ही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. एका जवळच्या नातेवाईकावर शस्त्रक्रिया करायची होती. अगदीच साधी. पूर्वी टॉन्सिल वगैरे व्हायच्या तशी काहीशी. आणीबाणी नसल्यामुळे या हॉस्पिटलमध्ये चौकशी कर, तिकडची माहिती घे, असं सुरू होतं. यानिमित्त एका नामांकित रुग्णालयात गेलो. म्हटलं चौकशी तर करावी. पंचतारांकित हॉटेलच्या स्वागतकक्षात कमावलेलं सौंदर्य घेऊन बसलेल्या असतात तशा एका बाईनं अमेरिकी हेलकाव्यांच्या इंग्रजीत स्वागत केलं. तिला सांगितलं कशासाठी आलोय ते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यावर बाई लडिवाळ इंग्रजीत म्हणाल्या खर्च अंदाजे दहा लाख रुपये होईल.

या बाईंनी ‘अल्सर’ऐवजी कॅन्सर असं काही ऐकलं की काय, असं वाटून गेलं. मी खुलासा केला. पण तसं काही नव्हतं. त्यांनी बरोबर ऐकलेलं होतं आणि खर्चाचा अंदाज दिला त्यातही काही चूक नव्हती. खर्च ऐकून धक्का बसलेलं पाहायला सरावलेल्या असणार बाई. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जराही बदलले नाहीत. चक्कर आलेल्याला पाणी वगैरे कसं विचारतात तसं त्यांनी त्यावर ‘मेडिक्लेम’ आहे का… वगैरे चौकशी केली. मेडिक्लेम होतं. ते ऐकल्यावर त्यांच्या नजरेतले बिचारेपणाचे भाव नाहीसे झाले. म्हणजे नाही तर ‘‘…काय वेळ आलीये… बिच्चाऱ्यांकडे मेडिक्लेमही नाही’’, असं काहीसं त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं असतं. तसं झालं नाही. मेडिक्लेम आहे म्हटल्यावर त्या म्हणाल्या ‘‘…मग काही करता नाही येणार…! नसतं तर पाच-दहा हजार रुपये कमी करण्याचा विचार केला असता. आता त्याची काही गरज नाही.’’

हेही वाचा : ‘सुवर्णमार्गा’चा झळाळता इतिहास

हे आता सवयीचं झालं आहे. तेव्हा हे कानाला विचित्र वाटलं. मेडिक्लेम आहे किंवा नाही यावर शस्त्रक्रियेचा खर्च कसा काय ठरणार? सगळी भीडभाड बाजूला ठेवून त्यांना मी शेवटी हे विचारलं. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर हावभावासकट आजही लक्षात आहे.

‘‘दो वुई रन हॉस्पिटल, वुई आर नॉट इन्टु हेल्थ बिझनेस… वुई आर इन्टु हॉस्पिटॅलिटी’’.

या वाक्यांमधल्या शब्दांमागे दडलेल्या अर्थाचं भाषांतर नाही होऊ शकत. त्या महिलेचे ते थंडगार उद्गार डोळे उघडणारे होते. नंतर कोणाच्या ना कोणाबाबत अशी माहिती कानावर येत गेली. मेडिक्लेम असल्यावर उपचार दर वेगळा, नसेल तर वेगळा, त्यात परत खर्च ‘वाढवून’ देणारी यंत्रणा, वाढवलेला खर्च मंजूर करवून देणारे… त्यातही कट मागणारे… असे किती प्रकार! या सगळ्यांकडनं एक बाब सतत समोर आली: विमा कंपन्या खर्च मंजूरच करत नाहीत! केला तर त्यात कपात करतात… कॅशलेस सोय असली तरी तिचा आदर होतोच असं नाही… त्यात असंख्य अटी असतात. डोळे कितीही वटारले तरी वाचता येणारच नाही अशा सूक्ष्म अक्षरात लिहिलेली अट आपल्यासमोर अशी फेकली जाते की नाइलाजच होतो आपला. आपल्या नकळत त्या अटीला आपणच मान्यता दिलेली असते. माघार घेण्याखेरीज अन्य काहीही पर्याय नसतो अशा वेळी.

अलीकडे एका माजी मंत्र्यांची भेट झाली. मंत्री होते तरी ‘तशी’ काही कमाई नव्हती. खूपच सज्जन. बऱ्याच दिवसांनी भेट झाली. म्हटलं, कुठे बाहेर होतात की काय? तसं नव्हतं. तब्येत बरी नव्हती. कानाचा काही त्रास होता. त्याबद्दल सांगताना म्हणाले… शस्रक्रिया करावी लागली. ती यशस्वी झाली. पण खर्च किती आला माहितीये? २४ लाख रुपये!

मी म्हटलं त्यापेक्षा बहिरं राहणं परवडलं! त्यांचंही तसंच मत होतं. पण उपचार करावे लागले ते ऐकायला येण्यापेक्षा त्या भागातली डोकेदुखी कमी व्हावी म्हणून. पुढे ते विमा कंपनीकडून हा खर्च मंजूर करण्यासाठी किती खटपटी कराव्या लागल्या त्याबद्दल सांगत होते.

