संयुक्त राष्ट्र संघाच्या १९ जून २०२४ च्या आमसभेत २०२५ हे ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला गेला. आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने (इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स) दिल्ली येथे २५ ते ३० नोव्हेंबर २०२४ या काळात आयोजित केलेल्या जागतिक परिषदेत तशी रीतसर घोषणा केली व त्याचे बोधचिन्ह प्रकाशित करण्यात आले. या वर्षाच्या उद्घाटनानिमित्त येत्या शुक्रवारी मुंबईत ‘सहकार से समृद्धी’ हा सोहळा आयोजति करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित करण्याची ही दुसरी वेळ आहे. प्रथम २०१२ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून साजरे केले गेले. आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने या वर्षासाठी ‘सहकाराच्या माध्यमातून उत्तम विश्वाची बांधणी’ हे ब्रीदवाक्य निश्चित केले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने २०३० सालापर्यंत शाश्वत विकासाची १७ उद्दिष्टे पूर्णत्वास नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी सहकार क्षेत्राची भूमिका निश्चितच सहाय्यभूत ठरेल यात शंका नाही. सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी सहकार क्षेत्राच्या योगदानाला प्रोत्साहन देऊन, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करणे नक्कीच संयुक्तिक ठरणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासासाठी कोणती उद्दिष्ट निश्चित केली आहेत, त्याची माहिती थोडक्यात घेऊ या…

हेही वाचा : तंत्रकारण : तंत्राधिष्ठित शिवनीती

१. गरिबी नष्ट करणे. (No Poverty) सर्वदूर, सर्व स्तरांतून व सर्व प्रकारची गरिबी नष्ट करणे.

२. भूक मिटवणे. ( Zero Hunger) कोणीही व्यक्ती उपाशी राहता कामा नये या हेतूने पुरेसा अन्नसाठा करणे, अन्नधान्यातील पोषकता वाढविणे व शाश्वत शेतीसाठी प्रोत्साहन देणे.

३. चांगले आरोग्य व जीवनमान. (Good Health & Well- being) सर्व स्तरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहावे. सर्व स्तरांतील व सर्व वयोगटांतील व्यक्तींना चांगले जीवनमान मिळावे.

४. दर्जेदार शिक्षण. ( Quality Education) सर्वसमावेशक व दर्जेदार शिक्षण सर्वांना मिळावे. सर्व स्तरांतील व सर्व वयोगटांतील व्यक्तींना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी. शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे.

५. लैंगिक समानता. ( Gender Equality) स्त्री – पुरुष हा भेदाभेद नष्ट व्हावा. स्त्री – पुरुष समानता असावी, समान अधिकार असावेत. मुलींना – महिलांना सबल / सक्षम करण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

६. स्वच्छ पाणी व स्वच्छता यंत्रणा. (Clean Water & Sanitization) सर्वांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध व्हावे. त्याचप्रमाणे सर्वदूर – सर्व शहरे तसेच गावांतील स्वच्छता यंत्रणा सुसज्ज असावी.

७. परवडणारी व स्वच्छ ऊर्जा. (Affordable & clean Energy) सर्वांना स्वच्छ, अपारंपरिक, आधुनिक व परवडणारी ऊर्जा सतत – अखंडपणे उपलब्ध व्हावी.

८. रोजगार निर्मिती व आर्थिक विकास. (Decent work & Economic Growth) शाश्वत व सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी प्रोत्साहन देणे. त्याचप्रमाणे सर्वांना रोजगार उपलब्ध व्हावा व उत्पादकता वाढावी यासाठी प्रयत्न करणे.

९. नावीन्यपूर्ण उद्याोग व पायाभूत सुविधा. (Industry Innovation & Infrastructure) सर्वसमावेशक व शाश्वत उद्याोग उभारताना त्यात नावीन्य व आधुनिकता आणणे. पायाभूत सुविधा निर्माण करताना संवेदनक्षमता जपणे, त्यामध्ये लवचीकता आणणे.

१०. असमानता कमी करणे. (Reduced Inequalities) देशांमधील व देशांतर्गत असमानता कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहणे.

११. शाश्वत शहरांची व समुदायांची निर्मिती. (Sustainable Cities & Communities) सर्व समाज घटक गुण्यागोविंदाने व सुरक्षितपणे राहतील अशा शाश्वत शहरांची निर्मिती करणे.

१२. वस्तूंचे उत्पादन व त्यांचा वापर. (Responsible Consumption & Production) वस्तूंचे उत्पादन व त्याचा होत असलेला वापर यामध्ये योग्य समतोल साधणारा आकृतिबंध निर्माण करणे.

१३. वातावरण. (Climate Action) वातावरणात होणाऱ्या प्रतिकूल बदलांची नोंद घेणे व त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत त्वरित उपाययोजना / कारवाई करणे.

हेही वाचा : अन्वयार्थ : ‘टिकटॉक’ची टिकटिक!

१४. जलचरांचे जीवन. ( Life Under Water) जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका उत्पन्न न करता समुद्र, समुद्र किनारा, नद्यांचा वापर शाश्वत विकासासाठी करणे.

१५. वन्यजीव. (Life on Land) पृथ्वीवरील सर्व सजीवांचे रक्षण करणे, वनांचे / जंगलांचे संरक्षण करणे, जमिनीची धूप थांबविण्यासाठी उपाययोजना व जैवविविधतेचा ऱ्हास थांबविणे.

