‘हॅलो, मी आंतरवली सराटीतून पाटील बोलतो, मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे. त्यांना जोडून द्या’ हे ऐकून पलीकडे क्षणभर शांतता पसरली. उपोषण सुटल्यावर ४० दिवस काहीच न घडल्याने संतापलेले पाटील चढय़ा आवाजात बोलू लागले तसे पलीकडून आवाज आला. ‘कोण पाटील? कुठून बोलता, काय काम आहे. साहेब बैठकीत आहेत’ हे ऐकताच पाटील वैतागले. ‘अहो, मीच तो ज्याचे उपोषण स्वत: साहेबांनी सोडवले. दिल्लीपर्यंत तुमचे नाव गेले असेही तेव्हा सांगितले.’ पलीकडून शांत स्वर आला. ‘तुम्ही ठाण्यात राहता का, तसे असेल तर शाखाप्रमुखाचे पत्र घेऊन या. साहेब नक्की भेटतील.’ त्यावर कळवळून ते म्हणाले, ‘अहो, मी जालनावाला पाटील. ते आरक्षण उपोषण गाजले नव्हते का? तोच तो.’ तरीही समोरच्यावर काही परिणाम झाला नाही. ‘अहो, राज्यात रोज शेकडो लोक उपोषणाला बसत असतात. प्रत्येकाला साहेबांशी बोलायचे असते. ते कसे शक्य आहे. साऱ्यांना भेटत बसले तर राज्य कसे चालणार.’ हे ऐकून संतापलेल्या पाटीलांनी फोन कट केला. चुकलेच आपले. दिल्लीतील रामलीला मैदानावरच बसायला हवे होते. थेट विश्वगुरूंनी दखल घेतली असती. मग राज्यातले हे सारेच धावले असते. त्या १७ दिवसांत सर्व हात जोडायचे. उपोषण संपल्याबरोबर तोंड फिरवायला लागले.
किमान त्या दोन राजांना तरी फोन लावून बघू म्हणत त्यांनी आधी कोल्हापूरचा नंबर फिरवला तर तिकडून उत्तर आले ‘साहेब आरक्षण हक्क समितीत भाषण द्यायला गेलेत.’ मग त्यांनी साताऱ्यात फोन केला तर पुन्हा कोण पाटील अशी विचारणा झाली. ओळख दिल्यावर ‘सरकारकडून शिकार झालेले तुम्हीच का’ असे खवचट वाक्य ऐकवून फोन बंद झाला. समाजाच्या जवळ असलेल्या राष्ट्रवादी विचाराच्या पक्षातील साहेबांना तरी फोन करू असे ठरवत त्यांनी बारामतीशी संपर्क साधला. मोठय़ा मिनतवारीनंतर एक साहाय्यक फोनवर आला. ‘तुमचे उपोषण हा भूतकाळ झाला. साहेब भविष्यकालीन योजना आखण्यात व्यस्त आहेत. तुम्ही आता शांत बसा, साहेब प्रश्न कसा सोडवायचा ते बघून घेतील’ हे ऐकून पाटलांच्या मनात निराशा दाटून आली. तेव्हा आपल्याला भरपूर प्रसिद्धी देणाऱ्या चॅनलवाल्यांशी तरी बोलू म्हणत त्यांनी एकेक क्रमांक फिरवायला सुरुवात केली पण प्रत्येकाकडून ‘अहो, ती बातमी केव्हाच मागे पडली. आता ट्रेडिंगवर दुसरेच विषय सुरू आहेत. तुम्ही फोन करून वेळ खाऊ नका’ अशी उत्तरे मिळाली. आता काय करावे हे त्यांना सुचेना. तशाच अवस्थेत ते बाहेर पडले. गावात भेटणारा प्रत्येकजण ‘काय अण्णा, आरक्षणाचे कुठवर आले’ असा प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडू लागला. एकाने तर ‘तुम्ही घराचा त्याग करून एक शबनम घेऊन मंदिरात ठिय्या मांडा त्या अण्णासारखे. सरकार थोडे तरी लक्ष देईल’ असा अनाहूत सल्लाही दिला. तो ऐकताच ते चमकले. त्यांनी लगेच एक अर्ज तयार केला. त्यात पुन्हा उपोषणाचा इशारा होता. तो घेऊन ते पोलिसांकडे गेले तेव्हा त्यांना समजले की प्रशासनाने गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणे आंदोलनासाठी प्रतिबंधित केलेली. घरीच उपोषण केले तर कुणी लक्ष देणार नाही हे जाणवताच ते हताश झाले. आपल्या मागणीचे आता कुणालाच काही पडलेले नाही. सारे आरक्षण देतो म्हणतात पण कसे ते सांगतच नाहीत. तरीही तेव्हा आपल्याला एवढी प्रसिद्धी का मिळाली असेल हा प्रश्न व त्यामागोमाग उत्तर सुचताच ते चमकले. मग लगेच त्यांनी लाठीमार करणाऱ्या पोलिसांना धन्यवादाचे पत्र लिहायला सुरुवात केली.