प्रा. विजय तापस यांना मराठी कविता आणि नाटक या दोन्ही कलाप्रकारांत रस असला तरी नाटक हा कलेच्या क्षेत्रातील सर्वोच्च पातळीवरचा आविष्कार आहे, कारण नाटक हे थेट जीवनाला भिडणारे असते, अशी त्यांची कायम धारणा होती… आणि ती शेवटपर्यंत तशीच राहिली. त्यांनी १९४७ पूर्वीच्या विस्मृतीत गेलेल्या नाटकांचे विवेचन, विश्लेषण करणारे ‘कस्तुरीगंध’ हे सदर ‘लोकसत्ता’मध्ये २०२२ साली लिहिले होते. ते ‘पुनर्भेट : विस्मृतीत गेलेल्या नाटकांशी’ या नावाने नुकतेच पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले आहे. ही त्यांची शेवटची शब्दकृती. साहित्य, संस्कृती, कला याबद्दल त्यांना नेहमीच आस राहिली. त्यातून त्यांचे अनेक संशोधन, अभ्यास प्रकल्प उभे राहिले. रामनारायण रुईया महाविद्यालयात त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. या कॉलेजच्या ‘नाट्यवलय’चे बराच काळ ते मार्गदर्शक होते. रुईयाचा महाविद्यालयीन नाट्यक्षेत्रात दबदबा निर्माण करण्यात त्यांचा हा सहयोग महत्त्वाचा ठरला.
त्याचवेळी वृत्तपत्रे, नियतकालिके यांत त्यांचे साहित्य आणि नाट्यविषयक लेखनही जोमाने सुरू होते. रुईयाचा इतिहास ‘अमृतगाथा’ नावाने कॉफीटेबल बुक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. मुंबई विद्यापीठाच्या ‘शहराचे भूषण’ या ग्रंथात प्रमुख संशोधक म्हणून त्यांनी कामगिरी बजावली होती. कवी नारायण सुर्वे यांच्या दुर्मीळ कवितांचे संपादन त्यांनी ‘गवसलेल्या कविता’रूपात केले होते. अलीकडेच ‘सत्यकथा’तील निवडक कवितांच्या दोन खंडांचे संपादनाचे मोठे काम त्यांनी हातावेगळे केले होते.
नाट्यदिग्दर्शक अरविंद देशपांडे, ज्येष्ठ रंगकर्मी दामू केंकरे आणि नाटककार विजय तेंडुलकर यांच्यावरील पुस्तकांचे सहयोगी संपादक म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे ‘सत्यकथा’ आणि ‘मौज’चे साक्षेपी संपादक श्री. पु. भागवत यांच्यावरील ‘सृजनव्रती : श्री. पु. भागवत’ या ग्रंथाच्या संपादनातही त्यांचा मोलाचा सहयोग होता. याशिवाय शंकराचार्यांच्या स्तोत्रांचे मराठी रूपांतर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरूण टिकेकर यांच्या लेखांचे संपादन, चिपळूणकर व्याख्यानमालेतील व्याख्यानांचे पुस्तक अशी अनेक पुस्तके त्यांच्या खात्यावर जमा आहेत. नाट्य-साहित्यसमीक्षा, नाट्येतिहास, त्याचे सामाजिक अन्वयन यांत त्यांना कायम रस होता. त्यांची ही पुस्तके म्हणजे संपादनाचा वस्तुपाठ होती असे म्हणायला हरकत नाही. एकोणिसाव्या शतकाचा अभ्यास, संशोधन आणि त्याचे दस्तावेजीकरण हे त्यांच्या आयुष्याचे एक ध्येय होते. त्यांच्या जाण्याने या क्षेत्रात नक्कीच पोकळी निर्माण झाली आहे.