‘अदृश्य राहून जगा’ — एपिक्युरस

प्रत्यक्ष वेदनांपेक्षा माणसाला वेदनांच्या विचारांची अधिक भीती असते. दु:खं मानसिक असतात आणि वेदना शारीरिक. फ्रेंच तत्त्वज्ञ ऑन्द्रे कोंत स्पोनव्हिल म्हणतो की मानसिक दु:खं वजा करता आली तर शारीरिक वेदना हाताळता येतात. पण मानसिक दु:खांमुळे माणूस प्राप्त क्षणात क्वचितच जगत असतो. भूतकाळाच्या ओझ्यानं, भविष्याच्या चिंतेनं, विशेषकरून मृत्यूच्या विचारानं तो मानसिक गोष्टींत अधिक विखुरलेला असतो. त्यामुळे वर्तमानकाळाचं आनंददायी वास्तव समजण्यासाठी तो असमर्थ ठरतो. पण दु:ख आणि वेदना यातील फरक कसा ओळखायचा? शारीरिक वेदनांचा स्वीकार करत मानसिक दु:खांपासून मुक्ती कशी मिळवायची? प्राप्त क्षणाचा आनंद कसा घ्यायचा? भांडवलवादी सुखवादाचे ‘तज्ज्ज्ञ’ सांगतात तसं ‘कार्पे डिएम’ (carpe diem) चा जप करणं पुरेसं आहे का?

कार्पे डिएम’ची एपिक्युरिअन मुळं

‘कार्पे डिएम’चा अर्थ उद्याची फिकीर न करता प्राप्त क्षणाचा आनंद घेणं असा होतो. खरंतर, आजच्या काळात ‘कार्पे डिएम’ हा मंत्र भांडवलवादी सुखवादाचा द्याोतक झालेला आहे. सेलिब्रिटींच्या शरीरावर ‘कार्पे डिएम’ चा टॅटू कोरलेला आढळतो. त्यांचे अनुकरण करणारे फॉलोअर्स सोशल मीडियावरल्या बायोमध्ये हा जीवनमंत्र लिहून त्यांची वांच्छित सुखवादी जीवनशैली अधोरेखित करतात. थोडक्यात, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, ‘लाइफ कोचिंग’सारख्या भांडवलवादी सुखवादाच्या व्यापारात ‘कार्पे डिएम’ हा मंत्र वापरला जातो. आजच्या काळातल्या विचारशून्य भोगवादाची वस्तू बनलेल्या या मंत्राची मुळं मात्र प्राचीन ग्रीक परंपरेतील एपिक्युरस नावाच्या एका महत्त्वाच्या तत्त्वज्ञानात आहेत.

खरंतर, आजच्या घडीला एपिक्युरस या नावाचा वापर विपर्यस्तपणे भांडवली भोगवाद सूचित करण्यासाठी केला जातो. फाइव्ह स्टार सुखसुविधांयुक्त जीवनशैलीचा निर्देश करण्यासाठी ‘एपिक्यूर’ हे फ्रेंच नाव वापरलं जातं (उदा.- ‘ताज एपिक्यूर’ रिवॉर्ड प्रोग्राम). खरंतर, एपिक्युरिअन जीवनदृष्टी भांडवलवादी मूल्यांना छेद देणारी आहे. ती एका विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीचं अपत्य आहे. एपिक्युरिअन तत्त्वज्ञान एका विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीला दिलेला अस्तित्ववादी प्रतिसाद आहे. एपिक्युरिअन तत्त्वज्ञानाचा उदय इ.स.पू. चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात आणि तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीला ग्रीसमधल्या ऐतिहासिक स्थित्यंतराच्या काळात झाला. एपिक्युरस या तत्त्ववेत्त्याच्या सामाजिक पार्श्वभूमीविषयी चर्चा करूच, पण तत्कालीन सामाजिक, राजकीय संदर्भाचा विचार केल्याशिवाय या तत्त्वज्ञानाचं स्वरूप उमगणार नाही.

