‘अगं बाई, अरेच्चा’ असले नवलमिश्रित किंवा ‘काय हे’ असे विषादयुक्त उद्गार काढत राज्यातील महिला नेत्यांच्या ‘एक्सवॉर’कडे बघण्याची काहीच गरज नाही. मुळात हे राजकीय युद्ध अथवा भांडण नाहीच तर ‘सभ्य’ शब्दांत केलेला वादप्रतिवाद आहे. यात ‘उच्च’ दर्जाची अभिव्यक्ती दडली आहे. अशा अभिरुचीसंपन्न वादाला भांडणाची फोडणी देणे हा या नेत्या, प्रवक्त्यांवरील अन्याय ठरेल याची जाणीव सर्वांनी बाळगणे इष्ट. पूर्वी, देश मागास होता तेव्हा महिलांमध्ये भांडणे व्हायची तीही प्रामुख्याने सार्वजनिक नळावर. कारण तेव्हा या वर्गाच्या अभिव्यक्तीला वाव देणारी तीच एकमेव जागा होती. कालौघात पाणवठा हरवला, त्याची कसर आता आभासी माध्यमांवर भरून काढली जात आहे, असा तर्क लावण्याची मुळीच आवश्यकता नाही. ‘‘राजकारणातले पुरुष बघा कसे ‘मर्दा’सारखे भांडतात, नाही तर या महिला..’’ अशी तुलना करून या वर्गाचा अपमान करण्याची आगळीक तर कुणी करूच नये. या वादाकडे ‘स्त्रीवादी’ भूमिकेतून बघायला शिकणे केव्हाही योग्य. मग तो वाद किशोरीताई व शीतलताईंमधला असो वा चित्राताई, रूपालीताई, सुषमाताई, मनीषाताई यांच्यामधला असो. ‘‘याने इतके मनोरंजन होते की टीव्हीवरचे हसवणुकीचे कार्यक्रम बघायची वेळच येत नाही,’’ असले कुजकट शेरे अजिबात नकोत. या साऱ्या ताईंनी आपले उभे आयुष्य पक्षासाठी खर्ची घातले आहे.
हेही वाचा >>> उलटा चष्मा : आम्ही गिधाडे बरी!
प्रचंड मेहनतीने त्यांनी पक्षात उंची प्राप्त केली आहे. त्यांचा हा त्याग ध्यानात घेऊनच या वादाकडे बघायला हवे. तुम्ही म्हणाल, या साऱ्या जणी टीकेचे आसूड ओढताना चकली, कचोरी असे शब्द का वापरतात? अहो, पण त्यात वावगे ते काय? अशी नावे घेणे म्हणजे सांस्कृतिक चौकट ओलांडणे, सभ्यतेची मर्यादा पार करणे असे कसे म्हणता येईल? स्त्रीवाचक शिव्यांपेक्षा हे पदार्थाचे नामोच्चारण केव्हाही चांगलेच की! किमान या वादावर बारकाईने लक्ष ठेवून असणाऱ्यांच्या तोंडाला पाणी तरी सुटेल. पाहिजे तर ‘हसत-खेळत-खात’ वाद असे याचे वर्णन केले तरी चालेल. वाद घालताना या नेत्या चिडल्या की समोरचीचा एकेरी उल्लेख करतात हा आक्षेपसुद्धा चुकीचाच. अहो, काहीही झाले तरी या साऱ्या पूर्वाश्रमीच्या मैत्रिणीच. त्यामुळे वादाच्या वेळी मैत्रीचे स्मरण होऊन एकेरी उल्लेख केला तर त्याने काहीही फरक पडत नाही. आज भलेही या वेगवेगळय़ा पक्ष वा गटांत विभागल्या गेल्या असतील, पण भविष्यात एकाच ठिकाणी आल्या तर हाच एकेरी उल्लेखाचा धागा मैत्री पुनस्र्थापित होण्यास कारणीभूत ठरतो हा यामागचा कार्यकारणभाव कृपया लक्षात घ्या. मध्यंतरी किशोरीताईंनी एकीला फिरता चषक संबोधले. तेव्हाही अनेकांनी नाके मुरडण्यातच धन्यता मानली, पण त्यांची ही उपमा प्रतिभेचा उत्तुंग आविष्कार होती याकडे कुणी लक्षच दिले नाही. आता बदलत्या काळानुसार सभ्यतापूर्ण वादाची व्याख्यासुद्धा बदलली आहे. पाहिजे तर गूगलवर त्याचा शोध घेण्यात वेळ घालवा, पण या वादाचा उगाच बाऊ करून राजकारणातील महिलावर्गाला बदनाम करू नका. खूपच अस्वस्थ वाटत असेल तर यात उल्लेख झालेले चकली, कचोरी हे पदार्थ घरी तयार करून फराळ म्हणून त्यांचा आस्वाद घ्या, पण यापैकी कुणाचाही ‘भांडकुदळ’ म्हणून ऐन सणासुदीत अपमान करू नका!