अहो साहेब, लई मान आहे तुमच्याविषयी आमच्या मनात. राज्यातल्या तमाम बहिणींचा ह्यो एकच लाडका भाऊ असंच आम्ही रोज कामावर जाताना एकमेकींना म्हणत असतो. प्रमुख पाहिजे तर असा असं कवतिकाचं बोलही आमच्या तोंडून सतत निघत असतात. पण भाऊराया तुमची एकच गोष्ट लय खटकाया लागली. तुम्हाला कुठबी बहिणी भेटल्या की ‘पैसे मिळाले का? मिळाले का पैसे? जमा झाले का खात्यात?’ असंच इचारता. हे काही आम्हाले चांगलं नाही वाटत. त्यासाठी हा पत्रप्रपंच! अहो दादा, तुम्हीच म्हणता ही लाडकी बहीण योजना म्हंजे भावानं बहिणीला दिलेली ओवाळणी. मग ओवाळणी देताना एकदा ‘ताट वाजवून’ झाल्यावर परत परत ते इचारायची गरज काय? हा बहिणींचा अपमान नव्हं का? कशाला उगीच प्रत्येक कार्यक्रमात दिसल्या महिला की इचारता? तुम्ही जे आमच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले ती रेवडी नाही, दानही नाही याची कल्पना आहे आम्हासनी. ते विरोधक काहीही म्हणू देत. आम्ही मात्र याकडं स्वच्छ भावनेनं केलेली मदत म्हणूनच बघतो. मग सारखं सारखं ‘मिळाले का?’ असे इचारून आम्हाला ओशाळवाणं कशाला करता? ही योजना नव्हती तवाबी आम्ही तुमच्या कार्यक्रमाला बसमध्ये बसून येतच होतो की! तेव्हा तर नुसती जा- याची व्यवस्थाच व्हायची. लखपती व करोडपती दीदीचं स्वप्न वाट्याले येईल असं समजून आम्ही यायचो. आता तर येणं-जाणं फुकटात, वरतून तीन हजार रुपये मिळाल्यावर आम्ही सारेच खुशीत असताना हा प्रश्न पुन:पुन्हा कशाला? वाटपाची जबाबदारी असलेल्या सरकारी यंत्रणेवर तुमचा विश्वास नाय का? आमच्यापैकी अनेकींना पैसे मिळाले पण बँकवाल्यांनी त्यात बराच ‘कट’ मारला. त्यामुळे काहींच्या हाती अर्धेच पडले. तुम्ही इचारल्यावर कुणी उठून उभे राहून तसं सांगितलं तर तुम्हासनी कसं वाटेल? तुम्हाला असल या ओवाळणीची नव्हाळी पण आम्हाला नाही. दर दिवाळीत आम्ही करतोच की हे. आमचे रक्ताचे भाऊ त्यांच्या ऐपतीप्रमाणं टाकतात काही ना काही ताटात. आम्हीही गपगुमान ठेवून घेतो ते पदराच्या गाठीत. पैसे नाही तर त्यामागची भावना महत्त्वाची. हीच शिकवण आम्हाला गरिबीने दिलेली. तुम्हाला कदाचित हे ठाऊक नसेल म्हणून तुम्ही इचारता का असे? तुम्हाला तुमची योजना यशस्वी झाली की नाही हे तपासण्याची लईच घाई झालेली दिसते. निवडणुका आल्या की असं काही पदरात पडेल, त्यातून एकदोन महिने खुशीत निघून जातील, मग पुढचं पुढं बघू. शेवटी राबणं हेच नशिबात ठरलेलं. त्यामुळे तुमचं ते इचारणं अपमान झाल्यागत वाटतं आम्हाला. आम्ही जिथं कुठं काम करतो तिथंबी महिना सरला की हाच प्रश्न हमखास इचारला जातो. तो मेहनताना असल्यानं त्याचं वाईटबी वाटत नाही. मग दादा ही योजना जर सन्मान असेल तर वारंवार हा प्रश्न इचारायची गरज काय? त्यापेक्षा हे इचारायला माणसं ठेवा की. तेवढंच आणखी काही भावांच्या हाताला काम मिळेल. तेव्हा तुम्ही आता नव्या ठिकाणी या प्रश्नाचा नाद सोडा व भविष्यात या ओवाळणीत कितीची भर घालणार तेवढं मात्र जरूर बोला. बाकी मतांचं म्हणाल, तर अजून तरी आमच्यातल्या बहुतेकींनी काही ठरवलेलं नाही. निवडणूक जाहीर झाली की बघू, घाई काय त्यात?
-तुमच्या लाडक्या बहिणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा