सकाळचे सहा वाजलेले. आडवळणावर असलेल्या आंतरवली सराटीचे शिवार राज्यभरातून आलेल्या इच्छुकांच्या गर्दीने फुलून गेलेले. तेवढ्यात ध्वनिक्षेपकावरून घोषणा झाली. ‘सर्वांना सूचित करण्यात येते की, आपल्या सर्वांचे भाग्यविधाते जरांगे पाटील बरोब्बर दहाच्या ठोक्याला मुलाखतीला सुरुवात करतील. उपोषण असो वा आंदोलन. प्रत्येक कृती न थकता सलग करायची व विश्वविक्रमाकडे वाटचाल करायची हेच आम्हा सर्वांचे धोरण राहिले आहे. त्यामुळे २४ तासांत ८०० इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार प्रत्येकाला एक मिनिट आठ सेकंदांचा वेळ त्याचे म्हणणे मांडण्यासाठी मिळेल. म्हणून वायफळ न बोलता मुद्द्याचे बोलून पुढे सरकावे ही विनंती.’ हे ऐकताच किमान अर्धा तास तरी बाजू मांडण्यासाठी मिळेल या आशेने आलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. मग प्रत्येकजण एका मिनिटात काय बोलायचे याची जुळवाजुळव मनात करू लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काहींनी श्वास न घेता फाडफाड बोलले तर १०० ते १२५ शब्द बोलता येतील हे गृहीत धरून तिथेच तालीम सुरू केली. फारच कमी वेळ दिला म्हणून काहींनी आयोजकांशी वादही घातला. राष्ट्रीय पक्षसुद्धा यापेक्षा जास्त वेळ मुलाखतीला देतात असा त्यांचा युक्तिवाद होता. यावर आयोजकांनी ‘पाटलांचा आदेश शिरसावंद्या’ असे नेहमीचे उत्तर दिले. यापेक्षा देवदर्शनालासुद्धा अधिक वेळ मिळतो अशी कुजबुज काहींनी केली पण उघडपणे बोलण्याचे धाडस कुणी दाखवले नाही. ठरल्याप्रमाणे मुलाखतींना सुरुवात झाली. पहिला इच्छुक आत गेला व अर्ध्याच मिनिटात बाहेर आला तसे सारे त्याच्याभोवती गोळा झाले. त्यावर तो म्हणाला ‘उमेदवारी मिळाली तर मी सहज निवडून येतो एवढेच बोललो तर त्यांनी मला बाहेर जायला सांगितले’ हे ऐकून सारेच चिंतेत पडले. असे का घडले असेल यावर डोके खाजवू लागले. तेवढ्यात आयोजकांपैकी एक त्यातल्या काहींच्या कानात कुजबुजला. ‘जिंकून येतो असे म्हणूच नका. महायुतीच्या उमेदवाराला पाडतो म्हणा’ हे ऐकताच उपस्थितांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मग पाडायचे कसे याच्या उत्तराची जुळवाजुळव करत एकेक आत जायला लागले.

हेही वाचा : लालकिल्ला: काँग्रेसचा ‘हरियाणा’ की, ‘मध्य प्रदेश’?

काही काळ शांततेत गेल्यावर एक दहा सेकंदांच्या आतच बाहेर आला तोही रडत. ‘आरक्षण मिळावे म्हणून मी आजवर ९० वेळा उपोषण केले असे सांगताच मला खुणेनेच जा असे सांगण्यात आले.’ हे ऐकून जमलेले सर्व त्याच्यावर चिडले. ‘अरे, उपोषणांचा विक्रम पाटलांच्या नावावर. तो तू मोडला असे सांगायची गरज काय?’ काही काळानंतर आणखी एक अतिशय आनंदात बाहेर आला. ‘तुमच्या प्रत्येक रॅलीत फुले उधळण्यासाठी मी दहा जेसीबी भाड्याने लावले होते असे सांगताच फॉर्म भरा असा आदेशच त्यांनी दिला.’ हे ऐकून ऐपत असूनही याकडे दुर्लक्ष केले म्हणून काही जण हळहळले. नंतर एक इच्छुक डोळे पुसतच बाहेर आला. ‘समाजातील सर्वांनी मते दिली तर विरोधातील शिंदेसेनेचा उमेदवार पडू शकतो असे म्हणताच त्यांनी ‘पुढचा’ म्हणत मला बाहेर काढले. यावरून पाटलांचा इशारा नेमका काय याची जाणीव इतरांना झाली. तेवढ्यात ध्वनिक्षेपकावरून पुन्हा घोषणा झाली. ‘काही राजकीय नेते पाटलांच्या भेटीसाठी आल्याने एक तासासाठी मुलाखती थांबवण्यात येत आहेत. ही वेळ भरून काढण्यासाठी नव्या सत्रात इच्छुकांच्या वेळेत २८ सेकंदांची कपात करण्यात आली आहे.’

हे ऐकताच उर्वरित इच्छुक आता ४० सेकंदांत काय काय बोलायचे यावर विचार करू लागले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulta chashma manoj jarange patil interview of candidates for vidhan sabha election 2024 24 hours 800 css