गरीश कुबेर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काळ कुठे थांबला असेल तर तो नक्कीच अक्स ला थर्मीससारख्या गावात. आणि दुसरी जागा त्याला आवडली असेल ती आंडोराची राजधानी. तिथून पूल पार करून गेलं की घड्याळशिल्प…

काही वर्षांपूवीर् ऑस्ट्रियामध्ये झेल अम सी आणि हॉलस्टॅट ही दोन कमालीची सुंदर ठिकाणं अनुभवल्यानंतरचा निर्धार असा की प्रत्येक सहलीत एक तरी युरोपीय खेडं (या शब्दाला काही पर्याय शोधायला हवा. फारच खरखरीत आहे तो.) बघायचंच बघायचं. हॉलस्टॅटहून परतल्यावर अवघ्या काही आठवड्यांत युरोपातल्या सर्वात सुंदर खेड्यांपैकी एक म्हणून त्याचं नाव जाहीर झालं होतं. तेव्हा परत असं काही व्हायच्या आधी ही जागा आपण पाहिली असलेली बरी, असाही एक विचार.

पण या वेळी स्पेन सहलीतल्या आंडोरा या ठिकाणानं एक अनपेक्षित धक्का दिला. हे खेडं आहेच आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा एक देश आहे. एक-खेडीय सार्वभौम देश. एका खेड्याचा देश. जगातल्या सगळ्यात लहान देशांमधला एक असा हा देश. दऱ्यांमध्ये वसलेला. एकंदर वस्ती जेमतेम ८० हजारही नाही. त्यातले दोनतृतीयांश हे बाहेरचे. आता देश म्हटला की त्याची राजधानी आली. ती या देशालाही आहे. ‘आंडोरा ला वेला’ हे या राजधानीचं नाव. लोकसंख्या साधारण १८ हजार. देशाचीच लोकसंख्या ८० हजार म्हटल्यावर राजधानीची इतपतच असणार. या अख्ख्या देशात एकही रेल्वे नाही. चार-पाच द्रोण एकत्र जोडले तर कसे दिसतील अशी या ‘देशाची’ रचना असावी. दऱ्या दऱ्या नुस्त्या. आता दरी म्हटलं की तिला जो एक अक्राळविक्राळपणा येतो, लगेच दरीत बस कोसळून… वगैरे बातम्या आठवतात तसं इथं काही नाही. दऱ्याच; पण गोंडस. अगदी सहज चालत खाली उतरत जाता येतील अशा. आसपास छोटे-मोठे झरे. आणि थोड्या थोड्या अंतरावर घरं.

हेही वाचा >>> अन्यथा : पिकासो, रशीद खान आणि संस्कृती ! स्पेनचे धडे : १

तर आंडोरा हे खेडं असलं तरी तो एक स्वतंत्र देश आहे. फ्रान्स आणि स्पेन यांच्या सांदीत त्याचं स्थान. एका बाजूनं फ्रान्स आणि तीन बाजूंनी स्पेन अशी त्याची रचना. तांत्रिक अर्थानं हा ना स्पेनचा भाग ना फ्रान्सचा. या दोन्ही देशांपासून फटकून असलेल्या या देशाचा तोरा असा की तो युरोपीय युनियनमध्येही सहभागी नाही. एखाद्या मोठ्या वाड्यात कोपऱ्यातलं घर जसं आपला स्वतंत्र बाणा राखून असावं… तसं हे आंडोरा. या देशाचं चलन युरो हेच. पण ते छापायचा अधिकार त्या देशाला नाही. आपल्याला म्युनिसिपालिटी माहीत असते. आंडोरा ही प्रिन्सिपालिटी आहे. मोनॅको या ‘एक शहरी’ देशासारखी. मोनॅकोप्रमाणे आंडोराही फ्रान्सच्या आणि चर्चच्या आधिपत्याखाली आहे. एके काळी रोमन साम्राज्याचा भाग असलेलं आंडोरा आजही त्याच धुंदीत आहे.

