४९), ‘उद्याचा महाराष्ट्र’ (१९५९), ‘महाराष्ट्र जीवन : तत्त्वमीमांसा’ (१९६०), ‘महाराष्ट्राची राजकीय क्षेत्रातील नीतिमत्ता’ (१९६२), ‘महाराष्ट्राची नवी अस्मिता’ (१९८१) ही शीर्षके डोळ्यांसमोरून घातली तरी कालौघात तर्कतीर्थ महाराष्ट्राबाबत किती अंगाने विचार करीत निरीक्षणे नोंदवत राहतात, हे लक्षात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सत्यकथा’ मासिकाच्या डिसेंबर, १९४९ च्या अंकात तर्कतीर्थांचा ‘महाराष्ट्रदर्शन’ शीर्षकाचा लेख आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘येथील निसर्ग काबाडकष्ट करणाऱ्याला जगविण्यास समर्थ आहे. कोकणात वनश्री आहे; पण अन्नाचा तुटवडा आहे. मावळ प्रांत वगळता उन्हाळ्यात महाराष्ट्रात पाण्याचा तुटवडा पडतो. महाराष्ट्र हा मुंबईच्या बँकांतील भांडवलावर उभारलेल्या कारखान्यांना मजुरांचा भरपूर पुरवठा करणारी शेतकऱ्यांची वसाहत बनत चालला आहे. महाराष्ट्राच्या सामान्य माणसाचे उत्पन्न अल्प असल्याने स्वभाव आळशी नसूनही त्याच्या उत्साहाला ज्ञानाचा मार्गदर्शक डोळा नाही. महाराष्ट्रात पुस्तकी शिक्षणाच्या सोयी गेल्या तीस वर्षांत झपाट्याने वाढीस लागल्या. झीज व पैशाची घस सोसून शिक्षण घेण्याची आंच येथील सांस्कृतिक परंपरेने निर्माण होते. महाराष्ट्रातील स्त्री काही सन्मान्य अपवाद वगळता स्वातंत्र्य भोगत आहे. स्त्री शिक्षण, विधवा विवाह, प्रौढ विवाह इ. सुधारणांस प्रथम विरोध झाला तरीही तो फार काळ टिकला नाही. आज महाराष्ट्रात स्त्री जन्मभर अविवाहित राहून समाजात प्रतिष्ठितपणे मिरवू शकते. कुटुंब लहान व सुटसुटीत ठेवण्याकडे महाराष्ट्राचा कल वाढतो आहे.

वैज्ञानिक साधनांच्या योगाने मनुष्य कायमचा वैभवयुगात प्रवेश करणार आहे, ही एक पौराणिक अद्भुतरम्य कल्पनेप्रमाणे असलेली अतिशयोक्तपूर्ण कल्पना आहे. तिला पाहिजे इतका सबळ गणिती व प्रत्यक्ष पुरावा मिळालेला नाही. प्रजा वाढत आहे, म्हणजे खाणारे वाढत आहेत. परंतु, त्यामानाने खाद्या वाढत नाही. अज्ञान व मागासलेपणा घालविण्यास केवळ आर्थिक अनुकूलता भागत नाही, त्याकरिता सांस्कृतिक परंपरा निर्माण करावी लागते.

महाराष्ट्राची सांस्कृतिक व राजकीय स्थिती इतर प्रांतांपेक्षा अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण उद्बोधक व प्रक्षोभक आहे. विद्या, कला, वाङ्मय ही सांस्कृतिक अंगे लक्षात घेतल्यास असे दिसते की, महाराष्ट्राला मोठे भवितव्य आहे. विद्योची महती महाराष्ट्राला संपत्तीपेक्षा महाराष्ट्रीयाला अधिक वाटते. विद्यावंताला महाराष्ट्रात सर्वांत उच्च स्थान मानाच्या दृष्टीने प्राप्त होते. निष्काम निष्ठेने विद्याव्यासंग करून साधे किंवा अकिंचन जीवन जगण्याची तपस्विता व यतीवृत्ती महाराष्ट्रात अजून अंशत: शिल्लक आहे. अनेक महान विभूतींनी ही परंपरा निर्माण केली असली तरी नव्या पिढीत विश्वविद्यालयीन परीक्षेत उत्कृष्टपणे उत्तीर्ण होऊन वरच्या सरकारी नोकऱ्या पटविण्याची प्रवृत्ती जोरावू लागली आहे. महाविद्यालयीन अध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक हा वर्ग उपजीविका यादृष्टीनेच केवळ आपल्या व्यवसायाला महत्त्व देऊ लागला आहे.

जातिभेदाची तात्त्विक बैठक फारच थोड्या ठिकाणी आता राहिली आहे. राजकीय व सामाजिक चळवळीने ती तात्त्विक भूमिका ढासळून टाकली आहे. परंतु, महाराष्ट्राच्या गृहसंस्कृतीत शिरल्याबरोबर डोळे उघडतात. भिन्न जातींमध्ये त्यांच्या दैनंदिन गृहजीवनात सांस्कृतिक एकतेचा, भावनेचा ओलावा उत्पन्न करणारा बिंदूसुद्धा सापडत नाही. महाराष्ट्रीयत्वाचा ऐक्याच्या जिव्हाळ्याचा आमच्या गृहसंस्कृतीतील नित्य व्यवहारात पूर्ण वैशाखी उन्हाळा अनुभवास मिळतो. राजकीय जागृतीच्या दृष्टीने महाराष्ट्र हा सर्व प्रांतांपेक्षा पुढे आहे. महाराष्ट्रात राजकीय पंथ-भेद पुष्कळ आहेत. त्यांचे बेबंधशाहीत रूपांतर झाले नाही, तर महाराष्ट्रात नवजीवनचा हुरूप भरण्यास लवकरच सुरुवात होईल.

मूळ ‘महाराष्ट्रदर्शन’चे हे सार १९४९ चे. आज २०२५ आहे. गेल्या ७५ वर्षांत महाराष्ट्राचे निर्माण झालेले चित्र आपल्यापुढे आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी यथाशक्य वस्तुनिष्ठ चित्र उभे करून तत्कालीन महाराष्ट्रीयांना अंतर्मुख करण्यासाठी केलेले हे लेखन विकासास प्रेरणा देणारे आणि नवस्वप्नांना जागविणारे होते.

 डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com