भारतीय परंपरेत सून या संकल्पनेला महत्त्वाचे स्थान आहे. कुटुंबात स्त्रीचा माता म्हणून गौरव होत असला तरी ती सून म्हणून जास्त ओळखली जाते. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन बनारसच्या आमच्या विद्यापीठाने ‘स्किल इंडिया’ अंतर्गत आदर्श सून तयार करणारा एक प्रमाणपत्रीय अभ्यासक्रम सुरू केला आहे. यात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ‘उच्चशिक्षित’ तरुणींना कळावे यासाठी त्याचे स्वरूप खाली देत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा असेल व त्यात प्रात्यक्षिकासाठी ८०, तर लेखी परीक्षेसाठी २० गुणांची प्रश्नपत्रिका असेल. याचे स्वरूप गृहविज्ञानासारखे नसेल हे लक्षात घ्यावे.

* या कालावधीत प्रत्येक विद्यार्थिनीला रोज रात्री शिक्षकांनी निर्देशित केलेल्या छोटया पडद्यावरील सासू-सुनेच्या मालिका बघाव्या लागतील व दुसऱ्या दिवशी सकाळी यावरची प्रश्नावली सोडवावी लागेल.

* चवदार स्वयंपाक कसा करावा तसेच सांडगे, पापड, लोणचे, शेवया, कुरमुरे कसे तयार करायचे याचे शिक्षण शास्त्रीय पद्धतीने घेतल्यावर प्रात्यक्षिक करून दाखवावे लागेल.

हेही वाचा >>> चिंतनधारा : मृत्यूचे दु:ख अज्ञानमूलक

* प्रतिवाद न करता सासूरवास कसा सहन करावा याच्या टिप्स रोज दिल्या जातील.

* भारतीय पेहरावात स्वस्थ (कंफर्टेबल) कसे राहायचे याचे शिक्षण दिले जाईल.

* सासू खाष्ट असली व नवरा दुष्ट असला तरी त्यांच्या कल्याणासाठी कोणती व्रत-वैकल्ये ‘मनोभावे’ करावी हे सविस्तरपणे सांगितले जाईल व प्रात्यक्षिक करून घेतले जाईल.

* कुटुंबातील रीतीरिवाजानुसार उपवास करावेच लागतील. त्या दिवशी स्वास्थ्य उत्तम कसे ठेवायचे हे अभ्यासकाळात सांगितले जाईल.

* नवऱ्यासोबत स्वतंत्र राहण्याचा विचार कसा त्यागायचा याचे धडे या काळात दिले जातील. वेगळी चूल मांडू असे नवऱ्याने म्हटले तर त्याला प्रतिवाद कसा करायचा हेही शिकवले जाईल.

* भारतीय कुटुंबव्यवस्थेचे वैभव टिकवण्यात स्त्रियांच्या अश्रुपाताचा वाटा मोठा आहे. रडण्यात कमीपणा न मानता ज्येष्ठांच्या रागावण्यावर ‘मुळुमुळु’ कसे रडायचे याचे कौशल्य शिकवले जाईल. प्रात्यक्षिकात ‘हुकमी’ रडणाऱ्या विद्यार्थिनीला दहा गुण अतिरिक्त दिले जातील.

* कुटुंबातील ज्येष्ठांनी एखादे न पटणारे काम सांगितले तर थेट नकार न देता योग्य कसे नाही हे नंतर सर्वांना पटवून देण्याची कला विद्यार्थिनीमध्ये विकसित करून दिली जाईल.

* राग हा आदर्श सुनेचा क्रमांक एकचा शत्रू आहे. त्यामुळे तो आला तरी आतल्या आत त्याला शमवायचे कसे याची शास्त्रीय पद्धत या कालावधीत शिकवली जाईल.

* घरची परिस्थिती बिघडली तर संस्काराला धक्का न लागू देता अर्थार्जन कसे करायचे या विषयावर मान्यवरांकडून मार्गदर्शन आयोजित केले जाईल.

* कुटुंबातील सर्वांच्या आधी उठून तुळशीला पाणी घातल्याने होणारे वैज्ञानिक फायदे सविस्तरपणे सांगितले जातील. * हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्यांसाठी कँपसमध्ये ‘प्लेसमेंट’ची सोय उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे ‘आदर्श सून’ होण्याचा तुमचा मार्ग सुकर होईल.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulta chashma banaras university offer a course on adarsh bahu zws
Show comments