‘महोदय, असे निदर्शनास आले आहे की तुम्ही दिल्लीच्या पश्चिम क्षेत्राचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना अनेक बेकायदा व नागरी सेवाशर्तींशी विसंगत कृती करत आहात. यासंदर्भात आप तसेच अनेक पक्ष व संघटनांकडून असंख्य तक्रारी या कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. त्याचा गोषवारा पुढीलप्रमाणे आहे. १. तुम्ही तुमच्या खुर्चीत पुजाऱ्याला बसवल्यानंतर काळ्या वेष्टनातील कोणतीही फाइल माझ्या टेबलवर ठेवू नये असा कार्यालयीन आदेश जारी केला. त्यामुळे कचेरीत असलेल्या दीड लाख फायलींचे कव्हर बदलावे लागले. त्यावर दोन कोटी रुपये खर्च झाले. २. अभ्यागतांकडून येणारी निवेदने निळ्या अथवा हिरव्या शाईनेच लिहिलेली हवी, असा तोंडी आदेश तुम्ही देता. त्यामुळे शेकडो लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.’
जी शिष्टमंडळे तुम्हाला भेटायला येतात त्यांनी आत प्रवेश करताच तुम्ही तुमच्या बाजूलाच ठेवलेल्या पुजाऱ्याच्या तसबिरीला नमस्कार करा, असे सुचवता. ज्यांनी याला नकार दिला त्यांचे म्हणणे ऐकून न घेताच त्यांना हाकलून लावता. ४. तुमच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची सुनावणी निश्चित करताना तुम्ही दुपारी तीननंतरचीच वेळ देता व तसे पत्र संबंधितांना देताना त्यावर मिनिटे व सेकंदाचा उल्लेख करता. कुणाला पाच सेकंद जरी उशीर झाला तरी तसबिरीकडे बोट दाखवून ‘आता ते नाही म्हणताहेत’ असे सांगून अशील व वकिलांना परत पाठवता. ५. तुमच्या कक्षाच्या बाहेर कुणी भगवे कपडे घातलेली व गंध लावलेला व्यक्ती असेल तर तिला सर्वांत आधी वेळ देता व इतरांना ताटकळत ठेवता. ६. तुमच्या कार्यक्षेत्रात मंगळवार व शुक्रवारी कितीही मोठी घटना घडली तरी प्रमुख या नात्याने तुम्ही घटनास्थळी जात नाहीत. घातवार आहे असे कारण देता.
हेही वाचा >>> उलटा चष्मा: विकेट
७. गेल्याच आठवड्यात तुमच्या कार्यक्षेत्रात दोन गटांत धार्मिक तणाव निर्माण झाला. तुम्ही तातडीने तिथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र तुम्ही दीड तास उशिराने गेलात. पुजाऱ्याकडून जाण्याची वेळ मिळाल्यावरच तुम्ही खुर्ची सोडली. त्यामुळे वातावरण आणखी चिघळले. ८. दंडाधिकारी या नात्याने तुम्ही शासकीय कामासाठी २४ तास उपलब्ध असायला हवे. मात्र, सकाळी व रात्री कितीही आणीबाणीचा प्रसंग उद्भवला तरी तुम्ही दूरध्वनीवर येत नाहीत. साहेब पूजेत व्यग्र आहेत असेच उत्तर वरिष्ठांनाही ऐकायला मिळते. ९. आपचे एक शिष्टमंडळ तुम्हाला शिक्षण प्रश्नावर भेटायला आले असता तुम्ही तुमच्या पुजाऱ्याचे नाव घेऊन ‘यांच्या नावाने जय म्हणा’ असा आग्रह धरला. शिष्टमंडळाने नकार देताच ‘हनुमान चालीसा कशी म्हणता’ म्हणून डिवचले. १०. तुमच्या कार्यालयात काळा सदरा घालून आलेल्या चार कर्मचाऱ्यांना तुम्ही निलंबित केले तर बारा जणांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली. ११. तुम्ही तुमच्या स्वीय साहाय्यकाच्या कक्षात दानपेटी ठेवली असून कामासाठी येणाऱ्यांना त्यात पुजारी बांधत असलेल्या मंदिरासाठी दान टाकायला सांगता. या सर्व मुद्द्यांवर आपल्याकडून सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण अपेक्षित आहे. अन्यथा सेवाशर्तींचा भंग केला म्हणून कारवाई केली जाईल.’ सामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुखाकडून हे पत्र मिळताच तिरीमिरीतच दंडाधिकारी उठले व थेट गृह मंत्रालयाकडे धाव घेतली. तिथून त्यांना ‘एलजी’कडे जाण्याचा सल्ला मिळताच ते त्यांना भेटले. काहीही होणार नाही, असे आश्वासन घेऊनच ते परतले. या घडामोडीवर लक्ष ठेवून असलेल्या आपने लगेच या दंडाधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलनाची घोषणा केली.