वैश्विकता आणि सार्वकालिकता ही तत्त्वज्ञानाची मूलभूत लक्षणं असली तरी प्रत्येक तत्त्वज्ञान हे विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीचं आणि सामाजिक पार्श्वभूमीचं अपत्य असतं. त्यामुळे आधुनिक तत्त्वज्ञानात तत्त्ववेत्त्याचं भौतिक लोकेशन अधोरेखित करणं महत्त्वाचं समजलं जातं. तत्त्वज्ञान ऐतिहासिक असतात. तत्त्वज्ञानाची मुळं आणि शेंडा इतिहासाबाहेर जात असतील तर ते धार्मिक श्रद्धा ठरतात. दुसऱ्या बाजूला, तत्त्वज्ञान विशिष्ट परिस्थितीत निर्माण होत असलं तरी ते मूलभूत मानवी प्रश्नांना स्पर्श करणारं असतं. एपिक्युरिअन तत्त्वज्ञान तत्कालीन ऐतिहासिक परिस्थिती प्रतिबिंबित करतं; पण त्यासोबतच मूलभूत मानवी प्रश्नांनाही स्पर्श करतं.

अलेक्झांडरचा तत्त्वज्ञानात्मक उतारा

एपिक्युरसचा (इ.पू.३४१-२७०) जन्म अथेन्सपासून लांब टर्कीच्या पश्चिमेला स्थित सामोस नावाच्या बेटावर कष्टकरी कुटुंबात झाला. एपिक्युरसचे आई वडील मूळचे अथेन्सचे; पण उपजीविकेसाठी या बेटावर आले. त्या काळी अर्थात इ. पू. चौथ्या आणि तिसऱ्या शतकाच्या सांध्यावरल्या ग्रीसमध्ये मोठी ऐतिहासिक स्थित्यंतरं घडली. अथेन्सचा राजकीय दबदबा, आर्थिक सुबत्ता आणि सांस्कृतिक प्रतिष्ठा कधीच इतिहासजमा होऊन, इतर ग्रीक शहरराज्यांप्रमाणे अथेन्सही उत्तरेकडल्या अप्रगत मानल्या जाणाऱ्या मॅसिडोनियाचा राजा दुसरा फिलिप याच्या अधिपत्याखाली आलं. त्याच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्याचा मुलगा अलेक्झांडरच्या हाती सत्ता जाते. हा अलेक्झांडर – ‘सिकंदर’ अल्पावधीतच बलाढ्य पर्शियन साम्राज्य पादाक्रांत करून चिनाब नदीच्या खोऱ्यापर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार करतो. जुन्या जगाला मोडीत काढून अलेक्झांडरचा मॅसिडोनियन झंझावात वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी इ.स.पू. ३२३ मध्ये शांत होतं. ज्या वेगानं ‘जगज्जेता’ अलेक्झांडरनं विशाल ग्रीक साम्राज्य उभं केलं होतं ते त्याच्या मृत्यूनंतर त्यापेक्षा अधिक वेगानं कोसळतं. ग्रीक साम्राज्याचं विघटन होऊन अनेक तुकडे होतात. अलेक्झांडरच्या मृतदेहासाठी देखील त्याच्या वारसदारांमध्ये यादवी सुरू होते.

