वेद वाङ्मय संस्कृतमध्ये रचले गेले. संस्कृत भाषा इ. स.पूर्व २५०० ते २००० वर्षांपासून गुरुकुलात शिकवली जात असे. वेदसंहिता, ब्राह्मण ग्रंथ, अरण्यक, उपनिषद इ. ग्रंथांचे अध्ययन हा त्या अध्ययन-अध्यापन पद्धतीचा आधार होता. अन्य संस्कृत वाङ्मय विशेषत: काव्य, नाटक, रचना व त्यांची शास्त्रे यांचाही अभ्यास होत असे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वेदाध्ययनार्थ प्राज्ञपाठशाळेत दाखल झाल्यावर लहान वयात पाठशाळेच्या काही ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रारंभिक पाठ घेतले. गुरू नारायणशास्त्री मराठे यांनी कालिदासाच्या ‘रघुवंश’ या संस्कृत महाकाव्याच्या दुसऱ्या सर्गापासून तर्कतीर्थांना शिकविण्यास प्रारंभ केला.

सुमारे वर्षभराच्या अभ्यासानंतर तर्कतीर्थांची व्युत्पत्ती तयार झाली. म्हणजे संस्कृत साहित्यग्रंथ गुरूच्या साहाय्याशिवाय स्वत: वाचण्याची शक्ती आली. मग त्यांनी बाणभट्टाच्या ‘कादंबरी’चे वाचन केले. हळूहळू ‘न्यायमुक्तावली’द्वारे तर्कशास्त्राचा अभ्यास झाला. ‘न्यायवैशेषिक’मधून दर्शनांचे द्वार खुले झाले. गुरुकुल अध्यापन पद्धतीत गुरू प्राथमिक गोष्टी शिकवून मार्ग दाखवतात. मार्गक्रमण विद्यार्थ्यानेच करायचे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासकाळ सरसकट अमुकच वर्षांचा नसतो. वर्षभरात सर्व विद्यार्थी पुढच्या वर्गात अशी यांत्रिकता नसते. एकच अभ्यासक्रम काही विद्यार्थी वर्षात, तर काही दोन वर्षांत पूर्ण करतात. भारतीय शिक्षण पद्धती विद्यार्थ्याच्या वकुबावर उभी आहे. तर्कतीर्थ, विनोबांचे अभ्यासक्रम इतर विद्यार्थ्यांच्या आधी पूर्ण होत. एकदा तर्कतीर्थांनी आपल्या गुरूंना एका सर्गाचे भाषांतर लिहून तपासायला दिले. गुरुजींनी ९९ गुण दिले. तर्कतीर्थांनी विचारले, ‘शंभर का नाही दिलेत?’ ते म्हणाले, ‘अखेर शून्य आकडा आहे, तेथे जाऊ नये.’ हे शून्य सापेक्ष खरे… निरंकही आणि शतकही! शून्य आकडा एककही आहे नि त्रिपदीही! अंक आणि अक्षरांची संगती जीवनदृष्टीतून गुण आणि मूल्यांद्वारे (मार्कस् अँड व्हॅल्यूज) मिळवून देणे हा गुरुकुल अभ्यास पद्धतीचा पाया नि गाभा घटक होय. तोच आजच्या शिक्षणाने गमावला आहे.

Loksatta vyaktivedh Actress Demi Moore autobiography Inside Out
व्यक्तिवेध: डेमी मूर
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Loksatta editorial on Rivalry in many districts for the post of Guardian Minister Cabinet
अग्रलेख: मारक पालक नकोत!
Loksatta anvyarth Gautam Gambhir India lose in Test series
अन्वयार्थ: खरेच ‘गंभीर’ आहोत?
loksatta readers feedback
लोकमानस: सारेच बरबटलेले, कोणाला वगळणार?
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Murder of young journalist Mukesh Chandrakar
सत्तेला प्रश्न विचारणाऱ्यांचा जीव…
manmohan singh
सामान्य माणूस, शेतकरी यांच्यापर्यंत आर्थिक सुधारणा पोहोचल्या का?

वैयक्तिक अभ्यासाबरोबर प्राज्ञपाठशाळेत समूह शिक्षणाला महत्त्व असे. आठवड्याला त्यासाठी सामूहिक बैठकांचे आयोजन केले जात असे. विद्यार्थ्यांना विद्या शाखा वाटून दिलेल्या असायच्या. प्रत्येक शाखेचे विद्यार्थी आपला अभ्यास इतरांपुढे सादर करीत. त्यातून तुलनात्मक अभ्यास व स्पर्धा दोन्ही साधली जायची. या बैठकांना सर्व शिक्षक, विद्यार्थी अनिवार्यपणे उपस्थित असत. चुकत, शिकत, स्वयंपूर्ण होण्याचा व करण्याचा हा उपक्रम अनुकरणीय असायचा. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसाद्वारे वादविवाद, खण्डनमण्डन पद्धती शिकविली जायची. त्यातून वाक्चातुर्य, तर्काधारित विषय विवेचन शिकवले जायचे. पंचवाद, उत्तरवाद गुरुजी शिकवत. अध्यापन केवळ तार्किक, सैद्धान्तिक नसे. त्याला साहित्य, संगीताची जोड दिली जायची. अभ्यास आनंददायी व्हावा, शिवाय विद्यार्थी प्रज्ञा, प्रतिभेस संधी देण्याचीही दृष्टी असायची. वर्ष-दीड वर्षानंतर साहित्याचे पूर्वरंग, उत्तररंग, कथानके यांचे शिक्षण सुरू होई. या शिक्षणाला संगीताची जोड असायची. गुरू स्वामी केवलानंद यांना शास्त्रीय संगीताची चांगली जाण असल्याची नोंद तर्कतीर्थ साहित्यात आढळते. विद्यार्थ्यांनी गायक व्हावे हा हेतू नसला तरी शिकवत. कीर्तनकार, प्रवचनकार कौशल्ये आणि पद्धतीचे विधिवत शिक्षण दिले जायचे. वेदाध्ययन या एकाच माध्यमातून संस्कृत पंडित, पुरोहित, प्रवचनकार, कीर्तनकार, निरूपक घडविले जात असत. त्यासाठी अभंग शिकविले जात नि दुसरीकडे आर्यावृत्तही. काव्यशास्त्र, नाट्यशास्त्र, अलंकारशास्त्र, वृत्त, छंद सर्व शिकविण्यावर भर असल्याच्या आठवणी तर्कतीर्थांनी आपल्या आत्मपर लेख नि मुलाखतींमध्ये नोंदविल्या आहेत. गुरू स्वामी केवलानंद सरस्वती यांचे चरित्र तर्कतीर्थांनी संस्कृत आणि मराठीत लिहून आपल्या वेदाध्ययनाची खुलासेवार माहिती दिली आहे. ती जिज्ञासूंनी समग्र वाङ्मयातून मुळातूनच वाचायला हवी. प्राज्ञपाठशाळा पठडीतील वेदशाळा नव्हती. तिथे आधुनिक शिक्षणही दिले जायचे, याचे आज आश्चर्य वाटते, ते अशासाठी की, ती गुरूंची भविष्यलक्ष्यी शिक्षणदृष्टी होती. इंग्रजी, इतिहास, भूगोल, भौतिकशास्त्र, गणित, ज्योतिष, स्तोत्रपठण, संध्यावंदन, पाठांतर, पंक्ती लावणे (पद अन्वय) सारे शिकविले जाई. अनेकपरींचे ज्ञान-विज्ञान आणि विविध भाषांवरील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अधिकाराचे रहस्य या अभ्यासातून स्पष्ट होते.

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com

Story img Loader