‘राज्याला सभ्य आणि सुसंस्कृत तसेच महसूलयुक्त बनवण्यासाठी झटणाऱ्या परिवारातील माझ्या सर्व सहकाऱ्यांनो, वामकुक्षी न घेता आज आपण येथे मोठ्या संख्येत जमलोय ते काशिनाथ शेट्ये यांच्या सत्कारासाठी. एरवी फारसे चर्चेत न राहणाऱ्या आपल्या गोव्याला याच शेट्येंनी गेल्या दोन दिवसांत देशभर प्रसिद्धी मिळवून दिली. नेहमी मोटारींनी धडक दिल्यामुळे चर्चेत येणारे विजेचे खांब महसूलवाढीसाठी किती उपयुक्त आहेत हे शेट्येंनी दाखवलेल्या दूरदृष्टीमुळेच तमाम गोवेकरांना कळू शकले. वरिष्ठांनी दिलेले महसूलवाढीचे उद्दिष्ट साधण्यासाठी त्यांनी या खांबांवरून जाणाऱ्या इंटरनेटच्या केबल तोडल्या व मंगळवारी संपूर्ण राज्य दूरसंचारमुक्त झाले. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून काहीबाही पाहण्याची सवय लागलेल्या हजारो गोवेकरांनी दिवसभर प्रभूचे नामस्मरण करण्यात वेळ घालवला व पदरी पुण्य पाडून घेतले. ऐन कुंभकाळात हा योग साधला गेला व त्यासाठी निमित्त ठरले ते हेच आपले शेट्ये (प्रचंड टाळ्या).

केबल कापण्याच्या एका कृतीमुळे त्यांनी अख्ख्या राज्याला ईश्वरचरणी लीन केले. आजच्या काळात ही कामगिरी अद्भुत म्हणावी अशीच आहे. तर आपले हे शेट्येसाहेब वीजमंडळात कार्यकारी अभियंता आहेत. सध्या माध्यमातून त्यांच्यावर टीका होत असली व त्या दबावात येऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडील कार्यभार काढून घेतला असला तरी ही कारवाई तात्पुरती आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. वादाचे हे मोहोळ शमल्यावर शेट्ये यांचा यथोचित सन्मान राखला जाईल, असे आश्वासन आम्हाला सत्तेकडून मिळाले आहे. त्यांच्या या कृतीमुळे पर्यटनावर परिणाम झाला. सुमारे ४० कोटींची उलाढाल ठप्प झाली, अशी आवई माध्यमे उठवत असली तरी ‘स्वच्छ व सभ्य गोवा’ या आपल्या मोहिमेवर त्याचा परिणाम होणार नाही, हे मी आताच सांगतो. अलीकडच्या काळात पर्यटकांच्या धुडगुसामुळे गोवेकर त्रस्त झाले आहेत. भारतीय परंपरा न पाळणाऱ्या व येथे येऊनसुद्धा देवदर्शनासाठी न जाता किनाऱ्यावर उघडेनागडे फिरणाऱ्या या पर्यटकांमुळे आपली संस्कृती धोक्यात आली आहे. त्याला अटकाव करण्यासाठी परिवाराच्या आग्रहावरून सरकारने वर्तन-नियम लागू केले आहेत. यामुळे पर्यटनात घट झाली तरी चालेल अशी कठोर भूमिका आपण घेतल्यावर यातून होणारी तूट भरून काढण्यासाठी ही खांबांतून महसूलची युक्ती शोधण्यात आली. त्याची अंमलबजावणी करणारे शेट्ये राज्यातले पहिले अधिकारी ठरले आहेत.

येथून डच निघून गेले त्यालाही आता कित्येक दशके लोटली. तरीही त्यांच्या संस्कृतीचे गोडवे गात पर्यटक येतात. या साऱ्यांनी लोकशाहीची जननी असलेल्या भारतीय संस्कृतीचेच गोडवे गायला हवेत. हा बदल घडायला आणखी काही काळ जाऊ द्यावा लागेल. तोवर राज्याची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी झटणाऱ्या सरकारचे पाईक म्हणून शेट्येंनी मोठे काम केले. ते करतानासुद्धा त्यांनी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या केबलबरोबर ओळखल्या आणि त्या कापल्या नाहीत. हे त्यांनी कसे केले, ते देवालाच ठाऊक. अशी सेवा देताना न्यायालयीन निर्णयाची वाट बघायची नसते या परिवाराने घातलेल्या पायंड्याचे त्यांनी तंतोतंत पालन केले. आता मी त्यांना सत्कारासाठी आमंत्रित करीत आहे’ मग टाळ्यांच्या गजरात शेट्ये उभे राहतात. त्यांचा सत्कार होतो. त्याला उत्तर देताना ते दोनच शब्द उच्चारतात. ‘मी तर गोव्याचा सेवेकरी’.

Story img Loader