ब्रायन थॉमसन यांची हत्या झाली आणि हे सगळं विमा-वास्तव डोळ्यापुढनं गेलं. वास्तविक हे ब्रायनसाहेब आणि आपण यात काहीही संबंध नाही. ते मारले गेले अमेरिकेत. त्यांची हत्या केली लुईग मँगन (Luigi Mangione) या उच्चविद्याविभूषित तरुणानं. आपल्याकडे कसा उच्चभ्रूंच्या पोराटोरांना ‘डून शिक्षणाचा’ पर्याय असतो; तशी अमेरिकेत ‘आयव्ही लीग’ महाविद्यालयं मानली जातात हुशार आणि श्रीमंत अशा वर्गासाठीची. तर लुईग या अशा महाविद्यालयातला. भणंग वगैरे म्हणावं तर अजिबात नाही. तरीही अशा लुईगनं या ब्रायन यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या केली. लुईग सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. हत्येनंतर तो पळाला नाही. पोलिसांहाती त्यानं सहज स्वत:ला पडू दिलं.

हेही वाचा : तिसऱ्या डोळ्याने पाहिलेले स्वप्न…

पण समस्त अमेरिकी व्यवसायविश्व या हत्येनं हादरलं. हे असं का झालं, त्यामागची कारणं काय वगैरेवर तिथल्याच नव्हे तर जगातल्या वर्तमानपत्रांतनं रकानेच्या रकाने भरून मजकूर येतोय. चॅनेल चर्चा या विषयावर झडतायत. विशेष म्हणजे आपल्याकडच्या माध्यमांनीही या हत्येची भलतीच गंभीर दखल घेतली. आपली आणि तिथली परिस्थिती काही बाबतीत कशी समान आहे; पण तरी हत्या होणं वाईट वगैरे संपादकीयं लिहिली जातायत. खरं तर एखादा खुनी जेव्हा असा प्रसिद्धीच्या झोतात येतो तेव्हा त्याच्या कृत्याविषयी एक प्रकारची घृणा निर्माण होते. निदान तशी ती व्हायला हवी. पण लुईग याच्या बाबत मात्र असं काही होताना दिसत नाही. ‘‘हत्या करणं केव्हाही वाईटच; पण…’’, असं म्हणत अनेक जण दबकत दबकत लुईगनं जे केलं ती त्याची कशी अपरिहार्यता होती अशा छापाचं काही तत्त्वज्ञान मांडताना दिसतात. आता अमेरिकेत चिंता व्यक्त होतीये ती ब्रायन यांच्या खुनापेक्षा लुईग याला मिळू लागलेल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहानुभूतीची. आणि या सहानुभूतीच्या मागून येऊ शकेल अशा नायकत्वाची. म्हणजे लुईग हा आदर्शबिदर्श ठरणार की काय? एका खुन्याचं इतकं कौतुक? या खुनाला इतकं महत्त्व का…?

कारण ब्रायन हा काही साधासुधा व्यवसायी नव्हता. तो होता ‘युनायटेड हेल्थकेअर’ या वैद्याकीय विमा कंपनीचा प्रमुख. अमेरिकेत जास्तीत जास्त विमा दावे नाकारण्यासाठी ही कंपनी अनेकदा टीकेची धनी झालेली आहे. म्हणजे वैद्याकीय बिलांचा परतावा दिलाच जात नाही, दिला तरी त्यात मोठी कपात केली जाते, बराच उशीर केला जातो आणि सगळा प्रयत्न वैद्याकीय विमा देयकाची पूर्ती कमीत कमी कशी करता येईल असा. या सर्व विमा कंपन्यांची सर्वत्रची गंमत अशी की विमा हप्ता भरायला एक दिवसाचा जरी उशीर झाला तरी त्या ग्राहकावर डाफरणार आणि स्वत:वर पैसे द्यायची वेळ येते, तेव्हा मात्र ते जास्तीत जास्त लांबवणार. ‘युनायटेड हेल्थकेअर’ ही अमेरिकेत त्यासाठी कुख्यात. त्यामुळे या कंपनीच्या विमाधारकांत तीविषयी प्रचंड नाराजी होती.

हेही वाचा : लोकमानस : बांगलादेश हे आर्थिक, सामाजिक, सामरिक आव्हान

लुईगविषयी सहानुभूती व्यक्त होतीये ती यामुळे. लुईगचा ‘युनायटेड हेल्थकेअर’वर भयंकर राग. या लबाड विमा कंपन्यांना धडा शिकवणं गरजेचं होतं…असं मत तिकडे आता व्यक्त होतंय. पण धडा शिकवणं म्हणजे थेट हत्या? आपल्याकडे याचमुळे काळजी व्यक्त होतीये. कारण अमेरिकेपेक्षा आपल्याकडे परिस्थिती किती तरी गंभीर आहे. एकतर बहुसंख्य नागरिकांकडे वैद्याकीय विमा नसतोच, असला तरी जुजबी काही तरी, किंवा किरकोळ रकमेचं कार्यालयीन वगैरे. वैद्याकीय विमा ही जाणीवच नाही. आणि ज्यांना आहे त्यांना विमा कंपन्यांचा बिलं परत मिळवतानाचा कटू अनुभव…! असा कोणी माथेफिरू आपल्याकडे निपजू नये म्हणजे मिळवलं, अशीच सर्वांची इच्छा!

आपल्याकडे हिंदी चित्रपटात एक टुकार संवाद असायचा पूर्वी गंभीर रुग्णाबाबत. ‘‘अब इन्हे दवा की नही, दुुआ की जरूरत है’’… वैद्याकीय विमा कंपन्यांचं वास्तव पाहिलं की रुग्णांसाठी दवा वा दुव्यापेक्षा आपल्या विमा दाव्यांचं काय होणार ही चिंता अधिक प्राणघातक ठरतेय. विमा कंपन्यांसाठीही ती तितकीच जीवघेणी ठरू शकते हे लुईगची कृती दाखवून देते.

girish.kuber@expressindia.com

X – @girishkuber

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unitedhealthcare ceo brian thompson killed by luigi mangione health insurance claim delay similar situation in india css