प्रिय सुधीरभाऊ, तुमच्या वाघनखांसाठीच्या लंडनवारीने राज्यातील अस्मितावादी लोकांप्रमाणे आम्हालाही तेवढाच आनंद झाला आहे. गेली अनेक वर्षे डरकाळय़ांतून आम्ही या मागणीकडे लक्ष वेधत होतो पण कुणीही ते गांभीर्याने घेतले नाही. राज्याच्या गादीवर बॅरिस्टर अंतुले असताना त्यांनी भवानी तलवार परत आणू अशी घोषणा केली तेव्हा आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र ही घोषणा हवेत विरल्याने वाघनखाचा मुद्दा समोर आलाच नाही. तेव्हा आमची संख्या खूपच कमी असल्याने आमचा आवाज दुर्लक्षित राहिला. अलीकडच्या काळात तुमच्या प्रयत्नांमुळे आमची संख्या वाढली. त्यातच आता वने व सांस्कृतिक अशा दोन्ही खात्यांचा मेळ तुमच्या रूपात जुळून आल्याने आमच्या मागणीचा मार्ग मोकळा झाला असे आम्ही समजतो. वाघनखांनी ३५० वर्षांपूर्वी हिंदूवी स्वराज्याचे रक्षण करण्यात मोलाची कामगिरी बजावली.. तुम्ही परत आणणार असलेल्या या ठेव्यामुळे केवळ त्या स्वराज्याचा नाही तर आमच्या जमातीचा गौरवशाली इतिहाससुद्धा जिवंत होईल यात शंका नाही. आता काही कथित इतिहाससंशोधक व राजकारणी ती ही नखे नाहीतच असा दावा करून खोडसाळपणा करत आहेत पण भाऊ, तुम्ही याकडे अजिबात लक्ष देऊ नका. ही नखे लोखंडी असली तरी ती आमच्याच पूर्वजांसारखी आहेत हे सिद्ध करण्यासाठी आम्ही आमच्या नखांचा डीएनए द्यायला तयार आहोत. त्याउपरही कुणी शंकाखोर शिल्लक राहिलाच तर आम्ही आमच्या एका गुहेत अजूनही जतन करून ठेवलेली वंशावळीची चोपडी तुम्हाला उपलब्ध करून देऊ. त्यात जमातीच्या पाचशे वर्षांच्या इतिहासाच्या सविस्तर नोंदी आहेत. त्यावरून तुम्हाला तातडीने निष्कर्ष काढता येईल. या पवित्र कार्याला विरोध करणाऱ्या राजकारण्यांविषयी काय बोलावे? या विरोधकांपैकी काही तर आमची छायाचित्रे काढतात. सत्ता मिळाली तेव्हा नखे कुरतडण्याशिवाय यांनी काहीही केले नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना आता स्पष्ट शब्दात ‘नखांचा नाद’ करायचा नाही असे येताक्षणी बजावून ठेवा.
ब्रिटिशांनी हा देश लुटला. त्यांच्या लुटीची चर्चा आजवर होत आली पण वाघनखाचा मुद्दा दुर्लक्षित राहिला. तो तुम्ही अचूकपणे हेरला याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आमची जमात कधीही गुलामगिरी सहन करणारी नव्हती व नाही. आम्ही कायम राजे म्हणूनच वावरतो. अन्याय तर सहन करणे आमच्या स्वभावात नाही. तरीही कुणा ग्रँट डफ नावाच्या इसमाने भेट म्हणून मिळालेली नखे प्रसिद्धीचे तुणतुणे न वाजवता गुपचूप लंडनच्या संग्रहालयात नेऊन ठेवली. ही कृती केवळ अन्यायच नाही तर आमच्या सार्वभौमत्वावर जबर आघात करणारी होती. ही ऐतिहासिक चूक दुरुस्त करण्याच्या तुमच्या प्रयत्नाला राज्यातील सर्वानी साथ द्यायला हवी असे आमचे मत झाले आहे. महागाई, बेरोजगारी हे नेहमीचे मुद्दे विरोधकांना आमच्या नखांच्या वेळीच का आठवावे? त्यामुळे तुम्ही या विरोधाने जराही विचलित न होता हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य तडीस न्यावे. कामगिरी फत्ते करून तुम्ही परत आलात की आम्ही खास आमच्या पद्धतीने ‘आनंदाची डरकाळी’ फोडून तुमचे स्वागत करू व आमच्याही अस्मितेची दखल घेत गुलामगिरीची मानसिकता पुसल्याबद्दल तुमच्या कायम ऋणात राहू!