राघोबादादा-नारायणरावांपासून सत्ताकारणात काका-पुतण्यांचे संबंध हा कायम औत्सुक्याचा विषय राहिल्याची कल्पना आम्हाला आहे. प्रेम-दुरावा, शह-काटशह अशी वळणे घेत जाणारा या नात्याचा प्रवास जाणून घेण्याची रुची प्रत्येकाला असते. इतिहासाचे वाचन न करणाऱ्या बोरुबहाद्दरांना हे संबंध उलगडून दाखवण्याचा अधिक सोस असतो. या नात्यावरून भविष्यात आणखी संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी काका-पुतण्यांनी खालीलप्रमाणे खबरदारी घ्यावी, असे नम्र आवाहन आम्ही सजग नागरिक मंचाच्या वतीने करत आहोत :
१) वेगवेगळी राजकीय वाट धरणाऱ्या काका-पुतण्यांनी शक्यतो स्वत:च्या घरीच भेटी घ्याव्यात, जेणेकरून त्याला कौटुंबिक भेटीचा मुलामा देत राजकीय चर्चेची हौस भागवून घेता येईल.
२) ते शक्य नसेल व एखाद्या उद्योगपतीचे घर निवडले असेल तर श्रीमंत व्यक्ती ही नेहमी कुटुंबाचा सदस्य असतेच असे ‘पटणारे’ स्पष्टीकरण देण्याची तयारी ठेवावी.
३) ‘चोराच्या मनात चांदणे’ ही म्हण प्रसिद्ध आहे. तिचा वापर होणार नाही याची काळजी भेटीचे स्थळ निश्चित करताना घ्यावी.
४) दिवसा भेट ठरली असेल तर थोडी वर्दळीची जागा निश्चित करावी, जेणेकरून माध्यमांची गैरसोय होईल व त्यांना चेहऱ्यावरील तगमगीची चलचित्रे टिपता येणार नाहीत.
५) संभ्रम निर्माण करणे हाच हेतू असेल तर दिवसाच्या भेटीला प्राधान्य द्यावे व उडालेल्या गोंधळाचा दोघांनीही मनसोक्त आनंद घ्यावा.
६) भेटीला जाताना किंवा परतताना आणखी उत्सुकता निर्माण करायची असेल तर कॅमेऱ्यापासून चेहरा लपवावा, वाहनात आडवे झोपावे. त्याचे सबळ कारण सांगताना काकांनी काढा पाजला, त्यामुळे पोट ढवळून निघाल्याने असे करावे लागल्याचे सांगितले तरी हरकत नाही. त्यामुळे काढय़ाची चर्चा सुरू होईल व भेटीची मागे पडेल हे लक्षात असू द्यावे.
७) गुप्त व जाहीर भेटी यातील सीमारेषा फारच धूसर आहे. त्याचा खुबीने वापर करून घेण्याचे तंत्र आत्मसात करून घ्यावे.
८) वयातले अंतर हे या नात्यातले प्रखर वास्तव आहे. त्यामुळे काकांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट होती असेही कारण एखाद्या वेळी देता येईल व त्यावरून कुणी संशय घेऊ शकणार नाही.
९) काका व पुतण्या या नात्यात लवकर गैरसमज पसरतात, त्यामुळे दूतांच्या माध्यमातून संवाद टाळण्यासाठी या भेटी गरजेच्या असतात हे कारणसुद्धा काही वेळा सयुक्तिक ठरू शकेल.
१०) कौटुंबिक भेटीच्या वेळी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची उपस्थिती कशी काय असा प्रश्न कुणी विचारलाच तर ‘पक्ष एक कुटुंब’ ही प्रचलित व्याख्या माध्यमांना ऐकवावी.
११) भेट झाल्यावर ‘आणखी प्रश्न विचारून संभ्रम निर्माण करू नका’ अशी तिरक्या चालीची वाक्ये दोघांकडूनही एकाच वेळी माध्यमांना ऐकवली जातील याची काळजी घ्यावी.
(मंचाकडून प्रसृत झालेल्या या खबरदारीवजा मजकुरावर साधक-बाधक चर्चा सुरू झाली असून आता संपूर्ण राज्याचे लक्ष काका-पुतण्यांच्या आगामी भेटीकडे लागले आहे.)