पृथ्वीच्या स्थिर रंगमंचावर इतिहासातील पात्रे येतात व जातात, ही केवळ कल्पना आहे. प्रत्यक्षात धरती ही स्वत:च एक फिरता रंगमंच आहे. यावरील खंड, पर्वत, नद्या, समुद्र ही नेपथ्यरचना अव्याहत बदलत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतिहास हे पृथ्वीच्या रंगमंचावर अव्याहत चालू असलेले महानाट्य आहे असे मानले, तर पृथ्वी ही या महानाट्याची नेपथ्यरचना आहे. तिच्यावरील खंडांच्या निर्मितीची कथाही मानवी इतिहासाएवढीच नाट्यमय आहे.

प्राचीन काळापासून पर्वत हे स्थिर व अचल आहेत असे मानले गेले. भारतात त्यांची नावेही हिमाचल, विंध्याचल अशी होती. अर्थातच जिच्यावर हे पर्वत उभे आहेत ती भूमी तर सर्वात ‘जड’ व स्थिर आहे असे मानले जाई. उदाहरणार्थ अथर्ववेदातील भूमीसूक्तात ‘भूमी ही ध्रुवाप्रमाणे स्थिर आणि इंद्राद्वारे संरक्षित असून तिचा पाया अक्षत, अतूट आणि अविजित आहे’ असे म्हटले आहे. (ध्रुवां भूमिं पृथिवीमिन्द्रगुप्ताम् । अजितेsहतो अक्षतोsध्यष्ठां पृथिवीमहम्। )

बायबलमध्येही ‘भूमी स्थिर व मजबूत पायावर उभी केलेली असून तिला कधीही हलवले जाऊ शकत नाही’, असे म्हटले आहे.

हेही वाचा >>> लेख: त्यांनी ताकदीचे ‘असे’ प्रदर्शन का घडवले असेल?

पण ३०० वर्षांपूर्वी या कल्पनेला धक्के बसण्यास सुरवात झाली. १७ व्या शतकात इटलीतील एक राजवैद्या निकोलस स्टेनो यांनी फ्लोरेन्सजवळील डोंगरावर खडकांच्या थरात सागरी जीवांचे जीवाश्म पाहिले. पण त्यांच्या निरीक्षणाची कुणी नोंद घेतली नाही. पुढे १०० वर्षे गेली. जेम्स हटन हे स्कॉटिश भूवैज्ञानिक भूशास्त्राचे जनक मानले जातात. त्यांनी १७८८ मध्ये स्कॉटलंडमध्ये सिकार इथे आणि उत्तर समुद्रात सागरकिनारी स्तरित खडकांचे उभे थर पाहिले. त्यावरून पूर्वी सागरतळाशी असलेले हे खडक पुढे उभ्या हालचाली होऊन उभे वर उचलले गेले, असा निष्कर्ष त्यांनी काढला.

पुढे विविध सर्वेक्षणांतून आल्प्स पर्वतात व इतरत्र भूकवचाला असलेल्या खोल भेगा, विभंग आणि वळ्या (घड्या) दिसून आल्या. त्यावरून भूकवच केवळ उभेच उचलले जाते किंवा खचते असे नाही, तर ते आडवेदेखील तुटते, फाटते, त्याला घड्या पडतात, हे स्पष्ट झाले.

या सर्व पार्श्वभूमीवर १९१२ मध्ये वेजेनर यांचा ‘खंडनिर्मितीचा सिद्धांत’ पुढे आला. त्याची कल्पना त्यांना पृथ्वीवरील खंडांचे आकार पाहून सुचली. कधीतरी तुमच्याही लक्षात आले असेल की, जगाच्या नकाशात खंडांचे समोरासमोरचे किनारे एकमेकांशी बरोबर जुळतात. उदाहरणार्थ, दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलचा पूर्वेकडील कोपरा, आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याशी बरोबर जुळतो. युरोपच्या पश्चिमेचा स्पेन पोर्तुगाल इ. भाग मेक्सिकोच्या आखाताशी बरोबर जुळतो.

यावरूनच वेजेनर यांनी खंडनिर्मितीचा ‘भूखंड अपवहन सिद्धांत’ मांडला. अर्थात त्यांचा सिद्धांत केवळ खंडांचे किनारे एकमेकांना जुळतात यावरच आधारित नव्हता. तर त्याला इतर काही शोधांची पार्श्वभूमी होती. जसे की खंड हे महासागरांनी विभागलेले असूनही सर्व खंडात विशिष्ट खडकांचे समान थर किंवा काही समान जीवाश्म – प्राणी वनस्पतींचे अवशेष – आढळतात. यावरून कधीतरी सर्वच खंड एकमेकांना जोडून होते व नंतर कोट्यवधी वर्षांत ते एकमेकांपासून दूर झाले, असे मत वेजेनर यांनी मांडले. नंतर अधिक निरीक्षणे व अभ्यास यांच्या आधारे १९१५, १९२४ व १९२६ मध्ये हा सिद्धांत अधिकाधिक पुराव्यांच्या आधारावर उभा करण्याचा प्रयत्न वेजेनर यांनी केला. पण तरी तो मानले जाऊन तो वारंवार फेटाळला गेला. खंडे आपली जागा सोडून भरकटतात हे वेजेनर यांच्या हयातीत मान्य झालेच नाही.

पुढे १९६० च्या दशकात खडकातील स्फटिकांच्या चुंबकीय गुणधर्मावरून भूतकाळात त्याचे स्थलांतर व दिशाबद्दल कसा कसा झाला हे ओळखता येऊ लागले. आणि त्यावरून वेजेनर यांचेच म्हणणे खरे असल्याचे त्यांच्या मृत्यूनंतर ३० वर्षांनी सिद्ध झाले.

