सेम टू सेम प्रोव्हायडर्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे येथे जमलेल्या सर्व उमेदवारांचे स्वागत. अगदी अल्प सूचनेवर तुम्ही सर्वजण लोणावळ्याच्या या निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये आलात व फक्त २४ तासांसाठी आयोजित या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालात याबद्दल तुमचे आधीच आभार मानतो. एकाच नावाच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांवरून निवडणुकीत होणारा गोंधळ व बसणारा फटका हा तसा राज्यासाठी जुनाच विषय. मात्र अलीकडे निवडणूक प्रक्रियेचे वेगाने व्यवसायीकरण होत असल्याचे बघून आम्ही उमेदवार पुरवणारी ही कंपनी सुरू केली. तिला लोकसभेत चांगले यश मिळाले. दिंडोरीत शरद पवारांच्या भास्कर भगरेंविरुद्ध आम्ही बापू भगरेंना उभे केले. त्यांना घरी बसून सव्वा लाख मते मिळाली. दुर्दैवाने भगरे पराभूत झाले नाहीत, पण यामुळे कंपनीचा बोलबाला झाला. या वेळी नामसदृश उमेदवारांची मोठी मागणी येईल हे गृहीत धरून आम्ही राज्यभरातील नेत्यांच्या नावांशी साधर्म्य सांगणारे सुमारे ६०० लोक शोधून ठेवले. त्यातल्या ज्यांना रिंगणात उतरण्याची संधी मिळाली ते सर्व येथे हजर आहेत. (प्रचंड टाळ्या). तुम्हा सर्वांना कंपनीचा ३० टक्के वाटा वगळून भरपूर पैसे मिळतील हे आताच स्पष्ट करतो. तुम्हाला थोडे वाईट वाटेल, पण स्पष्ट बोलणे केव्हाही चांगले. ते असे की तुम्हाला ज्यांनी भाड्याने घेतले तेच तुमच्या प्रचाराचा खर्च करतील. त्यांनी घरी बसून राहा म्हटले तर तसेच करायचे. प्रचार करा म्हटले तर करायचा. अर्थात या सर्व सूचना आमच्यामार्फत येतील. तुम्ही सर्वजण रिंगणात असले तरी निवडून येऊ अशी अपेक्षा बाळगू नका. तुम्ही तुमच्याच नावाच्या प्रमुख उमेदवाराला पाडण्यासाठी उभे आहात व तेच तुमचे उद्दिष्ट हे पक्के ध्यानात ठेवा. ही निवडणूक संपली की आपण वाऱ्यावर अशी भावना मनात येऊ देऊ नका. जोवर तुमच्या नावाचा नेता राजकारणात सक्रिय आहे तोवर प्रत्येक निवडणुकीत तुमचा वापर आम्ही करू. तुमच्यासोबत कंपनीने केलेल्या करारातील कलम १३ मध्ये तसे स्पष्ट नमूद आहे. तुमच्या उमेदवारीमुळे समोरचा चिडू शकतो, हल्ला करू शकतो, आमिष दाखवू शकतो. अशा वेळी अविचल राहायचे. काही बाका प्रसंग उद्भवलाच तर तुम्हाला भाड्याने घेणारा सर्व सांभाळून घेईल. कंपनीतर्फे तुमचा आरोग्य व अपघात विमा उतरवलेला आहे. त्यातून तुमची सर्व काळजी घेतली जाईल. तुमच्याच नावाचा प्रतिस्पर्धी सर, पाटील, दादा असे विशेषण नावाच्या मागे वापरत असेल तर तुम्हीही तेच वापरायला सुरुवात करा. दिंडोरीचे भगरे ‘सर’ लावायचे. आम्ही आमचा उमेदवार तिसरी उत्तीर्ण असूनसुद्धा ‘सर’ नावामागे लावले. हे उदाहरण कायम लक्षात ठेवा. चिन्हे निवडताना प्रतिस्पर्ध्याच्या चिन्हाशी साधर्म्य सांगणारे निवडले तर उत्तम. उदाहरणार्थ तुतारी, पिपाणी. प्रचाराच्या काळात दौरे करताना संभ्रम निर्माण करता येईल असे वागा. म्हणजे प्रतिस्पर्ध्यासारखे बोलणे, वागणे. याने मतदार विचलित होईल. सध्या कंपनीला कोकण व उत्तर महाराष्ट्रातून कामे मिळत आहेत. पुढील निवडणुकीपर्यंत राज्यभर विस्तार करण्याचा आमचा मानस आहे. आता शेवटी तुम्हाला ‘वन टू थ्री’ हा एकाच नावाचे तीन नायक असलेला चित्रपट दाखवत आहोत. तो बघा व त्यातून काही शिका, धन्यवाद’ कंपनीच्या एमडीचे भाषण संपताच सर्व उमेदवार उभे राहिले व त्यांनी ‘योग्य’ नाव ठेवल्याबद्दल आईवडिलांचे आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा