मित्रहो, खास भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी स्थापन केलेल्या ‘उन्नत भारती’ या संघटनेतर्फे आयोजित केलेल्या समविचारी सभेत स्वागत. परिवाराकडून या संघटनेची स्थापना झाली ती २००३ मध्ये. नंतर सर्वंकष सत्तेच्या अभावामुळे या बैठका अनियमित व लपूनछपून होत गेल्या. २०१४ नंतर उजळ माथ्याने बैठकांना सुरुवात झाली पण लोक काय म्हणतील या भीतीने सदस्यसंख्या फार वाढू शकली नाही. आरंभापासून प्रशासनात आपल्या विचाराचे अधिकारी मोठय़ा संख्येत होते पण पुढील अनेक दशके हा विचार सत्तेत राहील की नाही याविषयी साशंकता असल्याने उघडपणे कुणी पुढे येत नव्हते. आज मार्गदर्शक म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मनीषाताईंनी ही कोंडी फोडली (प्रचंड टाळय़ा). ६ डिसेंबर १९९२ ला पेढा खाल्ला अशी जाहीर कबुली देत त्यांनी गेली ३२ वर्षे दबलेल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांच्या या कृतीमुळे आता या संघटनेला ऊर्जितावस्था प्राप्त होईल व सत्ता आणि प्रशासन हे दोन्ही घटक एकत्र येऊन देशाला ‘उन्नत’ मार्गावर घेऊन जातील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करून ताईंना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करतो.’ हे ऐकताच हातातले कमळाचे फूल बाजूला ठेवत ताई ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतात. ‘‘उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खास उल्लेख करायचा झाल्यास समोर बसलेल्या लीना मॅडम. मला आज कुसुमाग्रजांच्या कवितेची एक ओळ आठवते. ‘हा दयेने ईश्वराच्या काळ आहे चालता’ यातला ईश्वर म्हणजे माझा राम. त्याच शक्तीच्या बळावर मी ती पोस्ट लिहिण्याचे धाडस करू शकले.
आता काही लोक म्हणतात कार्यपालिकेतील प्रत्येक जण घटनेला बांधील असतो. त्याने राजकीय प्रभावात येऊ नये, धर्मनिरपेक्ष असावे. मी हे स्पष्ट करते की आज सरकार जेवढे घटनेला बांधील आहे, तेवढीच मीही आहे. काही म्हणतात, ती वास्तू पाडण्याची घटना बेकायदा होती, त्याच्या आनंदात तुम्ही पेढा खाल्ला. मी त्या नाही तर मंदिर होणार या आनंदात खाल्ला व त्याच आनंदाचे वर्तुळ पूर्ण झाले म्हणून लिहिती झाले. मी राजशिष्टाचार सांभाळत असल्याने जगातील अनेक अधिकाऱ्यांशी माझा संबंध येतो. ते तेथील सत्तेशी एकनिष्ठ असतात. तशीच व्यवस्था भारतातही रुजायला हवी. मधल्या काळात राज्यात दुसरे सरकार होते तेव्हाही मी तेव्हाच्या प्रमुखाची छायाचित्रे प्रसारित करून अशी निष्ठा दर्शवली होतीच. अधिकाऱ्यांची निष्ठा सत्तेप्रमाणे बदलत राहावी असे मला वाटते. अन्यथा उचलबांगडी ठरलेली. टीकाकारांची तमा मी बाळगत नाही. राज्याचे प्रशासकीय प्रमुख पद किंवा निवृत्तीनंतर एखादे पद मिळवण्यासाठी मी हे केले अशी टीका माझ्यासारख्या स्वच्छ व कर्तबगार अधिकाऱ्यावर अन्याय करणारी आहे. सत्ता आणि प्रशासनातील समविचारी एकत्र आले तर अधिक वेगाने विकास होऊ शकतो. तरीही काही लोक मला नोकरीतून काढून टाका अशी मागणी करताहेत. त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य. म्हणून कसलीही भीती न बाळगता या संघटनेत सहभागी होऊन सत्तेचे हात बळकट करा असे आवाहन मी सेवेतील सर्व सहकाऱ्यांना करते व तुम्हा सर्वासाठी त्याच मसुरीहून खास मागवलेला पेढा सर्वानी खावा अशी विनंती करून थांबते.’’