‘येथे जमलेल्या माझ्या जिवाभावाच्या चाळीस आमदार मित्रांनो, केवळ एका संदेशावरून तुम्ही सर्व एकत्र आल्याने अल्प सूचनेवरून कुठेही जाण्याची तुमची सवय मोडलेली नाही हे दिसले. त्याबद्दल आभार. आपल्यातलेच एक असलेले कळमनुरीचे आमदार संतोषभाऊ यांनी निवडणूक जिंकण्यासाठी नुकतीच एक क्रांतिकारी कल्पना जन्माला घातली. ती नेमकी कशी राबवायची हे समजून घेण्यासाठी व त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगरीत जमलोत. अतिशय धडाडीचे, कर्तबगार, कार्यकुशल, कार्यसम्राट म्हणून राज्यभरात ओळख निर्माण करणारे संतोषभाऊ कल्पकही आहेत हे यातून दिसून आले. त्यामुळे आता जास्त वेळ न दवडता मी भाऊंना त्यांच्या कल्पना विस्तारासाठी आमंत्रित करतो.’ हे ऐकताच भाऊ अंगावर लपेटलेली भगवी शाल सावरत दोन्ही हात जोडून सर्वांना नमस्कार करत ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतात. ‘औंढा नागनाथजवळच्या ‘लाख’ गावातील शाळेत मी मांडलेल्या कल्पनेला प्रसिद्धी मिळाल्यापासून राज्यभरातील शेकडो विद्यार्थ्यांचे फोन मला येत आहेत.
हेही वाचा >>> चिप-चरित्र : शीतयुद्धाचे लाभार्थी
आमच्या शाळेत येऊन हेच आवाहन करा, असे या सर्वांचे म्हणणे. तुम्हाला सांगतो, विश्वगुरूंची ‘परीक्षा पे चर्चा’ ऐकल्यावर माझा हा विचार बळावला. तसा आपला परीक्षेशी सध्यातरी काही संबंध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांशी आडवळणाने संवाद साधण्यापेक्षा थेट ‘मत की बात’ केली तर काय वाईट असा विचार मनात आला. विद्यार्थी हे प्रत्येक पालकासाठी जीव की प्राण असतात. त्यांच्या हट्टासमोर त्यांना झुकावेच लागते. त्यामुळे ते दोन दिवस उपाशी राहिले की मतदार पालक वठणीवर येतात. मी ‘त्या’ शाळेत आवाहन करताच दुसऱ्या दिवशी मला अनेक पालकांचे फोन आले. आम्ही मुलाला उपाशी ठेवू शकत नाही, त्यामुळे आमचे मत पक्के समजा असाच साऱ्यांचा सूर होता. मोदी पंतप्रधान होतील त्यामुळे तुम्ही भरचौकात फाशी लावून घेऊ नका असेही मला पालकांनी विनवले. विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर करू नये असा आयोगाचा नियम असल्याचे काहींनी मला सांगितले. पण आयोगाच्या कारवाईची चिंता आपण करायची नाही. सारे काही निभावून नेले जाते, हे तुम्ही सातत्याने अनुभवत आहातच. (प्रचंड हंशा) विद्यार्थीसुद्धा भविष्यातील मतदार आहेत. सत्ता आपली असल्याने प्रशासनातील कुणीही आक्षेप घेणार नाही. कुणी शहाणपणा केला तर त्याला सरळ कसे करायचे हे तुम्हाला ठाऊक आहेच. धन्यवाद!’ नंतर प्रचंड टाळ्यांच्या गजरात भाऊंचा सत्कार होतो. तेवढ्यात बाहेरून निषेधाचे आवाज येऊ लागतात. चौकशीअंती कळते की विरोधकप्रणीत एका शिक्षक संघटनेने लघुमोर्चा आणलाय. त्यात सहभागी असलेल्या शिक्षकांची नावे टिपून घ्या, असे आदेश साहाय्यकांना देत सर्व आमदार शाळाभेटीसाठी रवाना होतात.