भारतात गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या संविधान व लोकशाहीविरोधी सरकारला उलथून टाकण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या काँग्रेसला ‘ओव्हरसीज’साठी तातडीने नवा अध्यक्ष नियुक्त करायचा आहे. पक्षाचे लोकप्रिय नेते राहुलजी यांचे परदेश दौरे कुठल्याही वादाविना पार पडावेत यासाठी पक्ष नवीन व्यक्तीच्या शोधात असून यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीला खालील गोष्टींचे कटाक्षाने पालन करावे लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) नवा अध्यक्ष आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जाणकार असावाच, पण त्याची विचार करण्याची व व्यक्त होण्याची पद्धत भारतीय असायला हवी. भारतीय राजकारणात विरोधी पडसाद उमटतील असे कोणतेही भाष्य त्याने करू नये. विशेषत: निवडणुका असताना बोलण्याची उबळ येऊ देऊ नये.

२) नव्या अध्यक्षाला परदेशी असताना सॅम पित्रोदा तर भारतात आल्यावर मणिशंकर अय्यरांना कधीही भेटणार नाही किंवा फोनवरून संवाद साधणार नाही असे हमीपत्र लिहून द्यावे लागेल.

३) राहुलजी परदेशात असताना त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या भाषणाचा मसुदा तयार केल्यावर तो पक्षाच्या कार्यसमितीकडून मंजूर करवून घेण्याची जबाबदारी केवळ आणि केवळ ओव्हरसीज अध्यक्षाची असेल.

४) परदेशांतील भाषण तयार करताना आरक्षण, जम्मू काश्मीर, पाकिस्तान, अल्पसंख्याक हे विषय भारतात संवेदनशील म्हणून ओळखले जातात याचे भान ठेवावे लागेल.

५) राहुलजी परदेशात असताना सॅम त्यांना भेटणार वा संपर्क साधणार नाहीत, याची डोळयात तेल घालून काळजी घ्यावी लागेल. यासाठी खासगी गुप्तचरांची मदत घेतली तरी चालेल.

हेही वाचा : संविधानभान : विधानमंडळाचे अधिकारी

६) भारतात धर्म, जात, वर्ण, रंगाच्या बाबतीतील विविधतेवर कुठलेही भाष्य करता येणार नाही. परदेशातील खुलेपणा भारतात नाही याचे भान सतत ठेवावे लागेल.

७) राहुलजींना परदेशात भेटू इच्छिणाऱ्या अभ्यागतांची यादी आधी कार्यसमितीकडून मंजूर करवून घ्यावी लागेल. त्याशिवाय भेटीच्या वेळा निश्चित करता येणार नाहीत.

८) परदेशात राहुलजी जे काही बोलतील त्याची सर्वस्वी जबाबदारी अध्यक्षाची असेल. सॅमसारखे ‘मी हे सांगितलेच नव्हते’ असे म्हणून हात झटकता येणार नाहीत.

९) परदेशात काम करताना अध्यक्षाला व्यक्तिगत पातळीवरसुद्धा सॅमशी संबंध ठेवता येणार नाही. तसे आढळल्यास तात्काळ पदावरून काढले जाईल व सॅमप्रमाणे पुन्हा घेतले जाईलच अशी अपेक्षा ठेवता येणार नाही.

१०) अलीकडे प्रत्येक परदेश दौऱ्यात राहुल यांची प्रतिमा खराब होते आहे, हे ध्यानात घेऊन त्यांच्या प्रतिमासंवर्धनासाठी काय काय करावे लागेल याची कार्ययोजना पदभार सांभाळल्यावर दहा दिवसांच्या आत कार्यसमितीला सादर करावी लागेल.

११) ‘ओव्हरसीज’मध्ये पक्षाविषयी सहानुभूती कशी निर्माण होईल व समर्थकांची संख्या कशी वाढेल यासाठी प्रयत्न करावे लागतील.

१२) कार्यसमितीने मंजूर केलेल्या भाषण मसुद्याला राहुलजींनी हरकत घेतली तर ते लगेच मुख्यालयाला कळवण्याची जबाबदारी अध्यक्षांची असेल.

या अटी मान्य असणाऱ्यांनी त्यांचे अर्ज तातडीने पाठवावेत.

पक्ष मुख्यालय, नवी दिल्ली

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulta chashma appointment of congress president for overseas css