‘मलाही भावांप्रमाणेच देशकार्य करायचे आहे’ अशा हट्टापायी विमला नौटियाल कौसानीच्या आश्रमात गेल्या. वय १७ आणि सन १९४७- त्या वेळी, या वयात मुलींची लग्ने होत. पण मी देशासाठीच काम करणार अशा ईर्षेने विमला ‘लक्ष्मी आश्रमा’त आल्या. हा आश्रम ‘सरला बहन’ यांनी- म्हणजे गांधीजींना साथ देण्यासाठी ब्रिटन सोडून भारतात आलेल्या कॅथरीन मेरी हायलेमान यांनी – स्थापला होता. ‘नयी तालीम’नुसार तिथे स्वावलंबन, सूतकताई, ग्रामोद्धार, व्यसनमुक्ती हे कार्य चाले. ते त्यांनी सहा वर्षे केले आणि १९५३ ते ५४ हे अख्खे वर्ष विनोबा भावे यांच्या ‘भूदान’ चळवळीसाठी सरलाबेनसह समर्पित केले. २० ते २५ वयाच्या इतरजणी पोराबाळांमध्ये आणि ‘रांधा, वाढा…’ च्या चक्रात अडकत असताना विमला मात्र खेड्यांना आत्मविश्वास आणि नैतिक बळ देण्याचे काम करत होत्या. आश्रमात शिकवूही लागल्या होत्या. या कामाचे महत्त्व त्यांना इतके पटले होते की होणाऱ्या नवऱ्याला त्यांनी अटच घातली- राजकारण सोडा- इथेच गावात राहा. पोटापुरते कमावून आपण दोघेही सर्वोदयाचे काम करू.
नवऱ्याचे नाव सुंदरलाल बहुगुणा… त्या वेळच्या काँग्रेसचे टिहरी भागातील तरुण नेते. त्यांनी खरोखरच राजकारण सोडले. १९५४ मध्येच ते आधी सिलयारा गावात आले, तिथे जमीन थोडीबहुत समतल करून झोपडी उभारली आणि मग विमला नौटियाल, विमला बहुगुणा झाल्या. लग्नखर्च ४८ रुपये- तोही वधुपक्ष आणि वरपक्षाने निम्मा निम्मा वाटून घेतला. पुढल्या संसारातही कधी साड्या-दागिने यांचा सोस विमला यांनी केला नाही- पण या जोडप्याने, हिमालयाच्या टिहरी भागाचे ‘वस्त्रहरण’ थांबवणारी ‘चिपको’चळवळ उभारली! ते आंदोलन १९७३ मधले, पण १९५५ पासून गावातल्या महिलांसह विमला बहुगुणांनी काम सुरू केले. इथल्या महिलांचा आवाज संघटित करून पंचक्रोशी व्यसनमुक्त केली! पुढे १९९५ मध्ये ‘जमनालाल बजाज पुरस्कारा’ने या कामाची दखल घेतली. टिहरी गढवालच्या- महिलांशी बोलताना त्यांना भाषेचाही अडसर नव्हता. १९४२च्या चळवळीत शिक्षण सोडून तुरुंगवास भोगलेल्या भावांची धमक घडत्या वयातच विमला यांनी पाहिली होती. वडील नारायण नौटियाल हे वनखात्यात मध्यम दर्जाचे काम करीत, त्यांना वनअधिकारी होण्यासाठी ‘मुलांना जरा समजावा’ अशा कानपिचक्या ब्रिटिशकाळात दिल्या गेल्या तेव्हा ‘मुलांचे आयुष्य त्यांचे स्वत:चे आहे असे मी मानतो’ ही ठाम भूमिका घेतल्याने बढती हुकली- आणि ही भूमिका निव्वळ सोयीपुरती नसल्याने, घरातच मुलांकडून ‘हरिजनां’शी ऊठबस सुरू झाली तरीही वडील गप्प राहिले, हे सारे संस्कार विमला यांच्यावर होते.
त्यामुळेच ‘चिपको आंदोलन’ किंवा ‘नवजीवन आश्रमा’तून चालणारे ‘पर्वतीय पर्यावरण संरक्षण समिती’चे काम उभारले ते विमला आणि सुंदरलाल बहुगुणा या दोघांनी! गांधीजींनी कस्तुरबांना ‘गांधीवादा’कडे कसे वळवले, याच्या कथा सांगितल्या जातात- तशी एकही कथा सुंदरलाल आणि विमला यांच्याबद्दल सापडणार नाही. हे सहजीवनच होते. सुंदरलाल यांच्या कोविड-मृत्यूने २०२१ साली ते संपले, तोवर चारधाम यात्रेच्या ‘सुखद अनुभवा’साठी रस्ते बांधणाऱ्या सरकारपुढे आपण हतबल आहोत याची हताशाही विमलादीदींच्या सोबतीत आली होती. यानंतर त्यांनी उमेद सोडली, आणि परवा प्राणही सोडला.