गिरीश कुबेर

प्लास्टिकला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि गेली ७६ वर्ष बंद-उघड होत असलेले ‘टपरवेअर’ डबे आर्थिक कारणापायी कायमचे बंद होताहेत.. 

Why did the stock market fall before Diwali
Money Mantra : दिवाळीच्या आधी मार्केट का घसरलं?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
share market down marathi news,
शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी!
GST tax evasion of Rs five to eight thousand crore through fake documents Main facilitator arrested from Gujarat
बनावट कागदपत्रांद्वारे पाच ते आठ हजार कोटी रुपयांची जीएसटी कर चुकवेगिरी; गुजरातमधून मुख्य सूत्रधार अटकेत
Pune Municipal Corporation faces the challenge of preventing 40 percent water leakage
लोकजागर : ४० टक्के पाणीगळती रोखा, मग कौतुक करा!
loksatta analysis pune witnesses alarming rise In crime rate
पुणे गुन्हेगारीत नाही उणे! राज्याची सांस्कृतिक राजधानी असंस्कृत, असुरक्षित का बनतेय?
stock market today sensex drops 663 point nifty ends below 24200
परकीयांच्या विक्रीने बाजार बेजार ! करोनानंतरचा सर्वात घातक महिना
sky lanterns, heavy rainfall, lanterns, lanterns news,
कंदिलांना काजळी, आकाश कंदिलांकडे नागरिकांची पाठ, बेभरवशी पावसामुळे नुकसान

डबा ही वस्तू आणि हा शब्द आपल्या आयुष्यात किती किती अंगांनी आलेले असतात? त्याची सुरुवात बहुधा शाळा नामक काळय़ापाण्याची शिक्षा सुरू होते तेव्हाच होते. सुरुवातीला आणि बहुतांश अभागींच्या आयुष्यात कायमही.. शाळा हा प्रकार काही आनंदानं जावा असा नसतो. पण जाण्याला तर पर्याय नाही. सुरुवातीला भले शाळेची शिक्षा दोनेक तासांचीच असेल. पण तरीही त्या शिक्षाकाळात आनंदाचा किरण घेऊन यायचा तो डबा. नंतरही शाळेत मधली सुटी कधी होतेय आणि डबा कधी उघडतोय.. असंच झालेलं असायचं. डब्याची ही भूमिका नोकरी-धंद्याला लागल्यावरही कायम असते. ‘लंच टाइम’ होणं आणि डबा उघडून त्यातल्या पदार्थानी पोटाला आधार द्यायचा आणि तोंडी लावायला असलेल्या ऑफिसमधल्या गप्पांनी मनाला उभारी द्यायची हा अनेकांचा आयुष्यभराचा दिनक्रम!

त्याआधी शालेय वयात डबा आणखी एका रूपात मदतीला आलेला असतो. ते रूप कळण्याइतकी आताची पिढी भाग्यवान नाही. पण आता साधारण चाळिशी-पन्नाशीपुढच्या बऱ्याच जणांना डब्यानं हा आनंद दिला असेल. त्या वेळी आनंदाचं निधान असलेला खेळ म्हणजे ‘डबा ऐसपैस’. ज्यांनी ज्यांनी तो खेळला असेल त्यांना त्यातली डब्याची भूमिका लक्षात येईल. वास्तविक तो खेळ डब्याशी संबंधित. पण त्यातला ऐसपैस हा शब्द का आणि कसा आला हा प्रश्न तेव्हा पडायचा नाही. अर्थात असल्या फालतू प्रश्नांत वेळ घालवण्याचा वेडेपणा सुरू व्हायच्या आधीचा हा काळ. क्रिकेटची बॅट असलेल्यास श्रीमंत मानलं जायच्या त्या काळात ‘डबा ऐसपैस’नं दिलेला खेळाचा आनंद आजही अमीट!