अलेक्झांडरच्या मृत्यूसमयी एपिक्युरस फक्त अठरा वर्षाचा होता. अथेन्सची वाताहत आणि अलेक्झांडरचा चमत्कारिक उदय आणि अस्त त्याच्या डोळ्यांसमोर होता. ग्रीससाठी हा काळ यादवी, अराजकता, सामाजिक तणाव, हतबलता, अगतिकतेचा होता. या संकटग्रस्त परिस्थितीची झळ सर्वसामान्यांनाच बसली; त्यापैकी एक एपिक्युरसचं कुटुंब. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर या कुटुंबाची सामोसमधून हकालपट्टी होऊन त्यांना वणवण भटकावं लागतं. थोडक्यात, हा काळ एकूणच ग्रीक मनासाठी असह्य ठरतो. माणूस आणि सभोवतालचं जग यातील राजकीय, सामाजिक आणि ज्ञानात्मक नातं जणू संपुष्टात येतं. आदर्श राज्यसंस्थेविषयीचं प्लेटोचं उच्चभ्रू तत्त्वज्ञान आणि अॅरिस्टॉटलचं प्रयोजनवादी तत्त्वज्ञान जनसामान्यांची सांत्वना करायला असमर्थ ठरतं. त्याकाळी राज्यसंस्था म्हणजे केवळ सत्तापिपासू उच्चभ्रू वर्गाचं बाहुलं झालेलं असतं ज्यामुळे सर्वसामान्य केवळ वापरले आणि भरडले जातात. अशा परिस्थितीत एपिक्युरस आपल्या अनोख्या तत्त्वज्ञानाची मांडणी करतो.

अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर एपिक्युरस तब्बल ५३ वर्षं जगला. अलेक्झांडर साम्राज्यवादाचं आणि अमर्याद महत्त्वाकांक्षेचं प्रतीक; तर एपिक्युरसच्या दृष्टीनं इतरांवर सत्ता गाजवण्याची इच्छा आणि महत्त्वाकांक्षा मानवी सुखाचे शत्रू ठरतात. त्याअर्थी एपिक्युरस अलेक्झांडरचा तत्त्वज्ञानात्मक उतारा ठरतो. अलेक्झांडरसारखं जगाचे डोळे दिपवण्याच्या अट्टहासात खरं सुख नसून सुखी जगायचं असेल तर ‘अदृश्य राहून जीवन जगा’, असा कानमंत्र एपिक्युरस देतो. एपिक्युरसच्या दृष्टीनं राज्यसंस्था, खासगी संपत्ती, प्रसिद्धीचा प्रकाशझोत, दिखाऊपणा सारख्या गोष्टी मनाच्या शांतीसाठी आणि खऱ्या सुखासाठी अडथळे ठरतात.

महत्त्वाची बाब म्हणजे अलेक्झांडरकडे १९व्या शतकात चिद्वादी हेगेल वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. हेगेलनुसार अलेक्झांडर म्हणजे अदृश्य अशा ऐतिहासिक शक्तीचं अपरिहार्य प्रकटीकरण. जणूकाही इतिहासाचा आत्मा (zeitgeist) अलेक्झांडर आणि नेपोलियन सारख्या विलक्षण लोकांमार्फत ऐतिहासिक कृती करून घेतो.

एपिक्युरसचा समतावादी बगीचा

सभोवतालची परिस्थिती कितीही नरकासारखी असली तरी माणूस जगायचं सोडत नसतो. माणसाची जगण्याची इच्छाशक्ती शक्यतोवर पुरून उरते. तत्कालीन अराजकतेच्या, असुरक्षिततेच्या, हतबलतेच्या आणि अगतिकतेच्या वातावरणात माणसाला स्वत:च्या मनाची गुहा करून तिथंच युटोपिया निर्माण करणं क्रमप्राप्त ठरतं. मात्र एपिक्युरस निराशावादी गुहेऐवजी सुखवादी ‘बाग’ सजवतो आणि फुलवतो. त्यामुळे ‘एपिक्युरसची बाग’ प्लेटोच्या विषमतावादी रिपब्लिकचा समतावादी पर्याय समजला जातो. गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, देशी-विदेशी, लहान-मोठे असा कुठलाही भेद न करता त्याच्या बागेत सगळ्यांना प्रवेश असतो. एपिक्युरसनुसार तत्त्वज्ञानासाठी प्रत्येक वय हे योग्य वय असतं. कारण तत्त्वज्ञानाचा संबंध तो सरळसरळ निरोगी आणि सुखी जीवनाशी लावतो. तो म्हणतो, For no age is too early or too late for the health of the soul. And to say that the season for studying philosophy has not yet come, or that it is past and gone, is like saying that the season for happiness is not yet or that it is now no more.