गंमत अशी की हे खेडं हा ‘स्वतंत्र देश’ असल्यामुळे त्याची कररचनाही स्वतंत्र आहे. खरं तर हे ‘टॅक्स हेवन’ आहे. त्यामुळे युरोपातल्या आणि मुख्यत: फ्रान्स आणि स्पेनमधल्या अनेक धनाढ्यांचा इथं घरोबा. आणि घरंही. त्यामुळे लोकसंख्येपैकी जवळपास दोनतृतीयांश जनता ही ‘परदेशी’. त्यांच्याकडे आंडोराचं नेतृत्व करायचा अधिकार नाही. मूळचे आंडोरियनच आपला हा ‘देश’ चालवणार. तर हे देश-खेडं ‘कर नंदनवन’ असल्यामुळे सगळीकडेच ड्यूटी फ्री. पॅरिसचा शाँझ एलीझे, लंडनची ऑक्सफर्ड स्ट्रीट वगैरेंच्या तोंडात मारेल असा या शहराचा ब्रॅण्ड-दिमाख. जगातल्या सगळ्या श्रीमंत, अतिश्रीमंत सौंदर्यप्रसाधनांची स्वत:ची झकपक दुकानं या ‘खेड्या’त आहेत. आंडोराची स्वत:ची अशी पिकं दोनच. एक ‘राय’ या नावानं (याचं भारतीय नाव काय कोणास ठाऊक!) ओळखलं जाणारं धान्य. आणि दुसरं म्हणजे एका विशिष्ट प्रकारचा तंबाखू. आता ‘राय’पासून काय काय बनतं आणि कोणकोणत्या रंगरूपानं पोटात जातं हे काही चाणाक्षांना सांगायला नको. आणि तंबाखूविषयीही धूर काढावा तितका कमीच. त्यामुळे या ‘खेड्या’त पावलोपावली विविध ‘राय’द्रव्यं (त्याविषयी स्वतंत्रपणे नंतर कधी…!) आणि तंबाखू उत्पादनांची रेलचेल. या दोघांचे इतके प्रकार पाहून ‘कोटि कोटि रूपे तुझी…’ म्हणत सूर्य-चंद्र-तारेच आठवतात. या असल्या विषयांच्या इतक्या मुबलकतेचा परिणाम असा की आंडोरा ही बारमाही बाजारपेठच बनून गेलीय. वाईन एक युरोपेक्षाही स्वस्तात अन्यत्र कुठे मिळणार बिचाऱ्या युरोपियनांना!

पण खरं सांगायचं तर इथं या साऱ्या परिसराच्या वातावरणातच एक वाईनसारखी मधाळता भरून राहिलेली आहे. बार्सिलोनापासून तीन-चार तासांच्या अंतरावर असेल आंडोरा. जाताना परदेशात जात असल्यासारखा जामानिमा तयार ठेवावा लागतो. बार्सिलोना सोडल्यानंतर दोनेक तासांत आंडोरा शब्दश: चढावा लागतो. म्हणजे डोंगर, घाट वगैरे. हिमाच्छादित शिखरं अशी हाताशी येऊन ठाकतात. शिवाय समोर आणि वर झुलते पाळणे. आपल्याकडे घाटात कसे विजेचे प्रचंड खांब आणि तारा दिसतात, तसे तिकडे हे खांब आणि त्या मधल्या तारांवर झुलते पाळणे.