पुढे संशोधन व पुरावे यातून वेजेनर यांच्या मूळ सिद्धांतात भर पडत त्याला आजचे स्वरूप प्राप्त झाले. आज हा सिद्धांत ‘प्लेट टॅक्टोनिक्स’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्यानुसार पृथ्वीचा पृष्ठभाग आठ तुकड्यात विभागला गेला असून त्यांना ‘प्लेट्स’ असे म्हणतात. भूकवचाखाली खोलवर असणाऱ्या अॅस्थिनोस्पीअर नावाच्या द्रव थरावर या आठ प्लेट तरंगत असतात. असे तरंगताना त्या प्लेट्स त्यांच्यावरील खंडप्रदेश, पर्वत, समुद्र, नद्या यासह एकमेकांपासून दूर जातात किंवा एकमेकांवर आदळतात. ही प्रक्रिया अतिशय मंद गतीने होत असली तरी त्यातून निर्माण होणारा दाब व ताण प्रचंड असतो. त्यामुळे प्लेट्स दूर जातात तेव्हा मध्ये भू-कवचाला भेगा पडून खचदऱ्या तयार होतात. तर त्या एकमेकांवर आदळतात तेव्हा भू-कवचाला घड्या पडतात. त्यातून घडीचे पर्वत ( उदा. हिमालय, आल्प्स इ.) तयार होतात. कधी त्या प्लेट्स आदळून एकमेकाखाली खचतात. अशा दोन प्लेट्सच्या सीमाक्षेत्रावरील भाग नाजूक असल्याने तेथे भूकंप व ज्वालामुखी अधिक प्रमाणात होतात. अशा प्रकारे टॅक्टोनिक प्लेट्स सिद्धांतातून खंडनिर्मितीसोबत भूकंप व ज्वालामुखीचे स्पष्टीकरणही मिळाले.

या सिद्धांतानुसार खंडांना सध्याचे स्वरूप कसे प्राप्त झाले, याचे स्थूल चित्र पुढीलप्रमाणे आहे.

सुमारे २५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आजचे सर्व खंड एकत्रित स्वरूपात होते. या मूळच्या विशाल खंडास ‘पँजिया’ व त्याच्याभोवतीच्या समुद्रास ‘पँथालेशिया’ असे नाव देण्यात आले. सुमारे २० कोटी वर्षांपूर्वी एक आडवी भेग पडून पँजियाची विभागणी होण्यास सुरुवात झाली व दोन भागांच्या मध्ये ‘टेथिस’ नावाचा समुद्र तयार झाला. त्यापैकी उत्तरेकडील तुकड्यास ‘लॉरेशिया’ व दक्षिणेकडील तुकड्यास ‘गोंडवन’ असे नाव देण्यात आले आहे.

लौरेशियामध्ये आजचा उत्तर अमेरिका, युरोप आणि बहुतेक आशिया यांचा तर गोंडवनात आजचा दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका व भारत यांचा समावेश होता.

सुमारे १८ कोटी वर्षांपूर्वी गोंडवनाची विभागणी द. अमेरिका व आफ्रिका, ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका व भारत या तुकड्यात होऊ लागली. सुमारे १३ कोटी वर्षांपूर्वी आफ्रिका आणि द. अमेरिका खंडांची विभागणी सुरू होऊन त्यात अटलांटिक महासागर तयार होऊ लागला. ही विभागणी उत्तरेकडे सरकत युरोप खंडापासून उत्तर अमेरिका खंड पूर्णपणे वेगळा होण्याची क्रिया साडेतीन ते चार कोटी वर्षांपूर्वी पूर्ण झाली. ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका साडेचार कोटी वर्षांपूर्वी वेगळे झाले. सुमारे १.३५ कोटी वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाला जोडलेला भारत हा तुकडा वेगळा होऊन उत्तरेकडे सरकू लागला. उत्तरेकडे सरकत ३० लक्ष वर्षांपूर्वी तो आशिया खंडाला टेकला. आशिया व भारत यांची टक्कर होऊन त्यांच्यामध्ये हिमालय पर्वत तयार झाला व भारत आशियाचा भाग बनला. अशा प्रकारे पृथ्वीवरील खंडांना सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.

अर्थात ही प्रक्रिया कोट्यवधी वर्षांच्या कालखंडात अतिशय मंद गतीने पण अव्याहत घडली आणि आजही चालू आहे. म्हणजे हिमालयाची निर्मिती अजूनही चालू असून त्यामुळे त्याची उंची दरवर्षी वाढत आहे. तसेच अटलांटिक महासागर रुंदावत असून त्यामुळे अमेरिका व युरोपमधील अंतर दरवर्षी २.५ सें.मी.ने वाढत आहे.

तात्पर्य काय, तर पृथ्वीच्या स्थिर रंगमंचावर इतिहासातील पात्रे येतात व जातात, ही केवळ कल्पना आहे. प्रत्यक्षात धरती ही स्वत:च एक फिरता रंगमंच आहे. यावरील खंड, पर्वत, नद्या, समुद्र ही नेपथ्यरचना अव्याहत बदलत असते. अशा प्रकारे पृथ्वीवर मानवाच्या व भूगोलाच्या इतिहासाचे नाट्य युगानुयुगे अव्याहत चालत राहते.

एल. के. कुलकर्णी (भूगोलकोशाचे लेखक आणि भूगोलाचे निवृत्त शिक्षक)

lkkulkarni.nanded@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various stages of process of forming continents on earth zws