एल के कुलकर्णी

चक्रीवादळे का होतात, ते एकेकाळी माहीत नव्हते. पण संशोधनानंतर ते समजू लागले. आता चक्रीवादळ ज्या परिसरात येते, तेथील देशाने योजलेले नाव त्याला दिले जाते.

Vasu Baras 2024 Date Shubha Muhurat! What is meaning of Vasu Baras
Vasu Baras 2024 Date: दिवाळीच्या आधी वसुबारस का साजरी केली जाते? जाणून घ्या वसुबारस शब्दाचा अर्थ अन् पूजेचा शुभ मुहूर्त
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
formation of the earth
भूगोलाचा इतिहास : धरतीची जन्मकथा
is Dissatisfaction in North Gadchiroli over Sohle Iron Mine
सोहले लोहखाणीवरून उत्तर गडचिरोलीत असंतोष? खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला…
Steering Committee Approves Maharashtra Revised Curriculum with CBSE Influence
लेख : देशांतर्गत वसाहतीकरणाचा ‘आराखडा’!
Many passenger trains canceled on East Coast Railway due to impact of cyclone Dana
‘दाना’ चक्रीवादळाचा रेल्वेला फटका; ऐन सणासुदीत प्रवासी गाड्या रद्द
danger of Cyclone Dana Who gave this name and what is the meaning
‘दाना’ चक्रीवादळाचा धोका! कोणी दिले हे नाव, काय आहे अर्थ?
bricks in russia narendra modi
BRICS Summit: ब्रिक्स म्हणजे काय? यंदाची शिखर परिषद भारतासाठी महत्त्वाची का आहे?

कुणास वाटे रूप देखणे

भय प्रलयाचे कोणा वाटे

निसर्ग वादळ दृश्य अलौकिक

मनास माझ्या अद्भुत वाटे

या डॉ. राम राऊत यांच्या ‘तांडव’ या कवितेतील ओळी आहेत. तसे फोटोत सुंदर दिसले तरी चक्रीवादळ प्रत्यक्षात धडकी भरवणारेच असते. त्याचे हे नावही किती समर्पक आहे? अमेरिकेत त्याला ‘हरिकेन’ म्हणतात. कोलंबससोबत गेलेल्या स्पॅनिशांनी हे नाव युरोपात आणले. ‘हराकेन’ ही माया संस्कृतीतील तर ‘हुराकेन’ ही कॅरिबियन परिसरातील अनिष्टांची देवता. त्यावरून ‘हरिकेन’ हा शब्द आला. पूर्व पॅसिफिक महासागरात अशा वादळांना ‘टायफून’ म्हणतात. हे नाव चीनमध्ये बाराव्या शतकापासून वापरले जाते. त्याचा मूळ अर्थ – ‘टिकणारे वारे’. मात्र भारतीय उपखंडात सर्वत्र त्याचा उल्लेख चक्रीवादळ म्हणजे सायक्लोन असा केला जातो.

