।।श्री नारदमुनी प्रसन्न।।
खूश खबर! खूश खबर! सत्तातुरांसाठी खूश खबर! आमचे येथे कुठल्याही राजकीय पक्षात सनदशीर मार्गाने फूट पाडून मिळेल. ज्या लोकप्रतिनिधींना सत्तेत सामील होऊन राज्य व देशाची सेवा करायची आहे तसेच विश्वगुरूंचे हात बळकट करून देशाला प्रगतिपथावर न्यायचे आहे अशांसाठी ही फुटीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. ज्यांना यासाठी पुढाकार घ्यायचा आहे त्यांनी सर्वात आधी पक्षातील दोन तृतीयांश लोकप्रतिनिधींना एकत्र करण्याचा प्रयत्न स्वबळावर करावा. त्यात यश येत नसेल तर त्यातले कच्चे लिंबू कोण, भ्रष्टाचाराचा आरोप असलेले कोण हे हेरून त्यांची नावे त्वरित सादर करावीत. आमच्याशी सामंजस्य करार केलेल्या विविध तपास यंत्रणांचा ससेमिरा त्यांच्यामागे लावला जाईल. शिवाय आमच्या ‘फर्म’मध्ये भागीदार असलेल्या काही राजकीय नेत्यांना त्यांच्यावर आरोप करण्यासाठी सोडले जाईल. अशांची पद्धतशीर कोंडी करून योग्य संख्याबळ जुळवण्यासाठी मदत केली जाईल. फुटीरांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याने सूचक कसे बोलावे हेसुद्धा आम्ही शिकवू. फुटीचा डाव आवाक्यात येईपर्यंत अशा नेत्याचा धीर खचू नये यासाठी फर्मचे विश्वस्त असलेले दिल्ली व मुंबईतील नेते मूळ पक्षनेत्यावर आरोपांचा तुफान मारा करतील. या काळात गुप्तपणे होणारे विमानप्रवास, उत्तररात्री होणाऱ्या बैठकांना हजेरीसाठी लागणाऱ्या विशिष्ट वाहनांची सोय आमच्याकडून केली जाईल. योग्य संख्याबळ जुळल्यावर सारे एकत्र आले की आमच्या सुसज्ज कार्यालयात उणे २० डिग्री तापमान असलेल्या खोलीत ठेवण्यात आलेल्या वॉशिंग मशीनमधून प्रत्येकाला आत टाकून बाहेर काढले जाईल.
ही प्रक्रिया एमआरआय जसा काढतो तशी असेल. या मशीनमध्ये स्वच्छतेसाठी वापरली जाणारी पावडर इस्रायलहून आयात केली असून बाहेर कुठेही उपलब्ध नाही. यातून बाहेर पडलेल्यांचे भ्रष्टाचाराचे डाग तर नष्ट होतील शिवाय आपणच कसे निष्ठावान असा साक्षात्कार त्यांना पावडरच्या वासाने होत राहील. गद्दारीचा न्यूनगंडही नाहीसा होईल. फूट जाहीर केल्यानंतर मूळ पक्षाचे नेते कसे खराब हे जनतेला पटवून देण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण साऱ्यांना देण्यात येईल. मूळ पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या चुका, भ्रष्टाचार याची अद्ययावत यादी प्रत्येकाला पुरवली जाईल. दोनेक दिवस हा आरोप-प्रत्यारोपाचा दौर चालल्यानंतर फुटीरांचाच पक्ष कसा अधिकृत हे जनतेच्या मनात ठसवण्यासाठी विधि व कायदेमंडळासाठी आवश्यक असलेली सर्व मदत आमच्याकडून पुरवली जाईल. विविध यंत्रणांत कार्यरत असलेले पण आमच्या फर्मच्या ‘पेरोल’वर असलेले अनेक मान्यवर याकामी फुटीर गटाला मदत करतील. ती कशी असा प्रश्न विचारण्याचा कुठलाही अधिकार फुटीरांना असणार नाही. त्यांनी फक्त ज्यांचे नेतृत्व नाकारले ते कसे बोगस हे जनतेसमोर मांडून त्यांच्याविरुद्ध संभ्रम व असंतोषाचे वातावरण तयार कसे करता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे. खोके, गद्दार अशा शब्दांचा सामना करण्याची तयारी ठेवतानाच गेल्या चार वर्षांपासून निष्ठा ही नर्मदेच्या पात्रातील गोटय़ासारखी गुळगुळीत झाली आहे हा विचार प्रत्येकाने मनात ठेवला तर मानसिक त्रास होणार नाही. फुटीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व ती झाल्यावर सुद्धा आम्ही कुणासाठी काम करतो असा प्रश्न अजिबात विचारायचा नाही. उघड गुपितावर बोलणे हा आम्ही कमीपणा समजतो हे लक्षात ठेवावे. या सर्व गोष्टी मान्य असलेल्यांसाठी आमचे दरवाजे २४ तास उघडे आहेत. तेव्हा इच्छुकांनी त्वरा करावी.
– महाचाणक्य मार्गदर्शक मंडळ