सौम्य स्वरूपाच्या धुक्यातून थोडेफार परावर्तित होत असलेले कोवळे ऊन खात राजनाथजी बंगल्याच्या हिरवळीवर वृत्तपत्रांचे वाचन करत बसले होते. कालच्या इंदोर दौऱ्याला सर्वच राष्ट्रीय माध्यमांनी भरपूर प्रसिद्धी दिलेली बघून ते सुखावले. शेजारी निवडता येत नाहीत असे अटलजींनी भलेही आधी म्हटलेले असो, चांगले शेजारी मिळायला नशीब लागते हेच खरे. म्हणूनच शेजारी राष्ट्र व सीमासुरक्षेच्या बाबतीत आपला देश कमनशिबी हाच युक्तिवाद खरा! तो बोलून दाखवल्याने आता परिवारात आपसूकच आपली पत वाढेल या विचारासरशी त्यांचा चेहरा खुलला. तेवढ्यात मुख्य प्रवेशद्वारातून साधू, ज्योतिषांचा एक जथा आत येताना दिसला व तसे ते सरसावून बसले.
सर्वांना साष्टांग दंडवत घालून झाल्यावर त्यातला एक ज्येष्ठ जटाधारी म्हणाला, ‘‘महोदय, आज सकाळी तुमचे वक्तव्य वाचले. तुम्ही महत्त्वाचा मुद्दा ऐरणीवर आणला तो म्हणजे देशाच्या नशिबाचा. नेमके याच शब्दापासून आमचे काम सुरू होते. ते तुमच्या मदतीशिवाय शक्य नाही.’’ हे ऐकताच ते म्हणाले, ‘‘जी फर्माईये.’’ मग दुसरा ज्येष्ठ म्हणाला, ‘‘आपल्या जेवढ्या सीमा आहेत त्या सर्व ठिकाणी जाऊन आम्हाला शांतिपूजा करायची आहे. सीमारेषेच्या परिसरातील चार दिशा व तेवढ्याच उपदिशांची ग्रहदशा बघून ही ठिकाणे आम्ही निश्चित करू. त्यासाठी होणाऱ्या होमहवनात तुम्हाला सामील करून घेऊ. यामुळे आपले नशीब अनुकूल होईल तर शेजाऱ्यांचे प्रतिकूल. कुरापतखोरी कमी होईल व आपल्याही गस्तीचा भार हलका होईल. शस्त्रांवर अवाढव्य खर्च करण्यापेक्षा यावर थोडाफार खर्च केला तरी नशिबाचा गुंता निकालात निघेल.’’
हेही वाचा : लालकिल्ला : भाजपने गमावलेल्या संधीचे ‘स्मारक’!
हे ऐकूण राजनाथजी विचारात पडले. तेवढ्यात नाशिकहून आलेला एक गट म्हणाला, ‘‘आपले शेजारी अतृप्त आत्मेच. अशांची ढवळाढवळ नशिबाला प्रतिकूल करते. यावर उपाय एकच. नारायण नागबळी पूजा. ही आत्म्यांच्या शांतीसाठी केली जाते. सीमेवर आम्ही ती करू. फक्त सैन्य दलाने आमच्या येण्याजाण्याची व्यवस्था करावी. मग बघा कसे नशीब पालटते ते.’’ मग नागा साधूंचा गट पुढे आला. ‘‘देशात आमची संख्या भरपूर आहे. कुंभमेळा नसला की आम्हाला तसेही काम नसते. या काळात आम्ही सीमेवर जाऊन आमच्या वेशात गस्त घालू. नशीब सुधारण्याचे मंत्र म्हणू. आम्हाला बघूनच पलीकडचे सैन्य गारद होईल. यामुळे आपसूकच नशिबात सुधारणा होईल.’’ हे ऐकून त्यांना हसू आले, पण त्यांनी स्वत:ला आवरले. तेवढ्यात सर्वात मागे उभा असलेला ज्योतिषांचा गट साधूंना बाजूला सारत समोर आला. ‘‘नशीब चांगले करण्यासाठी आमच्याकडे जालीम मंत्रविद्या आहे. सीमेवर अनुकूल ग्रहदशा असलेल्या ठिकाणी एक वर्तुळ आखू. त्यात फक्त एकदा तुम्ही उभे राहायचे. विद्योने भारलेल्या या वर्तुळातून सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या लहरी तयार होतील व त्या रेषेपलीकडे जात शेजाऱ्यांना दुबळ्या करतील. कर्तापुरुष म्हणून तुमची प्रारंभिक उपस्थिती अनिवार्य असेल.’’ शेवटी एका नामांकित आखाड्याचे साधू समोर येत म्हणाले, ‘‘सीमेवर जिथे कुंपण असेल तिथे आम्ही भारलेले लिंबू-मिरची बांधू व जिथे नसेल तिथे जमिनीत गाडू. यामुळे गस्तीची गरज राहणार नाही. एवढी सीमा मजबूत होईल व शेजारी लिंबाप्रमाणे वाळत जातील.’’ हे ऐकताना राफेलची आठवण झाल्याने राजनाथजी प्रसन्न झाले व त्यांनी सैन्य मुख्यालयात फोन करून, हे साधू म्हणतील ते करा, असा आदेश दिला. तो ऐकताच तिन्ही कमांडर्सनी कपाळावर हात मारून घेतला.