आजकाल प्रत्येक चक्रीवादळाला त्याचे असे वेगळे नाव दिलेले असते. पृथ्वीवरील एकाच भूप्रदेशात, उदा. बंगालच्या उपसागरात, एकाच वेळी एकापेक्षा अधिक चक्रीवादळे अस्तित्वात असू शकतात. यामुळे गोंधळ टाळण्यासाठी त्यांना नावे दिली जातात. ही नावे जागतिक हवामानशास्त्र संघटना किंवा त्या त्या देशातील हवामानविषयक कार्यालयातील समित्यांतर्फे दिली जातात. जागतिक हवामान संघटनेने उष्ण व उपोष्ण कटिबंधीय वादळे, त्यांचे प्रकार व स्थान यानुसार जगाचे भाग – क्षेत्रे – पाडले असून त्या त्या भागातील देशांना हे नाव देण्याची संधी दिली जाते. भारत त्यापैकी उत्तर हिंदी महासागर क्षेत्रात समाविष्ट आहे. या क्षेत्रात भारतासोबत श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, इराण, मालदीव, कतार, सं. अरब अमिरात इ. चा समावेश होतो. चक्रीवादळांची नावे अनेकदा विचित्र वा गमतीदार वाटतात. कारण ती वेगवेगळ्या भाषेतील असतात. सामान्यत: चक्रीवादळाची नावे ते नाव सुचवणारा देश, त्यांची भाषा व संस्कृती यांना प्रतिबिंबित करणारी असतात. उदा. बांगलादेशाने सुचवलेली नावे, निसर्ग, बीपर जॉय (म्हणजे आपत्ती), अर्णब अशी बंगाली भाषेतील आहेत. भारताने दिलेली नावे गती, तेज इ. आहेत, तर २०२४ मध्ये नुकत्याच येऊन गेलेल्या वादळाचे रेमाल (वाळू ) हे अरेबिक नाव ओमानने दिलेले होते. चक्रीवादळांच्या नावांच्या याद्या काही वर्षे आधीच जाहीर केलेल्या असतात. एकदा चक्रीवादळ निर्माण झाले की, ते अस्तित्वात असेपर्यंत त्याचे नाव बहुधा कायम राहते. एखादे वादळ फार विध्वंसक ठरल्यास ते नाव वादळांच्या नामयादीतून निवृत्त केले जाते, म्हणजे ते पुढे वापरले जात नाही.

हेही वाचा >>> बुकरायण : विजेती न ठरली, तरी महत्त्वाची…

पृथ्वी स्वत:भोवती फिरते. त्यामुळे उत्तर व दक्षिण गोलार्धात चक्रीवादळांची स्वत:भोवती फिरण्याची दिशा भिन्न असते. उत्तर गोलार्धातील चक्रीवादळे प्रतिघड्याळी दिशेने फिरतात. तर दक्षिण गोलार्धात ती घड्याळी दिशेने फिरतात.

चक्रीवादळे फक्त उष्ण व उपोष्ण कटिबंधात होतात. स्थूल मानाने पृथ्वीवर कोणत्या क्षेत्रात व कोणत्या काळात ती वादळे निर्माण होतात, हे अचूकरीत्या माहिती झाले आहे. उष्ण कटिबंधातील चक्रीवादळांचे वार्षिक सरासरी प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. वेस्ट इंडिज बेटे – ६, चिनी समुद्र – ३०, पॅसिफिक महासागर (फिजी बेटे) – २, हिंदी महासागर (मॉरिशस परिसर) – ६. तर भारतीय उपखंड परिसर – १२.

अरबी समुद्रात वर्षाला सरासरी दोन तर बंगालच्या उपसागरात वर्षाला सरासरी दहा चक्रीवादळे निर्माण होतात. म्हणजे बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रापेक्षा अधिक चक्रीवादळे निर्माण होतात. बंगालच्या उपसागरातील वादळे निर्माण झाल्यानंतर वायव्येकडे प्रवास करीत भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकतात. त्यामुळे बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू यांच्या किनाऱ्यांना वारंवार चक्रीवादळाला तोंड द्यावे लागते. अरबी समुद्रात चक्रीवादळाचे प्रमाण कमी असून ती केरळच्या र्नैऋत्येस तयार होऊन प्रथम उत्तरेकडे सरकतात. नंतर महाराष्ट्राच्या समोर आल्यावर काही काळ ती वायव्येकडे प्रवास करीत गुजरातच्या र्नैऋत्येस येतात. येथून ती दिशा बदलून ईशान्येकडे वळून गुजरातच्या किनाऱ्यावर धडकतात. त्यामुळे गुजरातच्या वेरावळ, द्वारका या भागास वारंवार चक्रीवादळास तोंड द्यावे लागते. पश्चिम किनाऱ्यावरील मुंबई व इतर बंदरांना चक्रीवादळाचा तडाखा कमी बसण्याचे कारण त्या वादळांचा असा विशिष्ट प्रवास मार्ग आहे. आणि त्याचे कारण थरचे वाळवंट हे आहे. भारतीय उपखंडातील सर्वात कमी वायुभार क्षेत्र राजस्थान – थरच्या वाळवंटात असते. त्यामुळे अरबी समुद्रातील बहुतेक वादळे राजस्थानकडे जाण्यासाठी ईशान्य दिशेने गुजरातच्या किनाऱ्यावर पोहोचतात.

हेही वाचा >>> बुकमार्क : विश्वभाषेतून शब्दसंचार…

पण चक्रीवादळांचा स्थूल प्रवासमार्ग माहीत असला तरी ते कुठे व केव्हा निर्माण होईल व किनाऱ्यावर नेमके कुठे धडकेल याचा काहीही अंदाज बांधणे पूर्वी शक्य नसे. भारतात पूर्व किनाऱ्यावर १८६४ मध्ये दोन प्रचंड चक्रीवादळे आली. पहिले ऑक्टोबरमध्ये कोलकात्याला व दुसरे नोव्हेंबरमध्ये मच्छलीपट्टणला धडकले. त्यांनी प्रचंड विध्वंस घडवून आणला. तेव्हा सरकारने १८६५ मध्ये चक्रीवादळाच्या पूर्वसूचनेसाठी इशारा यंत्रणा उभारण्याचे ठरवले. अशी पहिली यंत्रणा कोलकाता येथे १८६५ मध्ये कार्यान्वितही झाली. गंमत म्हणजे खुद्द हवामान खाते मात्र त्याच्यानंतर, १८७५ मध्ये स्थापन झाले. पश्चिम किनाऱ्यावर कराची, मुंबई इ. ठिकाणी अशी यंत्रणा १८८० मध्ये उभारण्यात आली. १८८६ पर्यंत सर्व भारतीय बंदरांवर ही यंत्रणा कार्यरत झाली. सुरुवातीला पूर्व व पश्चिम किनाऱ्यावरील वादळाचे संकेतइशारे वेगवेगळ्या पद्धतीचे होते. त्यामुळे उडणारा गोंधळ टाळण्यासाठी १८९८ पासून सर्व बंदरांवरील संकेतइशाऱ्यात एकसूत्रता आणण्यात आली. पुढे यासाठी उपग्रह सेवांसह सर्व अत्याधुनिक तंत्रे वापरण्यात येऊ लागली व त्यातून चक्रीवादळाची अचूक भाकिते मिळू लागली.

आजकाल समुद्रावर सर्वत्र सागरी जलाचे तापमान व वायुभार यावर उपग्रहांद्वारे लक्ष ठेवण्यात येते आणि त्याआधारे संभाव्य चक्रीवादळाचा अंदाज सांगितला जातो. एकदा चक्रीवादळ निर्माण झाले की त्याचा विकास, गती, प्रवासाची दिशा व वेग यावरही उपग्रहांद्वारे लक्ष ठेवले जाते. त्यानुसार संबंधित भागाला इशारे दिले जातात व योग्य सावधगिरीची उपाययोजना करून जीवित व वित्तहानी टाळली जाते. एखाद्या रेल्वेचे वेळापत्रक सांगावे, तसे आजकाल चक्रीवादळाच्या प्रवासाचे वेळापत्रक सांगितले जात आहे. नैसर्गिक आपत्तींना केवळ अटळ संकट न मानता मानवाने या क्षेत्रात साधलेली ही एक श्रेष्ठ सिद्धी होय.

माणूस निसर्गाला गुलाम बनवू शकत नाही हे खरे. पण तो केवळ निसर्गाचा गुलाम म्हणूनही राहू शकत नाही. शास्त्रशुद्ध अभ्यास व त्याला विवेकाची जोड हाच मानवाच्या मुक्तीचा खरा मार्ग आहे. हा मार्ग दाखवणाऱ्या संशोधकांचे आपल्यावर मोठे ऋण आहे.

lkkulkarni.nanded@gmail.com