कारण मुळात आंडोरा हे स्कीईंगचं केंद्रच आहे. नोव्हेंबर-डिसेंबरात बर्फ पडू लागलं की जगभरातले स्कीईंगप्रेमी त्या बर्फावरनं घसरून घेण्यासाठी गर्दी करू लागतात. तिथली सगळी हॉटेल्स त्यामुळे बनलेली आहेत ती या स्कीईंग करणाऱ्यांसाठी. तिथे त्यासाठीची सगळी सामग्री भाड्यानं देणारी दुकानं आहेत पावलापावलांवर. हा खरं तर बर्फाचा काळ नाही. पण तरीही समोरच्या शिखरांना बर्फाची पांढरी शुभ्र टोपडी घातलेली होती निसर्गानं. वारा त्यांना स्पर्श करून यायचा. त्यामुळे त्याचाही कुडकुडण्यासारखा आवाज. आपल्या लेह वगैरे ठिकाणी जिथं बर्फाळलेला असतो परिसर, तिथं एरवी सगळं भकास वाटतं. गवताचं पातंही नाही. डोंगर बोडके. पण इथं का वेगळं माहीत नाही. सगळं हिरवंगार. कल्पनाचित्र जणू. वाटेत एक गाव आहे. ‘अक्स ला थर्मीस’ अशा नावाचं. ते तर शुद्ध स्वप्नातलं असावं असं. जेमतेम शंभरभर घरं असतील. त्या गावाला वळसा घालून जाणारा महामार्ग लांबनं पाहिला तर आकर्षक कंबरपट्टा वाटेल असा. इतकं चिमुकलं गाव की दहा मिनिटांत दोन टोकं पार करता येतील.

पण या दोन टोकांच्या मध्ये एक वेगळीच गंमत. एका आयताकृती चिंचोळ्या पाण्याच्या टाकीसारखी रचना. कोणी कृत्रिम कारंजं केलंय असं वाटावं. पण या कारंजाचं पाणी मात्र गरमागरम. दुसऱ्या टोकाला ते गावच संपतं. एकदम टेकडी सुरू. त्या टेकडीच्या गर्द झाडीत लहान लहान घरं. आणि गावची चावडी असावी असा हा गरम पाण्याचा हौद. त्या हौदाच्या कडेनं माणसं उबेला बसलीयेत निवांत कॉफी पीत. कोवळ्या उन्हात. सगळंच कोवळं तिथं. ऊन तरी कुठलं निबर असायला. काळ कुठे थांबला असेल तर तो नक्कीच या गावात.

आणि दुसरी जागा त्याला आवडली असेल ती आंडोराची राजधानी. या राजधानीच्या एका कडेला डोंगर. खालच्या गावातल्या चर्चचं निमुळतं शिखर डोंगराच्या उंचीला स्पर्श करणारं. त्या चर्चच्या परिसरात गोलाकार गाव. बरोबर मधून जाणारी पायवाट. कमालीच्या सुंदर अशा या पायवाटेच्या दोन्ही बाजूंना चकचकीत दुकानं. त्यातल्या उत्पादनांच्या किमती खेड्याच्या खेडवळपणाला न शोभणाऱ्या. श्रीमंती अशी दुथडी भरून वाहती. एखाद्या सहज नैसर्गिक झऱ्यातनं पाणी वाहावं अशी. खरा आनंद ही पायवाट संपेपर्यंत चालत जाण्यात आणि ती संपली की…

तिथं उजवीकडच्या डोंगरावरनं खळाळत येणारं पाणी. त्या प्रवाहाच्या वरून ओलांडता यावं यासाठी बांधलेला, खेळण्यातला वाटेल असा असा एक पूल. तो ओलांडला की मध्ये लुटुपुटुचं वाटेल असं ट्राफिक आयलंड आणि त्याच्या मध्ये साल्वादोर दाली याचं विख्यात घड्याळशिल्प. या चित्रकाराचं स्मारक. मागच्या डोंगरशिखरावरनं तयार झालेली एक दृश्य रेषा या शिल्पामार्फत आपल्या पायापाशी येऊन थांबते आणि पाण्याचा झरा खळाळत्या आवाजासह तिला छेद देतो… इतकं विलक्षण दृश्य…!

काहीच करायचं नाही. साइट-सीईंग वगैरे नाही. कशावरही टिक करायची नाही… नुसतं आपण तिथं असणं हाच आनंद… सार्वभौम!

girish.kuber@expressindia.com @girishkuber

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trip to spain spanish capital of andorra villages ancient spain town ax les thermes zws
Show comments