कलाविषयक विचार करणाऱ्यांनी कलेपुरताच विचार केला, तर तो मुळात ‘आपले ते इतकेच’ अशा प्रकारचा असतो… याच वृत्तीतून पुढे एखाद्याच शैलीचा/ कलाप्रवाहाचा/ विशिष्ट कलावंतांबद्दलचा अभिमान जागा होतो आणि घट्ट होत राहातो. दुराग्रह वाढतात. असे कोणतेही दुराग्रह रमेशचंद्र पाटकर यांच्याकडे नव्हते, म्हणूनच ते कोणत्याही कलाप्रकाराकडे-प्रवाहांकडे स्वच्छपणे पाहू शकत. या स्वच्छपणामागे होता तो त्यांचा चतुरस्रा अभ्यास. त्या अभ्यासामागची प्रेरणा मात्र, ‘आधुनिकते’ची त्यांना असलेली आस हीच असणार. ती दृष्टी त्यांच्या कलाविषयक लिखाणात दिसते. ‘कलेचा इतिहास’ हे त्यांचे सुरुवातीचे (१९७३) पुस्तक. पण त्यानंतरचे ‘मराठी नियतकालिकांतील कलाविचार’ हे त्यांनी संपादित केलेले पुस्तक आगरकर आदींपासून सुरू होते, म्हणजे सेझां/ ब्राक/ मातीस/ पिकासोप्रणीत ‘मॉडर्न आर्ट’चे वारे महाराष्ट्रात पोहोचले नव्हते तेव्हापासून. १९१० च्या दशकापासूनच पाश्चात्त्य कला काहीतरी निराळी आहे, कलेतली भारतीयता जशी होती तशीच यापुढे टिकवता येणार नाही, याची जाणीव उमटत होती आणि हीच ‘भारतीय आधुनिकते’च्या शोधाची सुरुवात होती. ज्या अमृता शेरगिल हिच्यापासून ‘मॉडर्न’ भारतीयता सुरू झाली असे मानले जाते, तिच्या पत्रांच्या दोन खंडी इंग्रजी ग्रंथामधून पत्रे निवडून, ती मराठीत आणण्याचा खटाटोपही रमेशचंद्र पाटकरांचाच. या दोनच पुस्तकांनीही पाटकर अजरामर ठरावेत. पण त्यांच्या मृत्यूनंतर ‘ऐसपैस’ या कथासंग्रहाचे लेखक म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो आहे, असे त्यांचे कर्तृत्व.

‘मराठी नियतकालिकांतील कलाविचार’ हा ग्रंथ सहजसाध्य नव्हता. पाटकरांच्या संशोधकवृत्तीमुळेच हा ऐवज लोकांसमोर आला. त्यांचे वडील (नारायण पाटकर) चित्रकार होते, ‘चित्रकार गायतोंडे यांचे ते समकालीन – सातआठ वर्षांनी वडील मोठे असतील त्यांच्यापेक्षा- दोघेही गिरगावकर!’ असे पाटकर सांगत. वडिलांची चित्रे ‘बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट’ शैलीनुरूप, पण विषयांचे निराळेपण शोधणारी होती. पाटकर यांचे कलाविषयक वाचन लहानपणापासून सुरू झाले. त्याला जोड मिळाली ती संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती लढा आणि कामगार चळवळ यांची. या आंदोलनांमुळे विविध थरांतले, भिन्न आवडीनिवडींचे लोक एकत्र आले. त्याचा परिणाम पाटकरांच्या समाज-निरीक्षणांवर झालेला दिसतो. वाचन- अवलोकनाचा पैस वाढला, तो चळवळींमुळे. ‘लोकवाङ्मयगृहा’चे काम पाटकर करू लागले. दुराग्रह न ठेवता डोळे/ कान, बुद्धी सजग ठेवल्यामुळे विविध प्रकारचे कथालेखन त्यांच्या हातून होऊ शकले. पुढल्या काळात कथालेखन मंदावले; पण अनुवादाचे काम त्यांच्या हातून भरपूर झाले. पॅलेस्टिनी कवींच्या कवितांचे अनुवाद पुस्तकरूपाने आले तेव्हा, फैज अहमद फैज यांनी पॅलेस्टाइनबद्दल (फिलिस्तीन) लिहिलेल्या दोन कवितांची जोडही त्याला पाटकरांनी दिली. पॅलेस्टिनी ही माणसेच असल्याचा विसर पडल्याच्या आजच्या दिवसांत, या संग्रहाला पाटकरांनीच लिहिलेली प्रस्तावना वाचनीय ठरावी. भगतसिंग यांचे चरित्र, गदर आंदोलन, कामगार रंगभूमी, इप्टा अशा ‘डाव्या’ विषयांचे महत्त्व वाचकांपर्यंत पोहोचवणारे, ‘आजी, चाफा आणि मांजर’, ‘सगळं काही सांगायला हवं’ या कथा लिहिणारे, तरुण कथाकारांचा प्रोत्साहनयुक्त आदर करणारे पाटकरही तेच- हे लक्षात आल्यावर कळे की, वैविध्य अलंकार नाही, तो स्वभाव असायला हवा. पाटकरांच्या असण्यातून अधोरेखित होणारी ती जाणीव ते नसतानाही जपणे जरा कठीण आहे.

Story img Loader