‘प्रति,

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मा. अध्यक्ष, चाळणी समिती,

जगातील सर्वात मोठया पक्षात प्रवेश मिळावा म्हणून आपल्याकडे अर्ज सादर करताना मला अत्यानंद होतोय. मी कमी शिकलेलो असलो तरी गेल्या ३० वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून केंद्र व राज्याच्या सभागृहात काम केलेय. कमी शिक्षणाचा न्यूनगंड कधी मी बाळगला नाही व कुठूनतरी पदवी जमवण्याच्या भानगडीत पडलो नाही. मी अनेकांच्या जमिनी बळकावून साम्राज्य उभे केल्याने काही लोक शिव्या देतात पण निवडून येण्याच्या कामगिरीवर त्याचा परिणाम झाला नाही. शिवाय शिव्या देणाऱ्यांचा एकही आरोप कधी सिद्ध झाला नाही.

न्यायदेवतेच्या कृपेने सारे ठीक झाले. राजकारणात पाहिजे तेवढेच कमावतो तरीही विरोधक माझी भूक मोठी आहे, असा आरोप करतात पण मी त्याकडे कायम दुर्लक्ष केले. माझे काही विरोधक जगातून अचानक नाहीसे झाले, त्यावरून आरोपांची राळ उठवली गेली पण अनेक चौकशा होऊनसुद्धा त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

हेही वाचा >>> उलटा चष्मा: बुद्धी वाढवून मिळेल का?

या आव्हानात्मक (कठीण नाही) काळात चार मतदारसंघात लाखोच्या संख्येत असलेला माझा समाज पाठीशी ठामपणे उभा राहिला. त्यामुळे माझे राजकारण नेहमी चढत्या भाजणीचे राहिले, हे मी नम्रपणे सांगू इच्छितो. प्रभावक्षेत्रातील महिला, मुलींच्या शिक्षण व रोजगारासाठी मी अनेक संस्था व उपक्रम सुरू केले. त्यातून होणारी स्त्रीवर्गाची प्रगती न बघवल्याने विरोधकांनी काही असंतुष्टांना हाताशी धरून माझ्यावर ‘घाणेरडे’ आरोप केले. त्यामुळे मला तुरुंगवारी झाली. नंतर तक्रारकर्त्यांनी आरोप मागे घेतल्याने माझी सुटका झाली व लगेच झालेली निवडणूक मी प्रचंड मतांनी जिंकलो. शासकीय योजनांचा लाभ लोकांना थेट मिळावा म्हणून मी प्रशासनावर कायम दबाव ठेवतो. यावरून विरोधक अफरातफरीचा आरोप लावतात पण त्यात तथ्य नसल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. राज्यात पाच ठिकाणी मी संसार थाटले असले, तरीही माझा कुटुंबकबिला  अतिशय गुण्यागोविंदाने नांदतो आहे. कार्यक्षेत्रातील प्रत्येक विकासकामात मी टक्केवारी मागतो यातही फारसे तथ्य नाही. माझ्या उत्पन्नातील बहुतांश वाटा मी गरिबांना वाटतो. ऋषीचे कुळ आणि राजकारण्यांकडील लक्ष्मीचे मूळ कोणी शोधू नये, असे मला वाटते. विरोधक मला बाहुबली, भ्रष्टाचारी म्हणतात पण मुळात मी तसा नाही. रोज दीड तासाची पूजा व सर्व मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावरच माझे काम सुरू होते. वास्तविक आधीच अनेकांसह मीही तुमच्या पक्षात यायला हवे होते, पण काही कारणाने ते राहिले आणि तोवर तुमच्या पक्षाने ‘चाळणी समिती’ची प्रथा सुरू केली. मी वेगळया पद्धतीने काम करणारा व तुमचा पक्षही ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ असल्याने मला पक्षात प्रवेश द्यावा ही विनंती.’ दिल्लीतील पक्ष मुख्यालयात हा अर्ज प्राप्त होताच ‘चाळणी समिती’ची बैठक भरली. अर्जातील प्रत्येक वाक्यावर सुमारे पाच तास खल केल्यावर या नेत्याला पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. हे कळताच या समितीकडे देशभरातून हजारो अर्जाचा पाऊस पडू लागला!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulta chasma loksatta satire article on criminals join major political parties zws