‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी गायीला मिठी मारण्याचे परिपत्रक सरकारने मागे घेतले असले तरी त्यामागील कारणे गुलदस्त्यात होती. काही बोरुबहादूरांनी पशुकल्याण मंडळाच्या कार्यालयात घुसखोरी करून तो कारणांचा कागद हस्तगत केला. त्यातला मजकूर पुढीलप्रमाणे होता.गायीच्या सान्निध्यात राहिल्याने नैराश्य कमी होते अशा प्रकारचे संशोधन करोनाकाळात अमेरिकेत झाले. ‘गो मिठी’मुळे या पाश्चात्त्य संशोधनाला अप्रत्यक्षपणे बळ मिळेल व ज्या हेतूने ‘व्हॅलेंटाइन डे’ला विरोध म्हणून या उपक्रमाची घोषणा केली गेली, तोच हेतू असफल ठरेल हे काही प्रतिगामी संघटनांनी तातडीने लक्षात आणून दिले.

भारतीय संस्कृतीत गायीप्रमाणेच बैलाचे महत्त्वसुद्धा अबाधित आहे. देशभरात पूज्य असलेल्या शंकराचे वाहनसुद्धा नंदी बैल होते. मात्र गेल्या नऊ वर्षांपासून गायीलाच महत्त्व देण्याचे धोरण पुढे आणले जात असल्याने बैलांवर अकारण अन्याय होतो. कृषीप्रधान देशात असा भेदभाव योग्य नाही व ‘सबका साथ – सबका विकास’ या घोषणेच्या हेतूला त्यामुळे तडा जातो याची जाणीव काहींनी करून दिली.

सध्या भारतातील गायी लंपी या जिवघेण्या आजारातून नुकत्याच बाहेर येत आहेत. यावरची लससुद्धा अद्याप तयार झालेली नाही. अशा काळात ‘मिठीमार’ आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असता तर मानवजातीला नव्या साथरोगाचा धोका उद्भवला असता.गाव-खेडय़ात गायींची संख्या भरपूर असली तरी शहरात त्या पुरेशा संख्येत नाहीत. ज्या आहेत त्याही भाकड आहेत. धष्टपुष्ट नाहीत. त्यामुळे मिठीसाठी उत्सुक असलेल्या शहरी मध्यमवर्गाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले असते.

परिवाराशी संबंधित लाखो उच्चशिक्षित तरुण सध्या माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्थिरावले आहेत. कार्यव्यस्ततेमुळे त्यांना गायी शोधायला बाहेर पडणे कठीण होते. म्हणून मग त्यांनी संगणकावर ‘डिजिटल मिठी’ चा पर्याय शोधला व व्हॉट्सअॅप विद्यापीठाच्या माध्यमातून तसा प्रचार सुरू केला. यामुळे परिपत्रकाच्या उद्देशालाच तडा गेला असता.

गायीच्या परवानगीशिवाय तिला मिठी मारणे हा मुक्या प्राण्यावर अन्याय आहे, अशी मोहीम काही वन्यजीवप्रेमींनी जागतिक स्तरावर सुरू केली. त्यामुळे विश्वगुरूंच्या जागतिक प्रतिमेला तडा जाण्याची परिस्थिती उद्भवली असती.देशभरातील तमाम संस्कृतीरक्षक संघटनांसाठी ‘व्हॅलेंटाइन’चा दिवस खास असतो. प्रेमीयुगुलांना या पाश्चात्त्य पद्धतीपासून परावृत्त करणे, त्यांना हाकलून लावणे, त्यासाठी प्रसंगी धाकदपटशा करणे, राष्ट्रभक्तीची भावना मनात ठेवत काहींना चोप देणे अशी कामे ते कॅमेऱ्याच्या साक्षीने करत असतात. यातून परिवाराच्या समृद्धीत भर पडत असते. ‘गो-मिठी’मुळे हा मोठा वर्ग गायींच्या मागे फिरत राहिला असता तर त्यांच्या राष्ट्रीय कर्तव्यास मुकला असता.वरील सर्व कारणांवर साधकबाधक विचार केल्यावर ‘गो-मिठी’ ऐवजी ‘मिठी-गो’ या निष्कर्षांप्रत मंडळ आले आहे.