थोडक्यात, एपिक्युरस अवास्तव आणि अकारण दु:खं बाजूला सारून, वेदनांचं व्यवस्थापन करून जीवनाचं उत्सवात रूपांतर कसं करावं हे सुखवादी नीतिशास्त्र मांडतो. सुखवाद मनुष्याची सहजप्रवृत्ती समजली जाते; त्यामुळे निवडकपणे फक्त त्याचं सुखवादी नीतिशास्त्र अनेकांना आकर्षित करतं. पण सुखवादी जीवनशैलीपर्यंत एपिक्युरस का आणि कसा पोहोचला हे बहुधा दुर्लक्षित केलं जातं. एपिक्युरिअन सुखवादाला त्याच्या सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीपासून वेगळं करून पाहता येत नाही. त्याचं सुखवादी नीतिशास्त्र त्याच्या निखळ भौतिकवादी, अनुभववादी, ईहवादी, निसर्गवादी तत्त्वज्ञानावार आधारित आहे.

एका बाजूला, एपिक्युरसची ईहवादी, भौतिकवादी जीवनदृष्टी, अनुभवादी ज्ञानमीमांसा आणि सुखवादी नीतिशास्त्र प्लेटोच्या चिद्वादावर, पुढे ख्रिास्ती धर्माच्या मुळांवर घाव घालणारं ठरलं. त्यामुळे युरोपमध्ये कॅथोलिक चर्चची सत्ता प्रस्थापित झाल्यावर एपिक्युरिअन तत्त्वज्ञानाचा संपूर्ण नायनाट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. पाचव्या शतकातील ख्रिास्ती धर्म-शिरोमणी ऑगस्टिन तर खात्रीनं सांगतो की, एकही एपिक्युरिअन विचार वानगीदाखलही शिल्लक ठेवला नाही. दुसऱ्या बाजूला मात्र लुक्रेशिअस नावाच्या रोमन शिष्याने एपिक्युरिअन तत्त्वज्ञानाला काव्यात्मक स्वरूप प्राप्त करून दिलं. विशेषकरून उच्चभ्रू रोमन लोकांच्या मनावर या भौतिकवादी आणि सुखवादी जीवनदृष्टीनं तब्बल ७०० वर्षं राज्य केलं.

मध्ययुगात एपिक्युरिअन तत्त्वज्ञानाला पुसून टाकण्याच्या प्रयत्नानंतर जवळपास हजार वर्षांनी पाश्चात्त्य आधुनिकतेच्या प्रक्रियेत इरास्मुस, मिशेल द मोंतेन्य, गॅसंडि, मोलिएर, दिदरो सारख्यांच्या लिखाणात एपिक्युरिअन तत्त्वज्ञानाचे वेगवेगळे पैलू पुन्हा डोकं वर काढतात. लक्षणीय बाब म्हणजे १९व्या शतकात कार्ल मार्क्सचा पीएचडीचा विषय डिमॉक्रिटस आणि एपिक्युरस होते. मार्क्सला एपिक्युरसच्या भौतिकवादात, ईहवादात आणि अनुभवादात त्याच्या क्रांतिकारक तत्त्वज्ञानाची मुळं दिसतात. एपिक्युरिअन तत्त्वज्ञानाविषयीच्या या दोन टोकाच्या प्रतिमा समजून घेण्यासाठी पुढल्या लेखात एपिक्युरसच्या तत्त्वज्ञानातल्या भौतिकवादी, ईहवादी, अनुभवादी, सुखवादी आणि निसर्गवादी पैलूंची सूत्रबद्ध चर्चा केली जाईल.