टॅक्सी चालक आपल्या कपडय़ांच्या बॅगसकट पसार झाल्याची घटना घडल्यावर उर्फी जावेदने सुरू केलेला थयथयाट काही थांबायचे नाव घेईना! यावरून देशभर वादळ उठल्यावर उबेरने प्रकरणाची चौकशी जाहीर केली. दुसऱ्याच दिवशी त्या चालकाला दिल्लीच्या कार्यालयात बोलावण्यात आले. त्याने दिलेला कबुलीजबाब खालीलप्रमाणे. ‘मॅम गाडीत बसल्यावर आम्ही विमानतळाच्या दिशेने निघालो. थोडे अंतर पार केल्यावर दुचाकीवर असलेले दोन तरुण पाठलाग करताहेत असे माझ्या लक्षात आले. मी कधी आरशातून तर कधी थेट मान वळवून मागे बघू लागलो. मॅमला वाटले मी त्यांच्या तोकडय़ा वेशभूषेकडेच बघतोय. त्यामुळे त्या डाफरत म्हणाल्या. ‘‘चूपचाप सामने देखो’’. ‘‘मुझे क्या’’ असे मनाशी म्हणत मग मीही पाठलाग करणाऱ्यांचा नाद सोडला. मध्ये त्या जेवायला थांबल्या. मी हॉटेलबाहेर उभा होतो. ते पाठलाग करणारे दोघे जवळ आले. त्यांनी पाच हजार रुपये माझ्या खिशात कोंबले आणि मला जबरदस्तीने तेथून दूर अंतरावर असलेल्या धाब्यावर नेले. आम्ही वेशभूषाकार आहोत, आम्हाला उर्फीच्या कपडय़ांची शिवण अंतर्बाह्य तपासायची आहे. ‘‘को-ऑपरेट करो, और पैसे मिलेंगे’’ असे सांगून मला गप्प केले. नंतर त्यांनी तिची बॅग उघडली. मी विरोध करताच माझ्यासाठी दारू मागवली. त्या मोहाला मी बळी पडलो. बॅगमध्ये भरपूर कपडे होते, पण मॅम नेहमी घालत असलेल्या पँटचा शर्ट व शर्टची पँट केलेले कपडे त्यांना दिसेनात. मग त्यांनी एका खाटेवर बॅगमधले सगळे कपडे पसरवले. नशेत असल्याने मी वेटरजवळ बोलून गेलो की ते उर्फीचे कपडे आहेत.

बघता बघता ही वार्ता तिथे हजर असलेल्या प्रत्येकाच्या कानी गेली आणि त्या कपडय़ांच्या ढिगाभोवती ही गर्दी जमली. ते बघून त्या दोघांनी एकेका कपडय़ाची बोली लावायला सुरुवात केली. हा पोत्यापासून शिवलेला ड्रेस लाख रुपयाला, हा सोफ्याच्या कव्हरपासून शिवलेला दीड लाखाला, हा मोबाइल कव्हर जोडून तयार केलेला ‘टू पीस’ दोन लाखाला. जमलेले लोकही त्यात सहभागी होऊ लागले. त्यात तरुणी आघाडीवर होत्या. तेवढय़ात मला मॅमचे फोन यायला लागले व माझी नशा खाडकन उतरली. मग मी धाबा मालकाकडे जाऊन सत्य काय ते सांगितले आणि हा लिलाव थांबवा असे विनवले. तो गर्दीत घुसला, पण त्याचेही कुणी ऐकेना. मॅमचे कपडे न्याहाळण्यात प्रत्येकजण गर्क. तेवढय़ात गर्दी बघून पोलीस आले. त्यांना पाहताच पाठलाग करणारे दोघे पसार झाले. मग गर्दीही पांगली. मी अस्ताव्यस्त पडलेले कपडे घडी करून बॅगमध्ये ठेवायचा प्रयत्न केला, पण चित्रविचित्र आकारामुळे ते जमेचना! शेवटी एका वेटरने इस्त्रीवाल्याला बोलावून आणले. त्याने पोत्यापासून आणि रेक्झिनच्या कव्हरपासून तयार केलेल्या कपडय़ांवर इस्त्री फिरवण्यास नकार दिला. अखेर कशाबशा घडय़ा करून ते कपडे बॅगमध्ये कोंबले आणि मॅमला सोडले तिथे हजर झालो. त्या ओरडतील म्हणून घडलेले काहीही सांगितले नाही. मग त्यांना विमानतळावर सोडले.’ चालकाच्या या जबाबावर बराच खल केल्यावर उबेरने ट्विटरवर जाहीर केले. ‘आमच्या सन्माननीय ग्राहक उर्फी जावेद यापुढे टॅक्सीसेवेचा लाभ घेऊ शकतील, फक्त त्यांच्या कपडय़ाची बॅग त्यांना सतत जवळ बाळगावी लागेल. ती वाहनात ठेवली व काही अनर्थ घडला तर त्याची जबाबदारी आमची राहणार नाही.’