१६. शांती, न्याय आणि मजबूत संस्था. (Peace, Justice & Strong Institutions) शांतीप्रिय समाज घडविण्यासाठी, सर्वसमावेशक शाश्वत विकास व्हावा यासाठी प्रोत्साहन देणे. सर्वांना न्याय मिळण्यासाठी सर्व स्तरांवर नि:ष्पक्ष, जबाबदार संस्थांची निर्मिती करणे.

१७. उद्दिष्टपूर्तीसाठी भागीदारी. ( Partnerships for the Goals) शाश्वत विकासासाठी व निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जागतिक स्तरावर भागिदारी करणे / सहयोग करणे.

ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने (international cooperative alliance) पुढील मार्गांचा अवलंब करण्याचे योजले आहे.

(१) शाश्वत विकासात सहकारी चळवळीच्या सहभागाबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे, तसेच सहकारी क्षेत्राच्या कामकाजास योग्य ती प्रसिद्धी देणे.

(२) सहकारी चळवळीच्या विकासासाठी व वाढीसाठी माहितीची देवाणघेवाण, आकलन क्षमता वाढीसाठी प्रयत्न आणि सहयोगी संस्थांबरोबर भागीदारी.

(३) सहकारी उद्याोजकीय परिसंस्था मजबूत करण्यासाठी कायदेशीर व धोरणात्मक मार्गदर्शन करणे. प्रोत्साहन देणे, त्याचप्रमाणे व्यवसायास पोषक वातावरण निर्माण करणे.

हेही वाचा : तर्कतीर्थ विचार : जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व

(४) तरुणांना सहकारी चळवळीत काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे व चांगल्या विश्वाच्या उभारणीसाठी सहकारी चळवळीची उपयुक्तता सिद्ध करणे.

आपल्या देशाचा विचार केला आणि सहकारी चळवळीची परंपरा विचारात घेतली तर, उपरोक्त उद्दिष्टे पूर्णत्वास नेण्यासाठी सहकारी चळवळ निश्चितच उपयोगी ठरेल. या चळवळीने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रवेश केला आहे. सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, सहकारी शिक्षण संस्था, सहकारी बँका, पतसंस्था, सहनिवास संस्था, पाणीपुरवठा संस्था, ग्राहक भांडार, मच्छीमार संस्था, सहकारी शेती, मजूर संस्था इत्यादी अनेक प्रकारच्या सहकारी संस्था कार्यरत आहेत. यावरून सहकारी चळवळीची व्यापकता, तसेच ग्रामीण व शहरी भागांशी असलेले नाते लक्षात येईल. यातील अनेक क्षेत्रांतील संस्था यशस्वी ठरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षानिमित्त या प्रत्येक प्रकारच्या संस्थांना आपापल्या क्षेत्रात विशेष ठसा उमटेल असे उपक्रम राबविण्याची सुसंधी प्राप्त झाली आहे.

आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी बँका व पतसंस्थांनी आपापसातील निकोप स्पर्धा जपतच, सहकार कसा वाढवता येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे. मग ते सहकार्य कर्ज वाटपातील सहभाग कर्जाचे असेल, कर्ज वसुलीतील असेल वा व्यवस्थापनातील वैचारिक देवाणघेवाण असेल. त्याचप्रमाणे, या वर्षात, आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी, आर्थिक निरक्षरता दूर करण्यासाठी, या संस्थांनी पुढाकार घेऊन अधिक प्रभावीपणे काम करणे गरजेचे आहे.

सहकारी सहनिवास म्हणजेच हाउसिंग सोसायट्यांमधील रहिवाशांनी आपल्याला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी सहकारी ग्राहक संस्थांमधून करण्यास प्राधान्य द्यावे. आज शहरात तांत्रिक कौशल्य जाणणाऱ्या व्यक्तींचा तुटवडा जाणवतो. उदा. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, ड्रायव्हर इ. अशी विविध कौशल्ये अंगीकारलेल्या व्यक्तींची सेवा सहकारी संस्था सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागांत विविध संगणकीय कौशल्ये जाणणाऱ्या व्यक्तींच्या, ते ज्ञान इतरांना उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक संस्था सुरू करता येतील. आज ग्रामीण भागात शेतीसाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवते, त्यासाठी सहकारी शेतीचे प्रयोग पुन्हा करून बघण्यास प्रत्यवाय नसावा. ही काही वानगीदाखल उदाहरणे दिली आहेत.

हेही वाचा : लोकमानस : विलंब, नाराजीनाट्यांची मालिका

आजारी सहकारी संस्थांचे पुनर्वसन, तसेच सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणाचे उद्दिष्ट या वर्षात ठेवले पाहिजे. सहकारी चळवळीच्या संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीकडे अधिक लक्ष देणे हे उद्दिष्ट असले पाहिजे. उपरोक्त संकल्पनांच्या आधारे, संयुक्त राष्ट्र संघाने निश्चित केलेली शाश्वत विकासाची १७ उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सर्व सहकारी कार्यकर्ते तसेच सहकारी संस्था प्रयत्नशील राहतील व आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष अर्थपूर्ण रीतीने साजरे करतील असा विश्वास वाटतो.

उदय पेंडसे

सहकार क्षेत्राचे अभ्यासक

pendseuday@gmail.com

Story img Loader