त्या काळात आणखी एक डबा घरोघर दिसायचा. त्याच्यावरचं नाव आणि एकमेकांच्या गळय़ात गळे घातलेल्या दोन नारळाच्या झाडांचं चित्र आजही डोळय़ांसमोर आहे. त्या डब्यावर शब्द असायचे ‘उमदा’ किंवा ‘डालडा’. वनस्पती तूप अशा फसव्या नावानं त्याचं वर्णन केलं जायचं. त्या वेळी कोलेस्टेरॉल वगैरेंचं फॅड नव्हतं. माणसं दणकून डालडय़ात तळलेले पदार्थ खायची आणि तितकीच दणदणीत जगायचीही. आधी हा उमदा डालडा पत्र्याच्या डब्यात यायचा. ते पत्र्याचे डबे पाणी भरून घेऊन ‘प्रभातफेरीला’ जायची पद्धत होती. ‘डबा टाकायला जाणे’ हा शब्दप्रयोग ‘बाहेर पडला’ तो याच कारणानं. घराघरांत डाळी, शेंगदाणे, रवा-पोहे वगैरे जिन्नस याच पत्र्याच्या डालडा डब्यांतून वरच्या फळय़ांवर रांगेत सादर असायचे. नंतर हा डालडा शंकूच्या आकाराच्या पिवळय़ा-हिरव्या प्लास्टिकच्या डब्यातनं यायला लागला. या दोन्ही रूपांतल्या डब्यांतूनच त्या वेळच्या चाळीतल्या किरटय़ा जगण्याला वाढीचे कोंब फुटायचे. अनेक घरांसमोर लटकवलेल्या या डब्यांत तुळशीचं एखादं रोप असायचं. चाळीत कुठलं आलंय तुळशी वृंदावन वगैरे. हेच डालडाच्या डब्यातलं तुळशी वृंदावन. घरासमोरच्या गॅलरीत लटकलेलं. त्याच्या बुडाला भोक पाडून तुळस पाण्यानं कुजून जाऊ नये, अशी व्यवस्था असायची. याच्या जोडीला एखादी व्यक्ती/ सिनेमा/ नाटक ‘डब्यात जाणे’, एखाद्याला ‘डब्यात टाकणे’ किंवा एखादा माणूस म्हणून अगदी ‘डबडा असणे’ अशा अनेक शब्दांच्या रूपात डबा आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान मिळवून आहे.

मोठं झाल्यावर या डब्याच्या जोडीला बाटली येऊन मिळते. थोरल्याच्या कष्टाळू बालपणाच्या पाठीवर जन्माला येणाऱ्या धाकटय़ाच्या वेळी परिस्थिती बरी असावी तसं या बाटलीचं आहे. ती वाढली तीच मुळी काचेच्या आणि प्लास्टिकच्या काळात. डब्यानं पत्र्यांचं आयुष्य बरंच अनुभवलं. बाटलीच्या नशिबात ऐसा खडखडाट सुदैवानं आला नाही. अनेकांच्या आयुष्यात बाटली यायचा आणि घरोघरी फ्रिज घेण्याइतकी परिस्थिती सुधारण्याचा काळ एकच. त्यामुळे अन्य कोणत्याही नाही तरी साध्या पाण्यासाठीच घरोघरी आलेल्या बाटल्या एकदम थंडगार फ्रिजमधेच स्थिरावल्या. कोणी घरी आलं की पाणी विचारताना त्या वेळी ‘‘फ्रिजमधलं चालेल ना?’’ असं विचारलं जायचं. पण पाणी देण्यापेक्षा त्यामागचा खरा उद्देश ‘आमच्याकडे फ्रिज आहे बरं,’ हे सांगण्याचा असे. पाहुणा हो म्हणाला, की मग फ्रिजमधनं ती बाटली काढणं आणि फारच महत्त्वाचा पाहुणा असेल तर घरी बनवलेलं ‘रसना’ गार पाण्यात देणं हा मध्यमवर्गीय घराघरांतला रिवाज होता. सोनेरी रंगाचा लब्धप्रतिष्ठित द्रव पोटात सामावून घेणाऱ्या बाटल्या फारच कमी घरांत असायच्या त्या वेळी.

असो! पण आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहू लागले आणि मध्यमवर्गीय घरांतल्या फ्रिजमधल्या काचेच्या बाटल्यांची जागा प्लास्टिकनं घेतली. घरंदाज, वजनदार, फुटेन-पण- वाकणार- नाही अशा स्वभावाची काच गेली आणि कशाशीही जुळवून घेणारं प्लास्टिक आपल्या आयुष्यात आलं. या लवचीक प्लास्टिकचा विकास झाला. आपलं आयुष्यचं बदललं. सगळं काही प्लास्टिकच. प्रेमसुद्धा! अन्य सगळय़ा बदलांप्रमाणे हा बदलही तसाच. अपरिहार्य असा.

