अल्पावधीत तीनशे कोटींचा टप्पा पार केल्याने ‘छावा’च्या वितरणाचे हक्क घेणाऱ्या कंपनीतील वातावरण अतिशय आनंदी होते. आता लवकरात लवकर हजार कोटींचा गल्ला जमा करून त्या दाक्षिणात्य निर्मात्यांना दाखवून द्यायचेच असे बेत आखले जात असतानाच तिकीटबारीवर लक्ष ठेवून असलेला एक सहायक धावतच कंपनी प्रमुखांच्या कक्षात शिरला व सोबतच्या फाईलमधील काही बातम्यांची कात्रणे त्यांच्यासमोर ठेवली. चित्रपट बघून उत्साहित झालेले काही लोक बुऱ्हाणपूरच्या असीरगड किल्ला परिसरात जाऊन मुघलकालीन खजिना मिळावा म्हणून खोदकाम करताहेत असे त्यात नमूद होते. हे वाचून प्रमुखांना काहीही अर्थबोध होईना. म्हणून त्यांनी आश्चर्याने त्या सहायकाकडे बघितले. याच क्षणाची वाट बघत असलेला तो मग भडाभडा बोलू लागला.
‘चित्रपटातील पहिल्याच दृश्यात महाराज या किल्ल्यावर स्वारी करून तो लुटतात. त्यामुळे मुघल संतापतो व जोवर बदला घेणार नाही तोवर ‘ताज’ डोक्यावर चढवणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. चित्रपटामुळे प्रेरित झालेल्या भोळ्याभाबड्या प्रेक्षकांना असे वाटले की लुटीदरम्यान काही खजिना तिथे नक्कीच राहिला असेल. तो शोधण्यासाठी ते तिथे जाताहेत. या घटनेचा आपण चित्रपट अधिक चालावा म्हणून फायदा करून घेऊ शकतो’ हे ऐकताच प्रमुखांचे कान टवकारले. मग उत्सुकतेने ते म्हणाले ‘पुढे बोल.’ तसा तो म्हणाला. ‘आपण तसेही कोटींची कमाई केली आहेच. त्यातला काही वाटा ही अफवा देशभर पसरवण्यासाठी खर्च करायचा. सुमारे पन्नासेक कोटींची सोन्याची मुघलकालीन नाणी तयार करायची व ती त्या परिसरात गाडून ठेवायची. खजिन्याचा शोध घेणाऱ्यांना ती मिळू लागतील तशी ही अफवा नाही तर सत्य याचा प्रसार होत जाईल. तसेही सध्या अफवांना वास्तव समजण्याचे दिवस आले आहेतच. त्याचा फायदा चित्रपटाला होईल व तो आणखी धो धो चालेल. आपला प्रसिद्धी विभाग याच्या बातम्या बरोबर पेरेल.’ हे ऐकून प्रमुखांनी इतर काही वरिष्ठांना बोलावले. चित्रपट स्वकीयांचे गोडवे गाणारा. तो अधिक चालावा म्हणून मुघलांच्या नाण्यांचा वापर करणे नैतिक की अनैतिक यावर बैठकीत चर्चा सुरू झाली. व्यवसाय करताना असे काही पाळायचे नसतेच. खुळ्या प्रेक्षकांचा व आपला फायदा तेवढा बघणे केव्हाही योग्य यावर साऱ्यांचे एकमत झाल्यावर या योजनेला मंजुरी देण्यात आली.
आठच दिवसांत बुऱ्हाणपूरला सोन्याची नाणी मोठ्या संख्येत सापडू लागलीत अशा बातम्यांचा पूर आला. त्यात चित्रपटाचा संदर्भ देण्यात आल्याने प्रेक्षकही चित्रपटगृहाकडे धाव घेऊ लागले. तिकडे बुऱ्हाणपुरात तर जत्राच भरली. लोक दूरदुरून वाहने भाड्याने घेत रात्री जाऊन खोदकाम करू लागले. मातीतून नाणी विलग व्हावीत म्हणून आवश्यक असलेल्या चाळण्यांची मागणी कमालीची वाढली. असीरगड किल्ल्यात मुघलांची टांकसाळ होती. तिथे आधीही नाणी सापडत. त्याचा व चित्रपटाचा काही संबंध नाही. आताही ज्यांना नाणी मिळाली ती सरकारजमा होतील, असे निवेदन प्रशासनाने प्रसिद्ध केले पण अफवांच्या बाजारात ते झाकोळले गेले. काही देशप्रेमींनी लोक मुघलांचाच खजिना लुटत आहेत तेव्हा करू द्या त्यांना जे करायचे ते, अशी भूमिका घेतली. तिकडे बुऱ्हाणपुरात गर्दीमुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाल्यावर सरकारने हस्तक्षेप केला. मग चित्रपटाच्या सुरुवातीला एक ओळ टाकण्यात आली. ‘लुटला गेलेला खजिना तिथेच गाडला गेला की नाही याविषयी हा चित्रपट कोणतेही ठोस भाष्य करत नाही.’ तोवर चित्रपटाने हजार कोटींचा टप्पा पार केला होता.