‘पद्मश्री’चे मानकरी ठरूनही वारली चित्रकार जिव्या सोमा मशे हे अखेपर्यंत जसे साधेपणाने जगले, तसेच त्रिपुरामधील ‘रोसेम’-वादक थांगा डारलाँग यांचे जगणे होते. ‘रोसेम’ हे स्कॉटिश ‘बॅगपाइप’ आणि भारतीय ‘बीन’ या दोहोंचा संगमच भासणारे वाद्य. त्याच्या सुरावटी आजन्म जपून, इतरांनाही मुक्तपणे वाटून ३ डिसेंबरच्या रविवारी थांगा डारलाँग निवर्तले, तेव्हा ते १०३ वर्षांचे होते. वयाच्या ९९ व्या वर्षी (२०१९) त्यांना ‘पद्मश्री’ मिळाली, तर २०१४ मध्ये त्यांचा गौरव ‘संगीत नाटक अकादमी’ने केला होता. काही इंग्रजी दैनिकांनी त्यांच्या निधनवार्तेत, ‘रोसेमचे अखेरचे वादक- त्यांच्यानंतर कुणी नाही’ – असेही सांगण्याचा उत्साह दाखवला असला तरी, ‘आदिवासी संगीत-कलेच्या प्रसारा’साठी त्यांना हे दोन्ही राष्ट्रीय सन्मान मिळाले होते आणि ‘प्रसार’ करण्यासाठी- म्हणजे कुणाही इच्छुकाला शिकवण्यासाठी- थांगा डारलाँग नेहमीच तयार असत. पूर्व क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रानेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०१५ मध्ये शिबीर आयोजित केले होते.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध: सॅण्ड्रा डे ओ’कोनूर
डारलाँग हे थांगा यांच्या जमातीचे नाव. ही जमात मूळची मणिपूरमधली आणि (आज हिंसाचारात अडकलेल्या) कुकी समाजापैकी. त्या जमातीचे वैशिष्टय़ म्हणजे ‘रोसेम’ हे सुषीरवाद्य! कमंडलूत मधूनच बासऱ्या खोवल्यासारखा याचा आकार दिसतो आणि तंबोऱ्यापासून बीनपर्यंतची अनेक वाद्ये जशी भोपळय़ापासून बनतात, तसेच हे रोसेमही दुधीभोपळय़ाच्या पोकळीचा वापर करणारे असते. खालच्या, तुलनेने मोठय़ा आकाराला एका बाजूस भोक पाडून त्यात बासरीसारखे बांबू रोवलेले असतात आणि यापैकी मोठय़ा बासऱ्या वरून बंदही केल्या जातात. बीनच्या भोपळय़ात फार तर दोन बासऱ्या खोवलेल्या दिसतील, पण इथे रोसेममध्ये किमान पाच.. आणि त्याही बॅगपाइपसारख्या निरनिराळ्या दिशांना! तोंडाने फुंकत असताना एकाच वेळी दोन-दोन बासऱ्या हाताळत सुरावट निर्माण करायची, असे या वाद्याचे तंत्र थांगा डारलाँग यांच्या घराण्यात पिढीजात होते. त्यांचे वडील आणि आजोबा, थोरले काका हेच त्यांचे गुरू. पुढे ही परंपरा टिकवण्याचा ध्यास त्यांनी घेतला, तोवर ‘रोसेमवादक’ ही त्यांची ओळख सर्वदूर पसरली होती.. राज्य आणि केंद्र सरकारने आयोजित केलेल्या लोककला उत्सवांचीही निमंत्रणे त्यांना येऊ लागली होती. मग पन्नाशीनंतर काही काळ त्यांनी स्वत:चा (बहुश: कुटुंबीयांचाच) संगीत-चमूही स्थापन केला. वयपरत्वे ते घरीच राहू लागले तरी ‘रोसेम’वादन सुरूच राहिले! त्रिपुरात गेल्या १२ वर्षांपासून लोकसंगीत महाविद्यालय सुरू आहे. पण तेथे जाण्याऐवजी त्रिपुराच्या ऊनाकोटी जिल्ह्यातील कालियासहर शहरानजीकच्या मुरारीबाडी या सुदूर वस्तीतच राहणे थांगा डारलाँग यांनी पसंत केले. ‘मी आज थांगा डारलाँग यांना घर बांधण्यासाठी दीड लाख रुपयांची मदत केली’- ‘मी कोविडकाळातली मदत म्हणून थांगा डारलाँग यांना दहा किलो तांदूळ दिला’ अशा समाजमाध्यमी जाहिरातींमधून राजकारणाची इयत्ता त्रिपुरातले सत्ताधारी दाखवत राहिले असतानाच्या फोटोंमध्येही, थांगा डारलाँग मात्र स्वत:तच हरवल्यासारखे दिसतात.. कलावंताचा सच्चेपणा हाच असतो का?