पण या बदलानंतरचा बदल झाला तो प्लास्टिकची एक नवी जात विकसित झाली तेव्हा. हे प्लास्टिक अन्यांसारखं कोरडं नव्हतं. हाताला ते मऊ लागतं. अन्य प्लास्टिक कितीही गोरं असलं तरी कालांतरानं त्याची कांती पिवळी पडते. हे नवं प्लास्टिक मात्र तसं नाही. वर्षांनुवर्ष ते तसंच राहतं. अन्य पारंपरिक प्लास्टिकमधे गरम पदार्थ ठेवता येत नाहीत. या नव्या प्लास्टिकनं तीही सोय करून दिली. अन्य प्लास्टिकच्या डब्यात वा बाटलीत ठेवलेल्या पदार्थाला नंतर एक दर्प येऊ लागतो. नव्या प्लास्टिकनं तो दोषही दूर केला. हे नवं प्लास्टिक आलं आणि बघता बघता झपाटय़ानं त्यानं घरगुती जगात एकदम लाडाचं स्थान मिळवलं. त्यात त्याचा आणखी एक गुण होता. हवाबंद राहण्याचा. त्यामुळे अगदी धान्य-कडधान्य साठवण्यापासून ते कोणाला काही देण्यासाठी वापरण्यापर्यंत या नव्या उच्चवर्गीय प्लास्टिकच्या डबा-बाटल्यांचा वापर व्हायला लागला.

हे असं व्हायला आणि देशात उच्च मध्यमवर्गीय फोफावायला एकच गाठ पडली. मग तर काय या प्लास्टिकचे दिवसच बदलले. या नवश्रीमंत वर्गानं या नव्या प्लास्टिकला इतकं आपलं मानलं की ते प्लास्टिक जनसामान्यांच्या प्लास्टिकपेक्षा वेगळं, वरचं आहे, हे जाणवून देण्यासाठी त्याच्या नावातनं प्लास्टिक हा शब्दच गायब केला.

मग उरलं नुसतं टपरवेअर हे नाव.

घर आणि बाजारपेठ ही दोन्ही ठिकाणं या टपरवेअरनं बघता बघता काबीज केली. गृहिणींच्या मनावर तर अधिराज्य वगैरे म्हणतात ते गाजवायला या टपरवेअरनं सुरुवात केली.

हवाबंद होण्याची क्षमता हा त्याचा सर्वात मोठा गुण. त्यामुळे मुंबईतल्या गर्दीत लोकलमधे लोंबकळत जाणाऱ्या प्रवाशांपासनं ते शेकडो खोल्यांच्या महालात इंग्लडांत राहणाऱ्या राणी एलिझाबेथ यांच्यापर्यंत सगळय़ांसाठीच टपरवेअर हा मोठा आधार ठरला. इंग्लंडची राणी झोपण्याआधी आपली दुसऱ्या दिवशीची आरोग्यदायी न्याहारी टपरवेअरच्या डब्यांत भरून ठेवायची. तिनंच एका मुलाखतीत हे सांगितलं होतं. तर आपलं ‘बाळ’ हे इतकं लोकप्रिय झाल्याचं पाहून अर्ल टपर या हरहुन्नरी उद्योजक-शास्त्रज्ञाला काय अभिमान वाटत असेल!

हे टपर अमेरिकेतले. १९४६ साली त्यांनी हे नवं प्लास्टिक विकसित केलं. त्यांचं उत्पादन म्हणून त्याचं नाव टपरवेअर. त्या वेळी दुसरं महायुद्ध नुकतंच संपलेलं. त्यामुळे अशा काही साठवणीच्या वस्तूंची प्रचंड गरज होती. टपर यांनी या दर्जाच्या प्लास्टिकपासून पहिल्यांदा इंजेक्शनची सििरज बनवली. ती खूप चालली हे लक्षात आल्यावर त्यांनी त्यापासनं इतर डबे-बाटल्या बनवायला सुरुवात केली. या सगळय़ा टपरवेअर्सची हवाबंद झाकणं हे त्यांचं वैशिष्टय़. मर्सिडीजची चांदणी, ऑडीच्या ‘चार बांगडय़ा’ त्याप्रमाणे ही झाकणं हे टपरवेअरचं खास पेटंट!

गेली ७६ वर्ष बंद-उघड होत असलेले हे टपरवेअरचे डबे/ बाटल्या आता लवकरच कायमच्या बंद होतील. आर्थिक आव्हानं हे कारण. घराघरातल्या गृहिणींना हे ऐकून मोठाच आधार गेल्यासारखं वाटेल. टपरवेअरचं हे टपोरं अस्तित्व आता नाहीसं होईल..!

girish.kuber@expressindia.com      

@girishkuber