‘मित्रांनो, ‘पार्टीलेस डेमॉक्रसी’ या संस्थेच्या वतीने आपल्या सर्वाचे स्वागत. महाराष्ट्रातील राजकारण्यांविषयी जनतेच्या मनात असलेला आदरभाव कायम राहावा तसेच वृद्धिंगत व्हावा यासाठी आम्ही गेल्या चार वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. ‘माझी पक्षनिष्ठा’ या विषयावरच्या परिसंवादाने संस्थेच्या कार्यक्रमांचा शुभारंभ झाला. त्यात कोकणचे नारायणराव व नगरचे राधाकृष्णजी सहभागी झाले होते. त्यांच्या हृद्य मनोगताची आठवण आजही अनेक जण काढतात. नंतर ‘पक्षांतरविरोधी कायदा आणि मी’ यावर कुलाब्याचे निष्णात विधिज्ञ राहुल यांचे बीजभाषण ठेवले होते. त्या वेळी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे केलेले विवेचन अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. त्यानंतर इंदापूरचे हर्षवर्धनराव यांचे ‘पक्ष व मन:शांती’ या विषयावरचे अनुभवकथन सर्वाना आवडले होते. या कार्यक्रमानंतर झोपेची समस्या दूर झाली असे अनेकांनी आम्हाला कळवले. चौथ्या कार्यक्रमाला बारामतीचे अजितदादा आले होते. त्यांनी ‘पहाटेचे राजकारण’ या तुलनेने नव्या असलेल्या विषयावर विस्तृत प्रकाश टाकला. तेही भाषण आज अनेकांच्या स्मरणात आहेच. संस्थेच्या या सततच्या व नावीन्यपूर्ण कार्यक्रमामुळे राज्यातील जनतेचा लोकशाहीवरील आदर दुणावला. पक्षनिष्ठा या शब्दावरून त्यांच्या मनात निर्माण झालेली किल्मिषे दूर झाली. केवळ राजकारणीच नाही तर एकूण राजकारणाविषयी त्यांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली हे आम्हाला मिळालेल्या भरभरून प्रतिसादातून दिसून आले. आमच्या या कार्यक्रमांपासून प्रेरणा घेऊन अनेक नेते ‘गुवाहाटी नाटय़ात’ सहभागी झाले.
त्यामुळे आमचा उत्साह वाढला व लगेच आम्ही ‘माझा गुवाहाटी प्रवास’ या विषयावर शहाजीबापूंचे व्याख्यान ठेवले. त्याला तर काय गर्दी.. काय प्रतिसाद! पक्षांतर हा भारतीय राजकारणाचा स्थायीभाव आहे यावर आमच्या संस्थेची श्रद्धा आहे. आता ते घाऊक स्वरूपात होऊ लागल्याने सर्वाचीच भाषणे आयोजित करणे संस्थेला शक्य नाही. शिवाय राज्यातील माध्यमेही या साऱ्यांची प्रामाणिक भूमिका तुमच्यापर्यंत पोहचवत असतात. म्हणून आम्ही पक्ष, गट बदलाची वाट दोन किंवा अधिक वेळा चोखाळणाऱ्या मान्यवरांना ‘फिरता चषक’ देण्याचे ठरवले आहे. राजकारण हासुद्धा एक खेळच आहे असे आमची संस्था समजते. खेळात जशी चुरस असते तशी किंवा त्याहून जास्त ती राजकारणात बघायला मिळते. यात जो सर्वोत्कृष्ट ठरतो त्याला चषक मिळत असतो. तो ‘फिरता’ ठेवला तर दरवर्षी तो आपल्याकडेच राहावा अशी चुरस स्पर्धकांमध्ये असते. या चषकापासून प्रेरणा घेऊन राजकारण्यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारावा व सत्तेच्या माध्यमातून स्वत:ला लोकसेवेसाठी वाहून घ्यावे यासाठी हा चषक देऊन त्यांचा सन्मान आज या ठिकाणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी आम्ही पन्नास नेत्यांची नावे निश्चित केली. तर आता मंचावर विराजमान झालेल्या सत्ताधाऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी हा चषक प्रदान करावा. यातले पहिले नाव आहे आपल्या मनीषाताई..’ निवेदकाचे वाक्य संपण्याआधीच सभागृहात टाळय़ांचा प्रचंड कडकडाट होतो. तेवढय़ात सर्वात मागे बसलेल्या मुंबईच्या माजी प्रथम नागरिक किशोरीताई , ‘ती तर स्वत:च फिरता चषक आहे’ म्हणत बाहेर पडतात पण त्याकडे कुणाचे लक्ष जात नाही.